पिंपळगाव बसवंत : लोकसभा निवडणूक आचारसंहिता सुरू असल्यामुळे ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिसांचे कोम्बिग ऑपरेशन जोरात सुरू झाले आहे. सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. महामार्गावर गस्त घालून संशयास्पद वाहनांच्या तपासणीला वेग आला आहे. परवाना असलेली शस्त्र नागरिकांकडून जमा करण्यात आली आहे. (Nashik Code of Conduct Police combing operation for law order Vehicle inspection at Pimpalgaon marathi news)
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात ‘न भुतो...’ अशी काट्याची लढत भाजपच्या डॉ. भारती पवार व महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांच्यात होत आहे. निवडणूक जिंकण्यासाठी ‘साम-दाम-दंड-भेद’ यासह विविध मार्गांचा अवलंब केला जाऊ शकतो. आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये, मद्य तसेच पैसे वाटपासारख्या गैरप्रकाराला आळा बसवा म्हणून दिंडोरी मतदारसंघात ग्रामीण पोलिसांनी महामार्गासह विविध ठिकाणी दिवसा व रात्री वाहनांची तपासणी करण्याची मोहिम हाती घेतली आहे.
अनपेक्षित तपासणी मोहिमेमुळे सराईत गुन्हेगारांच्या हालचालींना ब्रेक बसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. पिंपळगांव बसवंत येथील टोलनाक्यासह निफाड, येवला, दिंडोरी, चांदवड आदी तालुक्यांमध्ये वाहनांची विशेष झाडाझडती सुरू आहे. संशयास्पद वाहने दिसल्यास कसून चौकशी केली जात आहे.
गुन्हेगारांचे धाबे दणाणले
वाहन तपासणीबरोबरच सराईत गुन्हेगारांची ब्लॅकलिस्ट तयार करण्यात आली आहे. गुन्हेगारांची आश्रयस्थाने पोलिसांच्या रडारवर आहेत. गुंड प्रथमेश केदार उर्फ गुंग्या तडीपार असताना देखील पिंपळगावात उजळ माथ्याने फिरत होता. पिंपळगांव पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
पोलिसांनी टार्गेट केल्याने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे. निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस प्रशासन डोळ्यात तेल घालून काम करताना दिसत आहे. दरम्यान, परवानाधारक नागरिकांकडून शस्त्रही जमा करण्यात आली आहेत.
"निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी अचानक तपासणीसह विविध मोहिमा राबविल्या जात आहे. सराईत गुन्हेगारांवर करडी नजर आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कोम्बिग ऑपरेशन राबविले जात आहे."- दुर्गेश तिवारी, पोलिस निरीक्षक, पिंपळगाव बसवंत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.