Mumbai Nashik Highway Condition Sakal Ground Report
नाशिक : मुंबई- आग्रा महामार्गावरील नाशिक- मुंबई द्रुतगती महामार्गांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. जागोजागी खड्डे, ठिकठिकाणी अंडरपास पुलांचे रखडलेली कामे यामुळे प्रवासाचा वेळ दुपट झाला आहे. याकडे केंद्र अन् राज्य सरकारचेही दूर्लक्ष झाले असून, ‘खड्ड्यांची बोंब’ उठल्यानंतर मंत्र्यांकडून बैठका घेत ‘तंबी सत्र’ राबविले जाते. प्रत्यक्षात ‘जैसे थे’च असते. नाशिक ते ठाणेदरम्यान औद्योगिक वसाहती, लॉजेस्टीक पार्क, हॅण्डलुम पार्क असून, अवघ्या तीन ते साडेतीन तासांच्या प्रवासाला सहा तासापेक्षाही अधिकचा वेळ खर्ची पडत असल्याने त्याचा आर्थिक फटका या उद्योगांना बसतो आहे. गत आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कसाऱ्यापर्यंत महामार्गाची पाहणी केली. खड्डे बुजविले, परंतु वाहनांच्या गतीला ब्रेक लागतात त्या अंडरपासच्या कामांबाबत मात्र सोयस्कररित्या चुप्पी साधली. यामुळे वाहनधारकांना होणारा त्रास तसाच आहे.