Nashik: मालेगाव तालुक्यात 95 हजार 278 हेक्टर खरीपाच्या क्षेत्राचे उद्दिष्टे! मका, बाजरीला सर्वाधिक पसंती, त्याखालोखाल कपाशीकडे कल

Nashik News : तालुक्यात यावर्षी ९५ हजार २७८ हेक्टरवर खरीपाचे उद्दिष्टे आहे. यात सर्वाधिक ३८ हजार ८५० हेक्टरवर मका तर २६ हजार ७०० हेक्टरवर बाजरीचे पीक घेतले जाणार आहे.
farmer
farmeresakal
Updated on

मालेगाव : मृग नक्षत्राच्या पहिल्या पावसाने जोरदार सलामी दिल्याने बळीराजाची खरीपाची लगबग सुरु झाली आहे. अजुनही निम्म्या तालुक्यात पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. गेल्या वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे खरीपाचे जेमतेम ५० टक्के उत्पन्न आले. तालुक्यात यावर्षी ९५ हजार २७८ हेक्टरवर खरीपाचे उद्दिष्टे आहे. यात सर्वाधिक ३८ हजार ८५० हेक्टरवर मका तर २६ हजार ७०० हेक्टरवर बाजरीचे पीक घेतले जाणार आहे.

तालुक्याच्या माळमाथा भागात २५ हजार ७९८ हेक्टरवर कपाशी लागवडीचे उद्दिष्ट आहे. बियाणे व खते पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येते. तथापि विशिष्ट बियाण्यांना मागणी झाल्यास टंचाई निर्माण होऊ शकते. (Nashik 95 thousand 278 hectares of kharif area in Malegaon taluka)

तालुक्यातील पश्‍चिम पट्ट्यात प्रामुख्याने मका व बाजरी ही पिके घेतली जातात. तर माळमाथ्यावर कपाशीची लागवड केली जाते. खरीप हंगामाबरोबरच लेट खरीप म्हणून लाल कांदा लागवड केला जातो. गेल्या वर्षी जूनमधील चांगल्या सुरुवातीनंतर जुलै व ऑगस्टमध्ये पुरेसा पाऊस झाला नाही.

जुलैअखेर कशाबशा पेरण्या झाल्या. जवळपास ९० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या. पावसाअभावी यातील निम्म्या क्षेत्रावर दुबार पेरणी करावी लागली. अखेरच्या टप्प्यात व परतीच्या पावसानेही गुंगारा दिल्याने खरीपाचे उत्पन्न ५० टक्क्यांनी घटले.

यातून खर्चही निघाला नाही. अनेक शेतकऱ्यांनी मका, बाजरीचे अर्धवट पीक काढून त्याचा चारा म्हणून जनावरांसाठी वापर केला. गेल्या वर्षी कांद्याला चांगला भाव असल्याने लेट खरीप म्हणून लाल कांद्याची लागवड वाढली होती. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पुर्ण केली आहेत. मान्सुनपुर्व पाऊसदेखील काही ठिकाणी झाला.

त्यामुळे माळमाथ्यावर आतापर्यंत १ हजार २२ हेक्टरवर कपाशी लागवड देखील झाली आहे. बाजारात खते, बियाणे उपलब्ध असून पहिल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी खरेदीला सुरुवात केली आहे. हवामान विभागाने यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस सांगितल्याने शेतकऱ्यांसह सर्वच घटकांच्या आशा वाढल्या आहेत. खरीप हंगाम सुरु होत असल्याने शेत मजुरांनाही रोजगार मिळणार आहे.

"बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. शेतकरी बांधवांनी ठराविक कंपनी आणि ठराविक वाणाचा आग्रह धरु नये. खत व्यवस्थापन चांगले असेल व नियमित पाऊस झाल्यास सर्व वाणांचे उत्पादन सारखेच आहे. शंभर मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरण्या कराव्यात. शेतकऱ्यांनी बियाण्यांची उगवण शक्ती तपासून तसेच जैविक बुरशीनाशक बीज प्रक्रिया करुनच पेरणी करावी. शेतकऱ्यांनी कृषी निविष्टा धारकांकडून खते, बियाणे, किटकनाशक खरेदीचे पक्के बील घ्यावे."- गोकुळ आहिरे, उपविभागीय कृषी अधिकारी, मालेगाव

"खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर बाजारात मोठ्या प्रमाणावर बोगस बियाण्यांचा सुळसुळाट आहे. शासनाने बोगस बियाणे उत्पादन करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे मुबलक बियाणे, खते उपलब्ध करुन द्यावीत. बियाण्यांच्या किंमतीत वाढ झाली आहे. अनेक दुकानदार मनमानी करीत आहेत. कृषी विभागाने यावर नियंत्रण ठेवावे. शासनाने जिल्हा बँकेला सहकार्य करावे. जेणेकरुन बँकेमार्फत शेतकऱ्यांना पीककर्ज मिळू शकेल."

- सतीश पवार, शेतकरी, पिंपळगाव

(latest marathi news)

farmer
Dagadusheth Halwai Ganapati Decoration: यंदा दगडूशेठ गणरायाला साकारणार जटोली शिवमंदिराचा देखावा, जाणून घ्या वैशिष्ट्य

खरीपाचे उद्दिष्ट (हेक्टरमध्ये)

पीक - सर्वसाधारण क्षेत्र - प्रत्यक्ष पेरणी

ज्वारी - ३२० - २५

बाजरी - २६७०० - ००

मका - ३८८५० - १०५

तुर - ७१२ - ००

मुग - १५१२ - ००

उडिद - ८५ - ००

भुईमुग - १२३६ - ००

सोयाबीन - ५५ -००

सुर्यफुल - ०० - ००

तीळ - १० - ००

कापूस - २५७९८ - १०२२

मालेगाव तालुक्यात १५१ गावे आहेत. तसेच १३ मंडळ अंतर्गत १ लाख १६ हजार शेतकरी आहेत. तालुक्यातील एकाही मंडळात अजून १०० मिलीमीटर एवढा पाऊस झालेला नाही. आतापर्यंत सर्वाधिक ८४.९ मिलीमीटर पाऊस सौंदाणे मंडळात तर सर्वात कमी १६.८ मिलीमीटर पाऊस कौळाणे मंडळात झाला आहे.

मालेगाव- ७०.६, दाभाडी- ५५, वडनेर - ३४.६, करंजगव्हाण - ५१.१, झोडगे - ७१.१, कळवाडी - १९.३, सायने - ५२.३, निमगाव - ३९.३ मिलीमीटर एवढा पाऊस झाला आहे. तालुक्यात सरासरी पाऊस ४९.६ मिलीमीटर एवढा आहे.

farmer
RSS on BJP : ''संघाची भाजपला गरज...'' आरएसएसच्या टिपण्णीवरुन उद्धव ठाकरेंचा पंतप्रधानांना सल्ला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.