निखिल रोकडे : सकाळ वृत्तसेवा
Nashik News : सरकारी कर्मचाऱ्यांकडून सर्वसामान्य नागरिकांना कायम कटू अनुभव येत असतात. पण याला काही अपवाद आहे. सिन्नर येथील ज्येष्ठ नागरिक भरत रणमाळे एसटीतून प्रवास करत असताना अचानक त्यांना अस्वस्थ वाटून बेशुद्ध झाले. बस वाहक शीतल साळवे यांनी समयसूचकता व कार्यतत्परता दाखवून त्यांना जागेवरच प्रथमोपचार (सीपीआर) दिला. यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे प्राण वाचले. (Bus conductor Shital Salve showing punctuality)
समाजामध्ये माणुसकी हरवत चाललेली आहे. याचा प्रत्यय आपल्याला अगदी पावला पावलावर येतो. अगदी समोर अपघात घडतो आणि नागरिक मदत करण्यापेक्षा त्या घटनेचे लाइव्ह शूटिंग किंवा फोटोशूट करण्यासाठी अधिक प्राधान्य देतात. मात्र आजही त्यास काही घटक अपवाद आहे. अशांमुळेच माणुसकी काही प्रमाणात तरी जिवंत आहे, असे काही प्रसंगावरून जाणवते.
सकाळी साडेनऊ वाजता सिन्नर स्थानकातून नाशिककडे वाहक शीतल साळवे प्रवाशांना घेऊन निघाल्या. बसमध्ये ज्येष्ठ नागरिक भरत रणमाळे व त्यांची पत्नी मंगल यासह प्रवास करत होते. द्वारकाजवळ बस पोचल्यानंतर रणमाळे यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. काही क्षणातच ते बेशुद्ध झाले. त्यांच्या पत्नी मंगल यांनी त्यांना हलविण्यास व मोठमोठ्याने आवाज देण्यास सुरवात केली.
सदर बाब शीतल साळवे यांच्या लक्षात आल्यानंतर त्या धावत रणमाळे यांच्याजवळ गेल्या. त्यांची नस तपासणी केल्यानंतर ठोके अत्यंत मंद जाणवत होते. जवळपास दहा पंधरा सेकंदानंतर एक ठोका येत आहे, असे लक्षात आले. त्यांना जागेवर झोपवून हाताचा तळवे खोलगट करून शीतल साळवे यांनी त्यांच्या छातीवर दाब देण्यास सुरवात केली. सलग सहा ते सात मिनिटं दाब दिल्यानंतर भरत रणमाळे अचानक शुद्धीवर येऊन जोरजोरात खोकू लागले आणि त्यांचा अडकलेला श्वास मोकळा झाला. (latest marathi news)
शीतल साळवे यांनी त्यांच्या जवळील कागदपत्रे बघितले असता दवाखान्याच्या फाइल त्यांच्याजवळ आढळल्या व त्यांना त्वरित आपण सिव्हिल हॉस्पिटलला जाऊया असे रणमाळे दाम्पत्याला सुचविले. मात्र प्रकृती थोडी स्थिर वाटल्यानंतर आम्ही स्वतःच पंचवटी येथील हॉस्पिटलमध्ये जातो, असे सांगितले.
शासकीय कर्मचाऱ्याकडून मिळणाऱ्या अशा अनुभवामुळे आश्चर्य वाटणे स्वाभाविकच. पण भरत रणमाळे यांना त्यांनी दिलेल्या प्रथम उपचारामुळे किमान हॉस्पिटलमध्ये जाऊन पुढील उपचार घेता आले. त्यामुळे बसमधील प्रवासी व रणमाळे कुटुंबीय भावनिक होऊन शीतल साळवे यांचे कौतुक केले.
"समाज माध्यमावर हृदयविकाराचा त्रास झाल्यानंतर प्रथमोपचार काय करावे याबद्दल माहिती होती. एसटी महामंडळातर्फे ही प्रवाशांना अचानक आरोग्याची समस्या प्रवासादरम्यान उद्भवल्यास वाहक व चालकाने काय करावे. याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले होते. या ज्ञानाच्या आधारे प्रथमोपचार दिले. शासकीय कर्मचारी म्हणून कर्तव्य बजावताना त्याचा उपयोग झाला याबद्दल आत्मिक समाधान आहे."
- शीतल साळवे, वाहक, राज्य परिवहन
"मला अचानक त्रास सुरू झाला व त्यानंतर माझी शुद्ध हरपली. शुद्धीवर आल्यानंतर पत्नी व शीतल साळवे समोर दिसल्या. नंतर लक्षात आले, की त्यांनी प्रथमोपचार केल्यामुळे शुद्धीवर आलो. शासकीय कर्मचारी काम करत असताना त्यांनी कर्तव्य योग्यरीत्या बजावले. त्यांच्यामुळे पुढील उपचार घेणे शक्य झाले. मी व माझे कुटुंबीय त्यांचे मनस्वी आभार व्यक्त करतो." - भरत रणमाळे, ज्येष्ठ नागरिक, सिन्नर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.