Nashik Airplane Service : होणार आहे... पण कधी? आचके खात सुरू असलेल्या सेवेला हवा बूस्टर

Aeroplane
Aeroplane
Updated on

Nashik Airplane Service : विमानसेवेमागील शुक्‍लकाष्ठ काही संपता संपत नाही. कधी वैमानिकाची कमतरता, कधी ‘एचएएल’कडे मनुष्यबळाचा अभाव, कधी मुंबई विमानतळावर वेळ उपलब्ध होत नाही, कधी विमान कंपन्यांच्या तांत्रिक अडचणींमुळे विस्कळित होणारी सेवा एकना अनेक कारणांमुळे नाशिकची विमानसेवा अपेक्षित उडान घेताना दिसत नाही.

सध्या पाच शहरांमध्ये विमानसेवा सुरू आहे. देशातील मेट्रो शहरांमध्ये अद्यापही विमानसेवा सुरू होत नसल्याने विकासालाही अपेक्षित गती मिळत नाही.

आतापर्यंत एअर इंडिया, गो एअर, एअर नेकन, मेहेर अशा किमान चार कंपन्यांनी नाशिक विमानतळाहून सेवा सुरू करण्याची घोषणा केली. काही कंपन्यांनी ओझर विमानतळाहून पहिले टेक ऑफ घेतले. (Nashik airplane service is not starting due to many reasons news)

मात्र, काही कारणास्तव ही सेवा नियमित सुरू राहू शकली नाही. एअर इंडियाने ७० सीटर विमानाद्वारे नाशिक-मुंबई सेवा सुरू करण्याची घोषणा नोव्हेंबर २०१५ मध्ये केली होती; परंतु मुंबई विमानतळावर सोयीची वेळ उपलब्ध होत नसल्याने ही सेवा अनेकदा सुरू होऊन बंद करण्यात आली.

केंद्र सरकारच्या ‘उडान’ योजनेच्या माध्यमातून जून २०१७ पासून ओझरहून विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला कोरोनाकाळात मुंबई विमानतळावर क्वारांटाइन व्हावे लागत असल्याने अहमदाबादमार्गे नाशिक व नाशिकहून अन्य शहरांमध्ये प्रवासी पोहोचत होते. या कालावधीत पन्नास हजार प्रवाशांचा आकडा पोचला होता. नाशिक-पुणे हवाईसेवा अनेकदा सुरू करण्याची घोषणा झाली. मात्र प्रवासी मिळूनही सेवा नियमित झाली नाही.

नाशिकहून विमानसेवा सुरू करण्यासाठी काही उद्योजकांनी एप्रिल २०१७ मध्ये सर्वेक्षण केले. त्यात दहा दिवसांत अकरा हजार नाशिककरांनी भाग घेत विमानसेवेला पसंती दर्शविली. त्यात नाशिककरांनी नाशिक ते मुंबई नियमित सेवेला सर्वाधिक पसंती दाखविली. त्यानंतर नाशिकपासून नवी दिल्ली, गोवा, बेंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद, चेन्नई व कोलकता या शहरांना पसंती दिली.

Aeroplane
Chhagan Bhujbal News : नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी 7 आमदारांमुळे राष्ट्रवादीचा ‘क्लेम' : छगन भुजबळ

होपिंग फ्लाइटसाठी बेंगळुरू-नाशिक-दिल्ली, पुणे-नाशिक-नागपूर, अहमदाबाद-नाशिक-हैदराबाद, इंदूर-नाशिक-गोवा, बडोदा-नाशिक-बेंगळुरू, बेंगळुरू-नाशिक-भोपाळ या शहरांना पसंती मिळाल्याचे दिसून आले.

परंतु अहमदाबाद इंदूर, गोवा, हैदराबाद, नागपूर या शहरांव्यतिरिक्त अन्य सेवा बंद आहेत. बेंगळुरू, कोलकता, चेन्नई, भोपाळ या महत्त्वाच्या शहरांना जोडणारी हवाईसेवा अद्यापही सुरू झालेली नाही. दिल्ली सेवा बंद करण्यात आली आहे. अहमदाबादसाठी दिवसातून दोनदा सेवा सुरू आहे.

