पिंपळगाव बसवंत : बहुप्रतिक्षेनंतर टोमॅटोला आठशे रूपये प्रतिक्रेट दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये काहीसे समाधानाचे वातावरण होते. पण टोमॅटोला मिळणारा सोन्याचा भाव काही अपप्रवृत्तीच्या डोळ्यात खुपला. मुखेड (ता.निफाड) येथे शनिवारी (ता.२७) मध्यरात्रीच्या सुमारास एका माथेफिरूने दहा शेतकऱ्यांच्या शेतातील काढणीला आलेल्या टोमॅटोच्या पिकांवर विळा, कोयत्याने वार करून पिकांची नासधूस केली.
मिळत असलेला टोमॅटोचा भाव व झालेला खर्च पाहता तीन लाख रुपयांहून अधिक आर्थिक नुकसान शेतकऱ्यांचे झालेले आहे. मनोरूग्णाच्या या कृतीमुळे शेतकऱ्यांवर आता रात्रीच्या वेळी पिकाची राखण करण्याची वेळ आली आहे. (Destruction of crop of 10 farmers by psycho in Mukhed)
तीन वर्षानंतर टोमॅटो उत्पादकांना सरासरी आठशे रुपये क्रेट असा आकर्षक भाव मिळतो आहे. टोमॅटोच्या मिळणाऱ्या दराला विकृत मनोवृत्तीची दृष्ट लागली आहे. मुखेड येथील शेतकरी निर्यातक्षम टोमॅटो उत्पादनात आघाडीवर असतात. त्यासाठी अधिकचा खर्च करतात.
यंदाही मोठ्या प्रमाणात मुखेडमध्ये टोमॅटोची लागवड झाली आहे. सध्या काढणी सुरू असून दराच्या तेजीने शेतकऱ्यांमध्ये कष्टाची चीज झाल्याची भावना आहे. पण शनिवारची मध्यरात्र मुखेडच्या दहा शेतकऱ्यांच्या पिकासाठी वैरी ठरली. एका माथेफिरूने मुखेडच्या पिंपळगाव रस्त्यावरील एमआयडीसीलगत विळा अथवा कोयत्यासारखे धारदार हत्याराने परिसरातील दहा शेतकऱ्यांच्या शेतातील दोन गल्ल्यामधील टोमॅटोच्या पिकांवर वार केले.
तब्बल वीस गल्ल्यांमध्ये त्याने धुडगूस घातला. शेतात टोमॅटो विखुरले होते, तर काही झाडे उखडून टाकली होती. यासोबतच परशराम पवार या शेतकऱ्याच्या भोपळ्याच्या पिकाचीदेखील त्याने नासाडी केली. सकाळी संबंधित शेतकरी शेतात टोमॅटोची काढणी करण्यासाठी आले असताना हा प्रकार लक्षात आला.
हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू अनावर झाले. मल्चिंग पेपर, खते, बियाण्याचा खर्च, तीन महिने औषध फवारणी यासह काबाडकष्ट करून फुलविलेल्या टोमॅटो पिकाची नासाडी झाली. त्यामुळे सुमारे तीन लाख रुपयांहून अधिक आर्थिक झळ शेतकऱ्यांना बसली. (latest marathi news)
नुकसान झालेले शेतकरी...
देवदत्त भास्कर शेळके,दत्तात्रय राजाराम पवार,शरद पोपटराव शेळके,परसराम राजाराम पवार,शरद श्रीराम शेळके,बाळासाहेब निवृत्ती पवार,निखिल विश्वनाथ जाधव,नामदेव कारभारी शेळके,कैलास संपतराव सताळे,प्रतापराव महादू पवार
"तीन वर्षानंतर टोमॅटोच्या पिकातून चांगले आर्थिक उत्पन्न होत होते. मोठ्या कष्टाने व आर्थिक गुंतवणूक करून फुलविलेल्या टोमॅटोच्या पिकांचे माथेफिरूकडून मोठे नुकसान झाले आहे. पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी."
- परसराम पवार, नुकसानग्रस्त शेतकरी, मुखेड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.