Nashik News : प्रथमच जनतेने हाती घेतलेली निवडणूक असेच वर्णन दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या निकालाचे करता येईल. भाजपसह विद्यमान खासदारांवरील रोष पूर्ण मतदारसंघात होता तसाच तो येवला मतदारसंघात देखील दिसून आला. (Yeola Assembly Constituency)
राजकीय निमित्त काही असो पण येथील हेविवेट नेते छगन भुजबळ यांनी बाळगलेला संयम आणि स्थानिक नेत्यांनी केलेली वज्रमुठ अन् कांद्यासह शेतीच्या मुद्यावर जनतेच्या मनातला संताप या गोष्टी जुळून आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भास्कर भगरे यांचा विजय या मतदारसंघाला ‘सर’ करु शकला. यावरुन भगरे यांना मतदारसंघातून मिळालेली १३ हजार २०५ मतांची आघाडी खूप काही सांगून जाते.
येवला तालुक्यासह निफाड तालुक्यातील लासलगाव, विंचूर परिसरातील ४२ गावांचा हा मतदारसंघ आहे. अवर्षणप्रवण,दुष्काळी आणि कांदा उत्पादकांचा हा परिसर असल्याने कुठलीही निवडणूक असली की शेतीचे प्रश्न आणि पाण्याचा मुद्दा हा कळीचा ठरत असतो. याला यावेळी खतपाणी मिळाले ते कांदा निर्यातबंदी अन् मराठा आरक्षणामुळे.
सत्ताधारी भाजपने मराठा आरक्षण देण्याकडे केलेल्या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणात असलेल्या शरद पवार समर्थकांनी उघडपणे भगरे यांना साथ दिली. केंद्र सरकारने मागील वर्षात दोन ते तीन वेळेस कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने या भागातील कांदा उत्पादकांचे कोट्यवधीचे नुकसान झाल्याचा संतापही शेतकऱ्यांच्या मनात होता. (latest marathi news)
त्यातच मंत्री असलेल्या डॉ.भारती पवार या जनसंपर्क ठेवण्यात कमी पडल्याची नाराजी देखील होती .विशेष म्हणजे भाजपमधून देखील सुप्त नाराजी दिसून आली, त्यातच राष्ट्रवादीने सर्वसामान्य कुटुंबातील शिक्षक असलेल्या भगरे यांना उमेदवारी दिल्याने भाजपवरील रोष आणि नवीन चेहरा म्हणून मतदारांनी त्यांना पसंती दिली.
निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय स्थित्यंतरे देखील दिसून आली. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांच्यासह शिवसेना (उबाठा) पक्षाचे आमदार नरेंद्र दराडे, संभाजी पवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुणाल दराडे, माजी सभापती संजय बनकर यांनी गावोगावच्या प्रचार दौऱ्यात सहभागी होत भगरे यांना साथ दिली.
लासलगाव भागातून माजी आमदार कल्याणराव पाटील, बाजार समितीचे माजी सभापती जयदत्त होळकर, शिवा सुराशे हेही सक्रिय होते. नेत्यांच्या आवाहनाला जनतेनेही साथ दिल्याने येथून बदल दिसला. विशेष म्हणजे शिवसेना (उबाठा) पक्षाची तालुक्यात असलेल्या हक्काच्या मतांचाही फायदा भगरे यांना झाला.
महायुतीत मात्र उलटे चित्र दिसले.नाशिकमधून ऐनवेळी उमेदवारीवर पाणी सोडावे लागल्याने नाराज असलेले छगन भुजबळ यांनी संयम राखत दूर राहणेच पसंत केले.मात्र कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांनी डॉ.पवार यांचे काम करण्याच्या सूचना दिल्या होत्या.असे असले तरी स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, वसंत पवार असे चार-दोन जणच भाजपाच्या सभात अन् प्रचारात सक्रीय दिसले.
भाजपचे पदाधिकारी बाबा डमाळे, आनंद शिंदे, तालुकाप्रमुख नाना लहरे, समीर समदडिया, प्रमोद सस्कर यांच्यासह प्रमुख मंडळी प्रचारात सक्रिय होती.मात्र मंत्री डॉ.पवार यांनी गेल्या पाच वर्षात एक-दोन पदाधिकाऱ्यांनाच जवळ केले होते, याचीही सुप्त नाराजी भाजपच्या गोटातून दिसून आली. अर्थात मतदार संघातून भगरे यांना २५ हजारावर मताधिक्य मिळेल हा दावा मात्र येवला शहरासह लासलगाव,विंचूर व काही खेड्यातील मतदारांनी फोल ठरविला.
अर्थात मुस्लिम- दलितांची मतेही राष्ट्रवादीच्या पारड्यात झुकल्याने त्याचा फायदा भगरे यांना झाला. यामुळे भगरे यांना येथून १३ हजार २०५ मतांचे मताधिक्य मिळाले आहे. येवला शहर जनसंघाचे आहे ही पारंपरिक ओळख यावेळी देखील मतदारांनी जपल्याचे दिसले. यापूर्वी तीनही पंचवार्षिकला तत्कालीन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी सर्वपक्षीय नेते आणि मतदारांशी जवळकीचे संबंध टिकविले होते.
यावेळी डॉ. पवार यांना इतर पक्ष सोडाच स्वपक्षीयांनाही खुश ठेवणे जमले नसल्याने याचा फटका बसला आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपला ग्रामीण भागातही संघटन मजबूत करता आले, मात्र त्याचा विधानसभेला किती व कसा फायदा होईल हे काळच ठरवेल.
● उमेदवारांना येथे असे मिळाले मते -
• भास्कर भगरे (राष्ट्रवादी काँग्रेस श.प.) - ९३५००
• डॉ.भारती पवार (भाजपा) - ८०२९५
• बाबू भगरे (अपक्ष) - १६०३९
• मालती ढोमसे (वंचित) - ७५९३
• नोटा - ११७०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.