शिर्डीला प्राधान्य

ओझर येथे संरक्षण विभागाच्या अखत्यारितील ‘एचएएल’चे विमानतळ आहे. तेथे सुमारे साडेतीन किलोमीटरची धावपट्टी आहे. आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची ही धावपट्टी आहे. नाइट लँडिंगची येथे व्यवस्था आहे. असे असताना शिर्डीच्या पश्चिमेला असलेल्या काकडी गावाजवळ नवीन विमानतळाची निर्मिती होऊन देशातील महत्त्वाच्या शहरांना जोडणारी हवाईसेवा सुरूही झाली. परंतु ओझर विमानतळाला हवा तसा बूस्ट मिळत नाही.

अन्य शहरांचे महत्त्व घटण्याची भीती

सध्या माहिती तंत्रज्ञानाचे (आयटी) युग आहे. ‘आयटी’च्या या युगात वेगाने संपर्क होण्यासाठी विमानसेवा हा एकमेव पर्याय आहे. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, औरंगाबाद व नागपूर या शहरांच्या विकासाचा विचार केल्यास त्यामागे हवाईसेवा कारणीभूत आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सोलापूर येथे दिवसातून एकदा तरी मुंबईसाठी विमानाचे उड्डाण होते; परंतु तेच उड्डाण नाशिकमधून होत नाही.

Aeroplane
Nashik News: अन... सरपंचानी घातला रिकाम्या खुर्चीला हार; आरोग्य केंद्रात वैद्यकिय अधिकारी गैरहजर

हवाई सेवा नसल्याने आयटी उद्योग येत नाही. मुंबई, पुणे, सुरत व औरंगाबाद शहरांचा मध्यबिंदू नाशिक आहे. नाशिकमध्ये विमानसेवा सुरू होण्यासाठी सर्व तयारी आहे. परंतु नाशिकहून नियमित विमानसेवा सुरू झाल्यास इतर शहरांचा विकास खुंटण्याच्या भीतीमुळे विमानसेवेला चालना मिळत नसल्याचा स्पष्ट आरोप होत आहे.

फसलेले प्रयोग

काही वर्षांपूर्वी मेहेर कंपनीने गंगापूर धरणातून सेवा सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. पण स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे सेवा सुरू होऊ शकली नाही. १९८० च्या दशकात शहराच्या मध्यभागी व संरक्षण खात्याच्या अखत्यारित असलेल्या गांधीनगर विमानतळावरून हवाईसेवा सुरू होती. सुरक्षेचे कारण देत ही सेवा बंद करण्यात आली.

"अहमदाबाद, इंदूर, गोवा, हैदराबाद, नागपूर या शहरांना नियमित हवाईसेवा सुरू आहे. या सेवांना शंभर टक्के प्रतिसाद मिळत आहे. दिल्ली सेवा कंपनीच्या अडचणीमुळे बंद करण्यात आली आहे. परंतु मोठ्या शहरांना जोडणारी हवाईसेवा अद्याप सुरू होत नसल्याने हवा तसा नाशिकच्या हवाई क्षेत्राने वेग घेतलेला नाही." - मनीष रावल, अध्यक्ष, निमा एव्हिएशन कमिटी

"सध्या सुरू असलेल्या हवाई सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. बेंगळुरू, कोलकता, चेन्नई, भोपाळ या महत्त्वाच्या शहरांना जोडणारी हवाईसेवा सुरू होणे महत्त्वाचे आहे. या सेवा सुरू झाल्यास वेगाने प्रगती होईल." - कृणाल पाटील, अध्यक्ष, क्रेडाई मेट्रो

Aeroplane
Nashik News : होणार आहे... पण कधी? फूड प्रोसेसिंग हबची घोषणा विरली हवेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.