नाशिक : महापालिकेच्या सिटीलिंक कंपनीच्या ढिसाळ नियोजनामुळे दोन वर्षात तब्बल नऊ वेळा संप झाला आहे. आताही गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संपामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्ण कोलमडून नाशिककरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
त्याचबरोबर बस डेपोत उभ्या असल्याने दररोज एका बसमागे चार हजार रुपये ऑपरेटर कंपन्यांना मोजावे लागत आहे. २१० बस याप्रमाणे साडेआठ लाख रुपये चुकीच्या करारनाम्यामुळे द्यावे लागत आहे. पाच दिवसात जवळपास ४२ लाख रुपये विनाकारण ऑपरेटर कंपन्यांना मोजावे लागले असून, ढिसाळ नियोजनामुळे कररूपी पैशांचा चुराडा प्रशासनाकडून झाला आहे. (Nashik Citylink Bus Strike daily loss of eight half lakh to NMC rickshaw fair rates hike marathi news)
गेल्या पाच दिवसांपासून नाशिक महापालिकेची सिटीलिंक अर्थात, नाशिक महानगर परिवहन महामंडळाची शहर बससेवा ठप्प झाली आहे. यामुळे महापालिकेला १ कोटी रुपयांचा आर्थिक फटका तर बसला आहेच. शिवाय प्रवाशांची परवड होत आहे. ठेकेदार, वाहकांकडून मनमानी कामकाज सुरू आहे.
नवीन ठेकेदार नेमणुकीसाठी प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी अद्यापही नवीन ऑपरेटर कंपनीची नियुक्ती नाही. त्यामुळे संप लांबण्याची शक्यता आहे. दरम्यान, संपामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्या शिवाय महापालिकेलादेखील आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
महापालिकेने यापूर्वी चुकीच्या पद्धतीने ऑपरेटर कंपन्यांशी करार केले आहेत. बस धावल्या नाही तरी महापालिकेला बसचे किलोमीटर प्रमाणे पैसे द्यावे लागणार आहे. संपामुळे बस बंद असेल तरी वीस टक्के पैसे द्यावे लागणार आहे. ८५ रुपये किलोमीटरप्रमाणे दररोज पैसे अदा केला जातात.
त्यासाठी दोनशे किलोमीटर बस धावण्याची अट आहे. संप झाल्यानंतर बस डेपोत उभ्या राहिल्यास वीस टक्के पैसे द्यावे लागणार आहे. शहरात दोन बस ऑपरेटर आहेत. नाशिक रोड डेपोतून ४०, तर तपोवन डेपोतून २१० बस धावतात. तपोवन डेपोतील चालक-वाहकांनी संप पुकारला आहे. त्यामुळे २१० बसचे प्रत्येकी चार हजार रुपयांप्रमाणे साडेआठ लाख रुपये दररोज अदा करावे लागणार आहे. पाच दिवसात ४२ लाख रुपये संपामुळे सिटीलिंक कंपनीला अदा करावे लागणार आहे. (latest marathi news)
आंदोलन कशासाठी?
सिटीलिंकच्या वाहकांनी वेतन तसेच बोनसच्या मागणीसाठी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. बससेवा सुरू झाल्यापासून नऊ वेळा आंदोलन करण्यात आले आहे. दोन वर्षात नऊ वेळा संप होवूनही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. महापालिकेकडून वेतनाचे पैसे अदा करूनही ठेकेदारांकडून कर्मचाऱ्यांना वेतन मिळत नाही.
जानेवारी २०२४ पर्यंतच्या वेतनाचे पैसे मक्तेदाराला मॅक्स सिक्युरिटीज या कंपनीचा कारभार सुरळीत व योग्य नसल्याच्या कारणावरून महापालिकेने दोन महिन्यापूर्वी युनिटी नामक संस्थेला नाशिक रोड येथील आगारातील बससाठी ठेका दिला. युनिटीकडे पर्याय म्हणून बघितले, परंतु संप काळात युनिटीलादेखील कर्मचारी पुरविता आले नाही.
