Nashik News : जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचा ज्वर वाढत असताना, ग्रामीण भागातील दुष्काळाची दाहकता वाढत आहे. ग्रामीण भागातील पाच लाख ७७ हजार १६६ (१७ टक्के) लोकांची तहान टॅंकरच्या पाण्याद्वारे भागविली जात आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने टॅंकरची मागणी वाढत असून, गत आठवडाभरात जिल्ह्यात तब्बल ४० टॅंकर वाढले आहे. (Nashik Water Shortage)
सद्यःस्थितीत ३२६ टॅंकरच्या ६८७ फेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. राज्यासह जिल्हाभरात उष्णतेची लाट आलेली असताना झपाट्याने पाण्याचा साठा घटत चालला आहे. उन्हाचा पारा वाढत असल्याने ग्रामीण भागात गावोगावी पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे टॅंकरची मागणी दिवसागणिक वाढत आहे.
यंदा कमी प्रमाणात पाऊस झाल्याने धरणे, छोट्या-मोठ्या तलावांमध्ये पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. तसेच दिवसेंदिवस उन्हाळा अधिक वाढत असल्याने भूगर्भातील पाणीपातळी खालावत चालली आहे. परिणामी, जिल्ह्यातील धरणे व तलावातील पाणीपातळीत कमालीची घट होत आहे. त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पुरेसा पाऊस नसल्याने जिल्ह्यातील काही गावांना गत वर्षभरापासून टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. सद्यःस्थितीत २९६ गावे व ७५७ वाड्या, अशा एकूण १०५३ गाव-वाड्यांना ३२६ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यात १४ शासकीय, ३१२ खासगी टॅंकरचा समावेश आहे. (Latest Marathi News)
दुष्काळग्रस्त असलेल्या ३५ गावांना, तसेच १२८ ठिकाणी टॅंकरसाठी १६९ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यात बागलाण (३८), चांदवड (पाच), देवळा (३५), कळवण (१५), मालेगाव (५१), नांदगाव (दहा), पेठ (पाच), सुरगाणा (चार) येवला तालुक्यांसाठी (सहा) विहिरी अधिग्रहीत केल्या आहेत.
...असा आहे टॅंकरचा वाढता आलेख
जिल्ह्यात दिवसेंदिवस दुष्काळाची दाहकता वाढू लागली असल्याने टॅंकरची मागणी वाढत आहे. २९ मार्चअखेर आठवड्यात २०६ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. ६ एप्रिलला यात वाढ होऊन टॅंकरची संख्या २२६ वर पोचली. १८ एप्रिलला जिल्ह्यातील २३३ गावे आणि ५३५ वाड्या, अशा ७६८ ठिकाणी २५६ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता.
२९ एप्रिलला यात वाढ होऊन टॅंकरची संख्या ही थेट २८६ वर होती. ७ मेस टॅंकरने ३०० आकडा पार केला असून, तो ३२६ वर पोचला आहे. एप्रिल महिन्यात टॅंकरची संख्या ही ८० ने वाढली आहे. मे महिन्यात टॅंकरची संख्या ही ५०० पार होण्याचा अंदाज ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने वर्तविला आहे.
सिन्नर तालुक्यात दुपटीने वाढले टॅंकर
तालुकानिहाय विचार करता आठवड्यात सिन्नर तालुक्यात टॅंकर हे दुपटीने वाढले आहेत. गत आठवड्यात १७ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. आता टॅंकरची संख्या ही ३४ झाली आहे. यापाठोपाठ मालेगाव तालुक्यात दहा, पेठ व येवल्यात आठने टॅंकर वाढले आहे. सर्वाधिक ६९ टँकर नांदगाव तालुक्यात सुरू आहे.
यानंतर बागलाण (३५), चांदवड (३१), देवळा (३२), इगतपुरी (एक), नाशिक (एक), पेठ (आठ), सुरगाणा (१४), त्र्यंबकेश्वर (एक) टँकर सुरू आहे. हे टॅंकर पाच लाख ७७ हजार १६६ लोकांची तहान भागविण्याचे काम करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.