Nashik Adivasi Morcha : वनहक्क दाव्यासह कांदा निर्यातबंदी व आशासेविकांच्या मानधनवाढीबाबत येत्या तीन महिन्यांत कार्यवाही पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन पालकमंत्री दादा भुसे यांनी दिल्यानंतर ‘लाल वादळ’ने अखेर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील तीन महिन्यांत आश्वासनांची पूर्तता न झाल्यास पालकमंत्री दादा भुसे यांच्या घरासमोर मालेगावला आंदोलन करण्याचा इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते तथा माजी आमदार जे. पी. गावित यांनी दिला. (Nashik Adivasi Morcha marathi news)
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता काळात आंदोलकांच्या मागण्या मार्गी लावण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर असणार आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या अंतर्गत असलेल्या विविध संघटनांचे प्रतिनिधी व आदिवासी शेतकऱ्यांनी एकूण १८ मागण्यांसाठी आठ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडला.
या कालावधीत एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांसह पालकमंत्री भुसे यांच्यासोबत मुंबईत बैठक पार पडली. दोन वेळा पालकमंत्र्यांनी बैठक घेतली; परंतु लेखी आश्वासन व प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन न उठविण्याचा निर्धार जे. पी. गावित यांनी केला. त्यामुळे निर्णय होऊनही आंदोलन कायम असल्याचे दिसून आले.
अखेर सोमवारी (ता. ४) पालकमंत्री भुसे व जे. पी. गावित यांच्या शिष्टमंडळाची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. यात पालकमंत्र्यांनी मागण्या मान्य करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यावर आंदोलकांच्या शिष्टमंडळाने विश्वास दाखविला आणि आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला. बैठकीतील निर्णय झाल्यानंतर पालकमंत्री भुसे व जे. पी. गावित पायी आंदोलकांपर्यंत पोचले आणि सर्वांसमोर त्यांनी चर्चेचा सारांश सांगितला. (latest marathi news)
या आंदोलकांसमोर पालकमंत्र्यांनी लेखी आश्वासन गावितांना दिले. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडलेले आंदोलक रात्रीच घराकडे निघाले. शिष्टमंडळाच्या चर्चेप्रसंगी अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांसह अधिकारी उपस्थित होते.
दीड तासाच्या चर्चेअंती तोडगा
पालकमंत्री भुसे यांनी सोमवारी दुपारी साडेचारला आंदोलकांचे शिष्टमंडळ व अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या ‘ॲन्टिचेंबर’मध्ये घेतली. तब्बल दीड ते दोन तास विविध विषयांवर चर्चा झाल्यानंतर लेखी आश्वासन देण्याचा तोडगा पालकमंत्र्यांनी काढला. आश्वासनांची पूर्तता न झाल्यास मालेगावला आंदोलन करा, पण तूर्त महामुक्काम आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. त्यांच्या शब्दावर विश्वास दाखवत आंदोलकांनी माघार घेतली आहे.
''पालकमंत्री दादा भुसे यांच्या लेखी आश्वासनावर विश्वास ठेवून आम्ही आंदोलन स्थगित केले आहे. पुढील तीन महिन्यांत मागण्यांची पूर्तता न झाल्यास मालेगावला आंदोलन करण्यात येईल. मागण्या पूर्ण केल्या तर मालेगावमध्ये पालकमंत्री भुसे यांची मिरवणूक काढण्यात येईल.''-जे. पी. गावित, माजी आमदार
परतीच्या प्रवासाला सुरवात
आंदोलन स्थगित झाल्याची घोषणा होताच आंदोलकांनी गावाकडे निघण्याची तयारी सुरू केली. लाकडी सरपण, तांदूळ, मसाले, चुली व गॅस शेगडी गाडीत टाकून घराकडे निघाले. पायी आलेल्या आंदोलकांनी सीबीएस येथील बसस्थानकाकडे धाव घेतली. काहींनी गाड्यांची व्यवस्था स्वत: केली होती. रात्री उशिरापर्यंत ही आवरासावर सुरू राहिली. मंगळवार (ता. ५)पासून ‘स्मार्ट रस्ता’ पूर्ववत होणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.