Anandacha Shidha : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारने राज्यातील गरीब व गरजू शिधापत्रिकाधारकांना दिलेला ‘आनंदाचा शिधा’ व महिलांना मिळणाऱ्या साडीचे वाटप महिनाभर लांबणीवर पडले आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपलेली असली, तरी विधान परिषदेची शिक्षक मतदारसंघाची निवडणूक सुरू असल्याने लाभार्थ्यांना जुलैपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. ( anandacha sidha Beneficiaries hit by increased code of conduct )
पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिमा असलेल्या चार लाख ७२ हजार ८२० कापडी पिशव्या पडून आहेत; तर ४२ हजार ८३ साड्या वाटपाच्या प्रतीक्षेत आहेत. पिवळे व केसरी रेशनकार्ड असलेल्या नागरिकांसाठी शिंदे-फडणवीस-पवार सरकारने ऑक्टोबर २०२३ च्या दिवाळीपासून आनंदाचा शिधा वाटण्यास सुरवात केली.
तेव्हापासून गरिबांना १०० रुपयांत अर्धा किलो रवा, मैदा, पामतेल, हरभराडाळ व एक किलो साखर दिली जाते. मात्र, सरकारला हा शिधा एकूण ३१५ रुपयांना पडतो. नाशिक जिल्ह्यात आचारसंहितेपूर्वी १९ हजार ८५६ लाभार्थ्यांना १५ मार्चपर्यंत लाभ मिळाला. त्यानंतर आचारसंहिता लागू झाल्याने ही योजना बंद झाली आहे. एप्रिलमध्ये गुढीपाडवा, मेमध्ये अक्षयतृतीया या दोन सणांना ‘आनंदाचा शिधा’ मिळाला नाही.
साडीचा रंग ठरतोय डोकेदुखी
अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना दहा किलो वजनाइतके साहित्य ठेवता येईल, अशी विणलेली कापडी पिशवी व एक मोफत साडी देण्याचा निर्णय घेण्यात आला. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी काही दिवस अगोदर हा निर्णय घेण्यात आल्याने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचताना अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागली. (latest marathi news)
त्यातही महिला लाभार्थ्यांनी साडी निवडताना विशिष्ट रंगाचा आग्रह धरल्याने स्वस्त धान्य दुकानदारांची डोकेदुखी चांगलीच वाढली. साडीच्या रंगावरून महिलांमध्ये स्पर्धा सुरू झाल्यने हा विषय ग्रामीण भागात चांगलाच गाजला. आचारसंहिता लागू होताच साड्या व पिशव्या वाटपाचा कार्यक्रम जिल्हा पुरवठा विभागाने थांबविला.
त्यामुळे पुरवठा विभागाकडे आता चार लाख ७२ हजार ८२० पिशव्या व ४२ हजार ८३ साड्या वाटपाविना पडून आहेत. मोफत साडी वाटपासाठी जिल्ह्यात एक लाख ७६ हजार ५५२ साड्या दाखल झाल्या होत्या. दोन हजार ६०९ स्वस्त धान्य दुकानांमधून या साड्यांचे वाटप करण्याचे नियोजन प्रशासनाने केले.
लाल, हिरवा, पिवळा व निळ्या रंगाच्या या साड्या उपलब्ध असताना एकाच रंगाच्या साड्यांची मागणी होत असल्याने स्वस्त धान्य दुकानदारांचे ‘टेन्शन’ वाढले होते. उपलब्ध साड्यांपैकी एक लाख ३४ हजार ४६९ साड्या आचारसंहितेपूर्वी ऑनलाइन वाटप झाल्या असून, ४२ हजार ८३ साड्या वाटप करणे बाकी आहे.
पिशव्यांच्या माध्यमातून प्रचार
दहा किलो वजनाइतके साहित्य ठेवता येईल, अशी विणलेली कापडी पिशवी मोफत देण्यात येते. त्यावर पंतप्रधान मोदी यांची प्रतिमा असल्याने निवडणुकीत याचा निश्चितपणे फायदा होण्याचा हेतू कदाचित सरकारने ठेवला असावा. पण, प्रत्यक्षात तसे काही घडल्याचे दिसून आले नाही. सहा महिन्यांच्या अंतराने एक पिशवी ग्राहकांना देण्यात येते. नाशिक जिल्ह्यासाठी आठ लाख ३१ हजार पिशव्या प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी तीन लाख ५८ हजार १८० पिशव्या वितरित करण्यात आल्या आहेत; तर चार लाख ७२ हजार ८२० पिशव्या शिल्लक आहेत.
''आचारसंहिता लागू असल्याने आनंदाचा शिधा, कापडी पिशव्या व साड्यांचे वाटप थांबलेले आहे. यासंदर्भात शासनाकडून आदेश प्राप्त झाल्यावर वाटपाबाबत निर्णय घेतला जाईल. आचारसंहितेचा कालावधी जुलैपर्यंत असल्याने त्यानंतरच वाटप सुरू करण्यात येणार आहे.''- कैलास पवार, प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी
‘आनंदाचा शिधा’ व साड्यांचे लाभार्थी
बागलाण- २,५४६- १३,११६
चांदवड- ३८७- ६,२२७
देवळा- १३०- ५,०९१
दिंडोरी- ८९१- १३,१४४
मालेगाव शहर- २९७- १६,६०६
मालेगाव- ९८९- ११,२३५
नाशिक शहर- २,१३३- १,०५,९१४
नाशिक- २७०- ८,६२७
इगतपुरी- १,४५७- १०,६८८
कळवण- २४१- ८,६५१
नांदगाव- २,४३५- ५,२७१
निफाड- ३,६९३- १०,८३१
पेठ- ७७१- १०,८४२
सिन्नर- ८२१- ८,०६५
सुरगाणा- १,८५६- १५,३२७
त्र्यंबकेश्वर- ३०३- ८,८८४
येवला- ६३६- १०,०५१
एकूण- १९,८५६- १,७६,५५२
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.