Ramadan Eid 2024 : शहरात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी झाली. येथील पोलिस कवायत ईदगाह मैदानावर झालेल्या मुख्य नमाजपठणात लाखाहून अधिक मुस्लीम बांधव सहभागी झाले. येथील नमाजपठण दरम्यान एका युवकाने पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ पॅलेस्टिनी ध्वज फडकावल्याने खळबळ उडाली. साध्या वेषातील पोलिसांनी या तरुणाला बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. मात्र जमावाची मानसिकता पाहून तुर्त कारवाई टाळण्यात आली.
ध्वज फडकावल्याच्या या प्रकारामुळे नमाजपठणाला काहीसा गालबोट लागला. शहरातील अन्य भागातील तेरा वेगवेगळ्या मैदानांवर सामुहिक नमाजपठण पार पडले. या दरम्यान पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. जिल्हा पोलिस अधिक्षक विक्रम देशमाने येथे तळ ठोकून होते. (Nashik Celebrate Ramadan Eid malegaon news)
पोलिस कवायत ईदगाह मैदानावर आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी नमाज पढविली. नमाज पठण व दुवा झाल्यानंतर आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सोशल मिडीयाच्या गैरप्रकारावर व आत्महत्यांच्या घटनांवर प्रकाशझोत टाकत नाराजी व्यक्त केली.
तरुण पिढी मोबाईलच्या नादी लागून बरबाद होत आहे. त्यापासून सावध राहण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल म्हणाले, की अल्लाहच्या दरबारात आपण ईद उल फित्रची नमाज अदा केली आहे. आपण ईदचा शुक्राणा अदा करण्यासाठी आलो आहाेत.
आगामी निवडणुकीत प्रत्येकाने मतदान करुन आपण हिंदुस्थानी असल्याचे कर्तव्य बजवावे असे आवाहन केले. सीएए व एनआरसी बद्दल नाराजी व्यक्त करतांना हा प्रकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास या घोषणेला छेद देणारा असल्याचे सांगितले. देशप्रेमी म्हणवून घेणारे देशाची धर्मनिरपेक्षता धोक्यात आणून संविधानाला नख लावू पाहत आहेत असा आरोप करतांनाच मुस्लीमांचा त्यात कुठलाही सहभाग नाही ही समाधानाची बाब असल्याचे सांगितले.
शहरातील भूमाफिया १२ बाय २५ च्या भुखंडांची अवैध विक्री यातील गैरप्रकारावर त्यांनी टिका केली. हा गरीबांना लुटण्याचा प्रकार आहे. बिनशेती जमीन खरेदी करु नका. नशेपासून दुर रहा. एका रात्रीतून श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहू नका. माेबाईलपासून दूर रहा. कर्जाच्या विळख्यात व अनैतिक संबंधात अडकू नका असा सल्ला त्यांनी दिला. (latest marathi news)
सकाळी साडेआठला मुख्य नमाजपठण पार पडले. यासाठी पहाटे सहापासून मुस्लीम बांधवांनी पाेलिस कवायत मैदानावर येण्यास सुरुवात केली होती. या मैदानाकडे येणारे सर्व जोड रस्ते बॅरेकेटींग लावून बंद करण्यात आले होते. मुख्य रस्त्यासह पोलिस कवायत मैदानावर चोख बंदोबस्त होता.
राष्ट्रीय एकात्मता व शांतता समिती, पोलिस व महसूल प्रशासनातर्फे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांचा सत्कार करण्यात आला. नमाज पठणानंतर मुस्लीम बांधवांसह हिंदू-मुस्लीम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेत रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. मुख्य नमाजपठणानंतर घरोघरी जाऊन मुस्लीम बांधवांनी शिरखुर्मा व विविध खाद्यपदार्थांच आस्वाद घेतला.
आजपासून आगामी तीन दिवस शहरातील यंत्रमागाचा खडखडाट सणाच्या पार्श्वभूमीवर बंद असेल. खाद्यपदार्थांची दुकाने, हॉटेल, उद्यान, सिनेमागृहांमध्ये आज मोठी गर्दी होती. अप्पर पोलिस अधिक्षक अनिकेत भारती, सहाय्यक पोलिस अधिक्षक तेगबिरसिंह संधू, सचिन गुंजाळ आदींसह विविध पोलिस ठाण्यांचे निरीक्षक परिस्थितीवर लक्ष ठेवून दिवसभर गस्त घालत होते.
"पॅलेस्टाईन आपल्यापासून खूप दूर आहे. पॅलेस्टीनी मुस्लीम बांधवांवर अन्याय, अत्याचार होत आहे. माणुसकीच्या नात्याने या प्रकारांचा निषेध करणे आवश्यक आहे. मात्र ५० मुस्लीम राष्ट्र या संदर्भात मुग गिळून गप्प बसली आहेत. ही सर्व राष्ट्र गुलाम झाली आहेत. आपण पॅलेस्टिनी मुस्लीम बांधवांसाठी दुवा पठणाशिवाय काही करु शकत नाही. येथील नमाज पठणाच्यावेळी पॅलेस्टाईनचा ध्वज फडकविणाऱ्या तरुणाशी आपला कुठलाही संबंध नाही."
- मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल पेशेइमाम, जामा मशिद तथा आमदार मालेगाव मध्य
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.