Nashik Adivasi Morcha : वनजमिनीसह एकूण १८ मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या चार दिवसांपासून ठिय्या मांडलेल्या लाल वादळाची शुक्रवारी (ता. १) मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक होणार आहे. बैठकीची वेळ सकाळी कळविण्यात येणार असली तरी अंतिम निर्णय होइपर्यंत आंदोलन कायम ठेवण्याचा निर्णय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते तथा माजी आमदार जिवा पांडू गावित यांनी गुरुवारी (ता. २९) रात्री बैठकीनंतर घेतला. (Nashik Adivasi Morcha Protesters marathi news)
यामुळे शुक्रवारीही आंदोलक नाशिकमध्येच राहणार हे निश्चित आहे. आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी गुरुवारी रात्री जिल्हाधिकारी कार्यालयात दोन तास बैठक झाली. जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, माजी आमदार जिवा पांडू गावित, डॉ. डी. एल. कराड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आंदोलकांच्या मागण्यांविषयी माजी आमदार गावित यांनी थेट मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी फोनद्वारे संवाद साधला. वनहक्क जमिनीबाबत योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. कांदा निर्यातबंदी उठवण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. ज्यात गावित यांचाही समावेश असावा, अशी मागणी करण्यात आली.
या मागण्यांवर पुन्हा चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यानी आंदोलकांच्या शिष्टमंडळास शुक्रवारी मुंबईत बोलविले आहे. त्यामुळे शिष्टमंडळ मुंबईतून चर्चा करून येईपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या कायम असणार आहे. वनहक्क दाव्यांतर्गत कसणाऱ्याच्या नावे जमीन करण्यासह सातबाऱ्यावर नावे लावावे, या मागणीसह अन्य मागण्यांसाठी आदिवासी शेतकऱ्यांनी सोमवार (ता. २६)पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडला आहे. (latest Marathi News)
सीबीएस चौक ते अशोक स्तंभदरम्यान आंदोलकांनी रस्त्यावरच ठाण मांडल्याने वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला आहे. जिल्हा प्रशासन स्थानिक पातळीवरील मागण्या तातडीने मार्गी लावण्याबाबत पहिल्या दिवसापासूनच सकारात्मक आहे.
परंतु, धोरणात्मक निर्णयाबाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा लागणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यानच्या काळात मंगळवारी (ता. २७) मुंबईत बैठक झाली. मात्र, त्या बैठकीतील चर्चेत आंदोलनकर्त्यांचे समाधान न झाल्याने त्यांनी आंदोलनाचा पवित्रा कायम ठेवला आहे.
मागण्यांबाबत शासनाला शनिवारपर्यंतचा (ता. २) अल्टिमेटम दिला आहे. या मुदतीत योग्य तो निर्णय न घेतल्यास बेमुदत उपोषण, जेलभरो किंवा मुंबईला लाँग मार्च काढण्याचा इशाराच देण्यात आला आहे. त्यामुळे शासन आता काय निर्णय घेते, यावर आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे.
रुग्णवाहिका तैनात
आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रुग्णवाहिका तैनात करण्यात आली आहे. रुग्णवाहिकेमधील कमर्चाऱ्यांकडून दिवसभरात २०० आंदोलनकर्त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यांना विविध प्रकारची औषधे वितरित करण्यात आली. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आस्थेवाईकपणामुळे आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला.
पाण्यासाठी चार टँकर, ४० टॉयलेट
आंदोलनकर्त्यां शेतकऱ्यांसाठी जिल्हा प्रशासन व नाशिक महापालिकेने पिण्याच्या पाण्यासाठी चार टँकरची व्यवस्था केली आहे. ४० मोबाईल टॉयलेट उभारण्यात आले आहेत. सीबीएस चौक ते अशोक स्तंभ या परिसरात ठिकठिकाणी हे टँकर उभे करण्यात आले आहेत. पाण्याच्या बॉटल्या भरून घेण्यासाठी शेतकऱ्यांची या टँकरवर झुंबड उडत आहे.
डाळ-भात जोडीला ठेचा
मागण्यांबाबत गुरुवारी ठोस निर्णय होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, सायंकाळी उशिरापर्यंत त्याबाबत कोणताही निर्णय न झाल्याने शेतकरी काहीसे नाराज झाले. शेतकऱ्यांनी आंदोलनस्थळीच चुली पेटवित रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू केली. नागली व ज्वारीच्या भाकऱ्या, जोडीला ठेचा तसेच डाळ-भात शिजवला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.