नाशिक : सिटीलिंकचा संप सुरू असल्याने तुरळक बसगाड्या रस्त्यावर धावत आहेत. यामुळे मात्र विद्यार्थी सर्वाधिक प्रभावित होत आहे. सध्या परीक्षांचा काळ सुरू असल्याने शैक्षणिक कामगिरी प्रभावित होण्याची भीती आहे. शालेय, महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थी मेटाकुटीला आले असून, ऐन परीक्षा काळात बसची तासनतास प्रतीक्षा करण्याची वेळ त्यांच्यावर ओढवते आहे. (Nashik Citylink Bus Strike exam period students marathi news)
कॉलेज रोड, गंगापूर रोडसह अशोकस्तंभ, पंडित कॉलनी, शरणपूर रोड आदी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात शैक्षणिक संस्था आणि खासगी क्लासेस आहे. त्यामुळे विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात. त्यासाठी त्यांच्याकडून सिटी बसने प्रवासाला प्राधान्य दिले जाते.
शहराच्या चारही बाजूंनी महापालिका हद्दीबाहेरील गावांपर्यंत सिटीलिंकच्या बस जात असल्याने तेथील विद्यार्थ्यांची भिस्तदेखील या बसवर असते. संपाचा सर्वाधिक फटका विद्यार्थी वर्गाला बसतो आहे. त्यामुळे तातडीने संपावर तोडगा काढत विद्यार्थी वर्गाला दिलासा द्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालकांकडून केली जाते आहे.
‘लिफ्ट’ च्या भरवशावर ग्रामीण भागातील विद्यार्थी
ओझर, पिंपळगाव बसवंतपासून तर सिन्नर, त्र्यंबकेश्वर, भगूर, देवळाली कॅम्प, वाडीवऱ्हेपर्यंतचे विद्यार्थी सिटी बसने शहरात येत असतात. परंतु संपामुळे या विद्यार्थ्यांना रस्त्यावर उभे राहत खासगी वाहनांना गळ घालून ‘लिफ्ट’ मागण्याची वेळ ओढवते आहे. काही वाहनचालकांकडून सहकार्य मिळत असले तरी अनेकांकडून नकार मिळत असल्याने वाहन उपलब्ध होण्यात विद्यार्थ्यांना अथक परिश्रम घ्यावे लागत आहेत.
कामगिरी खालावल्यास जबाबदार कोण?
सध्या दहावीचे पेपर सुरू असून, वरिष्ठ महाविद्यालय स्तरावर प्रथम ते अंतिम वर्ष पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरू आहेत. अशात बसच्या प्रतीक्षेत तासनतास वाट पाहण्यात वेळ वाया जात असल्याने अभ्यासावर त्याचा परिणाम होत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे परीक्षेतील कामगिरी खालावल्यास जबाबदार कोण राहणार असा प्रश्नदेखील उपस्थित केला जातो आहे. (latest marathi news)
रिक्षा, टॅक्सीचालकांची मुजोरी
परिस्थितीचा फायदा उचलताना काही रिक्षाचालक, टॅक्सीचालकांकडून जादा प्रवासी भाड्याची मागणी केली जाते आहे. तसेच क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करत नियमांना वाटाण्याच्या अक्षता वाहिल्या जात असल्याचे सध्याचे चित्र आहे.
"केटीएचएम महाविद्यालयात शिक्षण घेत असून, सध्या आमची परीक्षा सुरु आहे. पेपरला वेळेत पोचण्यासाठी धावपळ करावी लागते आहे. बऱ्याच वेळा रिक्षाने प्रवास करावा लागत असून, जादा पैसे मोजावे लागत आहेत."- अभिजित राऊत, नाशिक रोड
"बसच्या संपामुळे परीक्षेच्या वेळेपासून किमान दोन तास आधी महाविद्यालयासाठी निघावे लागते आहे. तसेच पेपर सुटल्यानंतर परतण्यास दोन ते अडीच तासांचा वेळ वाया जातो आहे. यामुळे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती आहे."- प्रवीण पाटील, आडगाव
"वसतिगृहात वास्तव्यास असून, रिक्षाने प्रवास करण्यासाठी जादाचे पैसे नसतात. परंतु संपामुळे गैरसोय होत असल्याने आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो आहे. लवकरात लवकर तोडगा निघण्याची अपेक्षा आहे."- सुजाता चव्हाण, बोधलेनगर
"सध्या दहावीच्या परीक्षा सुरु असून, बसच्या प्रतीक्षेत सुमारे दीड ते दोन तासांचा वेळ वाया जातो आहे. रिक्षाचालकांकडून अव्वाच्या सव्वा भाडे मागणी होत असून, विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होते आहे."- रितेश आहिरे, अंबड
"सिटी बसच्या पाससाठी भरलेले पैसे तर वाया जात असून, याशिवाय रिक्षा प्रवासात जादाचे पैसे मोजावे लागत आहेत. संप कालावधीतील वाया गेलेल्या मासिक पासपोटीच्या रक्कमेचा परतावा मिळावा."- सिद्धार्थ दोंदे, अंबड गाव
"सध्या परीक्षा सुरु असून, संपामुळे परीक्षेत वेळेवर पोचण्याचे आव्हान असते. अभ्यासावरही संपाचा परिणाम होत असून, तातडीने उपाययोजना करत विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची आमची मागणी आहे."- कृणाली महाजन, मखमलाबाद रोड
"माझ्यासह शहरातील अनेक विद्यार्थ्यांचे सध्या हाल होत आहेत. टॅक्सी, रिक्षांचे भाडे परवडण्यासारखे नाहीत. मर्यादित बस सुरु असल्याने गर्दीत प्रवास करावा लागत आहे. संपामुळे विद्यार्थिनींचे सर्वाधिक हाल होत आहेत."- रुचा पाटील, खुटवडनगर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.