Godavari Water Management : समाजमन- ‘गोदावरी’चे जलव्यवस्थापन आवश्यक

Nashik News : नाशिक जिल्ह्यातील उगम पावणारी ही नदी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोसमी असल्याने पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे.
Godavari River
Godavari Riveresakal
Updated on

लेखक : ॲड. नितीन ठाकरे

गोदावरी नदीचे महत्त्व नाशिककरांसाठी अनन्यसाधारण आहे. नाशिक जिल्ह्यातील उगम पावणारी ही नदी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोसमी असल्याने पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे, म्हणूनच तिचे खऱ्या अर्थाने जलव्यवस्थापन होण्याची आवश्यकता आहे. यासाठी योग्य प्रयत्नांची गरज आहे. (nashik article by adv nitin thackeray on Water management of Godavari)

गोदावरीच्या जन्माची आख्यायिका मोठी रंजक आहे. एकदा गौतम ऋषी आश्रमात तपश्चर्या करीत होते. त्या वेळी तेथे एक गाय आली व तिने त्यांच्या आश्रमातील त्यांनी लावलेली पिके खायला सुरवात केली. तेव्हा त्या गायीला हाकलण्यासाठी म्हणून ऋषींनी एक गवताची काडी उचलून तिच्याकडे फेकली व आश्चर्य असे झाले की गाय जागीच गतप्राण झाली व ऋषींना गोहत्येचे पाप लागले.

पण, ही गाय कोणती साधी गाय नसून, साक्षात गणपती होते. त्यांनी ऋषींना आपले मूळ रूप दाखवून सांगितले, की दक्षिणेत पाण्याची कमतरता आहे. तेथे गंगेस जाणे भाग आहे व त्यासाठी आपण महादेवांना प्रसन्न करून गंगेस पुन्हा भूतलावर; पण या वेळी दक्षिणपथाच्या दंडकारण्यात बोलवावे, ज्याने त्यांना लागलेले गोहत्येचे पापही धुतले जाईल. गौतम ऋषींनी त्र्यंबकेश्वरला तपश्चर्या करून महादेवाला प्रसन्न केले व महादेवाने गंगेचा एक प्रवाह जटेतून सोडला व गंगा पुन्हा भूमीवर आली आणि तिला नाव मिळाले ‘गौतमी गंगा’. जिला आपण ‘गोदावरी’ असे म्हणतो.

मराठी बोली

गोदावरी नदी महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यांतून वाहणारी देशातील एक प्रमुख नदी होय. गंगेनंतर भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी नदी आहे. भारताची दक्षिणगंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वांत मोठी नदी आहे.

गोदावरी नदीची एकूण लांबी एक हजार ४५६ किलोमीटर असून, सह्याद्री पर्वतरांगेत उगम पावून बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. महाराष्ट्रात गोदावरीची लांबी ६५६ किलोमीटर असून, तिने महाराष्ट्राचे ४९ टक्के क्षेत्र व्यापले आहे. नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली या नऊ जिल्ह्यांतून वाहते.  (latest marathi news)

Godavari River
समाजमन : राष्ट्रवाद अन् राष्ट्रप्रेमाबद्दल नागरिक अधिक जागरूक

गोदावरीच्या उपनद्या

दारणा, प्रवरा, मुळा, बोरा, सिंदफणा, बिंदुसरा, कुंडलिका, सरस्वती, अंजना, गिरिजा, काबरा, दुधना, तेरणा, गिरणा, शिवना, काम, आडवा, खेळणा, मन्याड, पुस, अरुणा, वाघाडी, खुनी, सर, चुलबंद, कोणारी या गोदावरीच्या उपनद्या आहेत. गोदावरी नदी पश्चिम घाटापासून पूर्व घाटापर्यंत विविधतेने नटलेली आहे. सुरवातीला कमी पावसाचा दुष्काळी भाग, तर पुढे साग, बांबूची वने, शेवटी गाळाचा त्रिभूज प्रदेश असे पाहायला मिळते.