दोन वर्षात नऊ वेळा संप
१ सप्टेंबर २०२२, ६ डिसेंबर २०२२, ६ एप्रिल २०२३, ११ मे २०२३, १८ व १९ जुलै २०२३, ४ ऑगस्ट २०२३, २२ नोव्हेंबर २०२३ तसेच फेब्रुवारी २०२४ व १४ मार्च २०२४ पासून असा नऊ वेळा संप पुकारण्यात आला आहे. सध्या सुरू असलेला संप सर्वात मोठा आहे. दोन वर्षात नऊ वेळा संप होत असेल तर ठेकेदारावर कारवाई का होत नाही, ठेकेदारांचे व प्रशासनातील अधिकाऱ्यांचे लागेबांधे आहेत का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. (latest marathi news)
पाच दिवसांपासून नाशिक शहराची सार्वजनिक वाहतूक करणारी महापालिकेची सिटीलिंक बससेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे नाशिककरांना गैरसोयीला सामोरे जावे लागते आहे. दुसरीकडे सिटीलिंक बससेवा बंद असल्याने रिक्षाचालकांकडून प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारून लुट सुरू केली आहे. यात नाशिककरांचा नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागते आहे.
महापालिकेच्या सिटीलिंक बससेवा गेल्या चार दिवसांपासून ठप्प आहे. ही सेवा देणाऱ्या एका ठेकेदाराकडील बसचालक-वाहकांनी प्रलंबित मागण्यासाठी संप पुकारला आहे. परंतु नेहमीच होणाऱ्या या संपामुळे नाशिककर प्रवासी नाहक वेठीला धरले जात आहेत. तोडगा न निघू शकल्याने सोमवारीही सिटीलिंक बस रस्त्यावर धावल्या नाहीत. यामुळे गेल्या पाच दिवसांपासून प्रवाशांना रिक्षाचालकांच्या मुजोरीला सामोरे जावे लागते आहे.
शहरातील काही मार्गांवर बसेस नाही. त्यामुळे त्या मार्गांवरील प्रवाशांना रिक्षांचा आधार घ्यावा लागतो आहे. परंतु या संधीचा फायदा घेत रिक्षाचालकांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारले जात आहे. मेळा बसस्थानक, ठक्कर बाजार बसस्थानक, सीबीएस आणि महामार्ग बसस्थानक या ठिकाणी रिक्षाचालकांकडून प्रवाशांची अक्षरश: लुट केली जात आहे. विशेषतःः रात्री वेळी रिक्षाचालकांकडून प्रवाशांची अडवणूक केली जात आहे. त्याचप्रमाणे, रिक्षामध्ये जादा प्रवासी बसवून प्रवाशांना धोकादायकरीत्या प्रवास करावा लागतो आहे. याबाबत प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
ऑनलाइन बुकिंग वाढली
शहरात ओला रिक्षाचालक असून, सिटीलिंकच्या संपामुळे प्रवासी ऑनलाइन रिक्षाचा मार्ग निवडताना दिसत आहेत. विशेषतः महाविद्यालय, खासगी कार्यालयात जाणारे ओला रिक्षाचा पर्याय वापरताना दिसत असून हे प्रमाण गेल्या पाच दिवसात वाढल्याचे ओला रिक्षाचालक सोनू शेवाळे यांनी सांगितले.
"दररोज सकाळी पवननगर येथून सिव्हिल हॉस्पिटलला उपचारासाठी यावे लागते. परंतु सध्या बस बंद असल्याने रिक्षाने यावे लागते आहे. बसपेक्षा रिक्षाचालक जादा भाडे घेतो आहे. तसेच रिक्षाचालक जादा प्रवासी बसवितात. मनस्ताप सहन करावा लागतो आहे."
- सोमनाथ दहे, ज्येष्ठ नागरिक
"मेनरोड परिसरात दुकान असल्याने दररोज सकाळी बसने यावे लागते. रात्री घरी परतताना मात्र बस नसल्याने रिक्षाचालक जादा भाडे आकारत आहेत. त्यामुळे आर्थिक झळ सोसावी लागते आहे." - मीना खरोटे, महिला प्रवासी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.