नाशिक : आदिवासी शेतकरी व कामगारांच्या विविध मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सोमवारपासून (ता. २६) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे. जिल्हाभरातून आलेल्या आदिवासी शेतकऱ्यांनी सीबीएस ते अशोकस्तंभ या स्मार्टरोडवरच ठिय्या मांडल्याने सदरचा रस्ता सलग दुसऱ्या दिवशी दुतर्फा वाहतुकीसाठी बंद राहिला.
तर, शहर पोलिसांकडून बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. जिल्हा न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारे आणि पोलिस यांच्यात सातत्याने खटके उडाल्याचे पहावयास मिळाले. (Nashik Adivasi Morcha second day marathi news)
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते व माजी आमदार जे.पी. गावित यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (ता.२६) सायंकाळी आदिवासी स्त्री-पुरुष आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकले. यामुळे सीबीएस चौक ते मेहेर सिग्नलपर्यंतचा दुतर्फा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला होता.
जिल्हाभरातील आलेल्या आंदोलकांनी आपले कुटूंबिय व वाहनांसह रस्त्यावरच ठाण मांडल्याने मंगळवारी (ता.२७) सकाळपासूनच मेहेर सिग्नल ते अशोकस्तंभ दुतर्फा रस्ताही वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. यामुळे या मार्गांवरून धावणारी रहदारी पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.
स्मार्ट रोडवरील रहदारी बंद केल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला आहे. जिल्हा न्यायालय व जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागले. परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. स्मार्ट रोडवरील ठिकठिकाणी बॅरिकेटींग करून रहदारी अडविण्यात आली. तर, आंदोलकांनीही त्यांची वाहने एमजी रोड, सीबीएस चौक, अशोकस्तंभ येथे आडवी लावली आहेत.
पोलीस-वाहनचालकांमध्ये खटके
जिल्हा न्यायालय व जिल्हाधिकारी कार्यालयाचे कर्मचारी, या दोन्ही कार्यालयात कामानिमित्ताने येणार्या नागरिकांना पोलिसांच्या दबंगगिरीला सामोरे जावे लागले. पोलिसांनी बॅरिकेटींग करून रस्ते अडविले तर, कार्यालयात जाणाऱ्यांनाही ओळखपत्र दाखवून पोलीस सोडत नव्हते. त्यावरून अनेकांचे खटके उडाले. (Latest Marathi News)
विद्यार्थ्यांना मनस्ताप
सध्या बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बिटको कनिष्ठ महाविद्यालय आहे. परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना आंदोलकांच्या गर्दीला सामोरे जावे लागते आहे. तसेच हुतात्मा स्मारकालगतच शासकीय कन्या विद्यालय असून, शाळेत येणाऱ्या विद्यार्थिनींनाही मनस्तापाला सामोरे जावे लागते आहे.
जादा बंदोबस्त
परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जादा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. सरकारवाडा, मुंबई नाका, भद्रकाली, गंगापूर पोलीस ठाण्याची जादा कुमक, वाहतूक शाखेचे जादा अंमलदारांना ठिकठिकाणी तैनात करण्यात आले. राखीव पोलीस दलाच्या तुकड्या आंदोलनस्थळी सज्ज ठेवण्यात आल्या.
पर्यायी मार्गांवर ताण
स्मार्टरोडमार्गे जाणारी रहदारी पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. त्यामुळे शरणपूर रोड, गंगापूर रोड, चोपडा लॉन्स, रामवाडी रस्ता, शालिमार चौक या परिसरातील रस्त्यांवर रहदारी वाढल्यान अतिरिक्त ताण आला. तर, स्मार्ट रोड आणि एमजी रोडवरील व्यावसायिकांना आंदोलकांचा आर्थिक फटकाही बसला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.