आंध्र प्रदेशातील राजमहेंद्री येथे गोदावरी नदीवर बांधलेला २.५ किलोमीटर लांबीचा मोठा रेल्वेपूल आहे. जवळच धवलेश्वरम् येथे या नदीवर १८५७ मध्ये बंधारा घातला आहे. त्याला ‘अ‍ॅनिकट’ म्हणतात. तेथूनच गोदावरीचा दक्षिणेकडे प्रवास सुरू होतो व याच ठिकाणी त्रिभूज प्रदेश सुरू होतो. गोदावरी नदीचे वेगवेगळे नदी प्रवाह तयार होतात.

त्यात पूर्वेस गौतमी गोदावरी आणि पश्चिमेस वशिष्ठ गोदावरी असे दोन मुख्य प्रवाह असून, वैनतेय हा आणखी एक प्रवाह आहे. गोदावरीच्या वेगवेगळ्या प्रवाहांना कालव्यांद्वारे जोडले असून, या कालव्यांतून जलवाहतूक चालते. शेवटी हे गोदावरीचे प्रवाह यनम्, राझोले आणि नरसपूर यांच्याजवळ बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात.

आध्यात्मिक, धार्मिक महत्त्व

धार्मिक विधीसाठी हिंदू देशभरातून गोदातीरी येतात. कालसर्पयोग, नारायण नागबली, पिंडदान यांसारखे अनेक धार्मिक विधी नाशिक येथे गोदावरी तीरावर व त्र्यंबकेश्वर येथे केले जातात. नाशिक, नेवासे, पैठण, राजमहेंद्री, कोटापल्ली अशी अनेक धार्मिक तीर्थक्षेत्रे

गोदावरी नदीकाठावर आहेत. नाशिक येथे दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. या वेळी देशभरातून लाखो भाविक गोदावरीत स्नान करण्यासाठी येत असतात. वनवासात असताना प्रभू श्रीरामाचे वास्तव्य गोदावरीतीरी होते.  (latest marathi news)

Godavari River
Nashik IT Park: समाजमन - ‘आयटी पार्क’मुळे विकासाचा वारू दौडणार

गोदावरी व उपनद्यांवरील धरणे

गोदावरी नदी मोसमी असून, ती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. एकूण पाण्याच्या ८० टक्के पाणी पावसात वाहून जात असल्याने उर्वरित महिने नदीचे पात्र कोरडे पडते. परिणामी, शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्‍भवतो. अशा वेळी जलव्यवस्थापन करणे हा एकच पर्याय उरतो.

गोदावरी महाराष्ट्रातील सर्वांत मोठी नदी असल्याने व ती ४९ टक्के क्षेत्र व्यापत असल्याने तिच्यावरील जलव्यवस्थापन प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरतात. नाशिकपासून जवळच गंगापूर येथे गोदावरी नदीवर गंगापूर धरण बांधण्यात आले आहे. हे धरण भारतातील पहिले मातीचे धरण आहे. गोदावरीच्या सुरवातीच्या टप्प्यात असलेले नाशिक जिल्ह्यासाठी महत्त्वाचे आहे.

जायकवाडी प्रकल्प

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथे महाराष्ट्रातील सर्वांत मोठा जलव्यवस्थापन प्रकल्प जायकवाडी येथे उभारण्यात आला आहे. याच्या जलाशयास ‘नाथसागर’ असे म्हणतात. या धरणामुळे ४५ हजार हेक्टर एवढी जमीन ओलिताखाली आली. जायकवाडी प्रकल्पाचा पूर्ण क्षमतेने वापर झाल्यास एक लाख ३२ हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येऊ शकते. या प्रकल्पामुळे मराठवाड्यात दुष्काळी परिस्थितीवर काही प्रमाणात मात करणे शक्‍य झाले आहे.

उपनद्यांवरील धरणे

तेरणा, पूर्णा, अपर पैनगंगा, भंडारा सिंचन प्रकल्प, मुळा, अपर प्रवरा, पैनगंगा, मनार, कंधार, दुधना, मंजिरा नदीवरील निजामसागर, अपर इंद्रावती, जलापूट बंधारा असे अनेक छोटे-मोठे प्रकल्प गोदावरी नदीच्या उपनद्यांवर आहेत.

(लेखक मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस आहेत.)

Godavari River
Women Leadership : समाजमन- पुरुषप्रधान संस्कृतीत महिला नेतृत्वाला महत्त्व

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com