Nashik News : लासलगाव-चांदवड रस्त्यावर सोमवारी (ता. ८) पहाटे दोनच्या सुमारास पाठलाग सुरू असताना हरनूल शिवारात मद्यतस्करी करणाऱ्या क्रेटा कारचालकाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वाहनाला धडक दिली. यात वाहन रस्त्यालगतच्या शेतात जाऊन उटल्याने एक्साइजचे अंमलदार जागीच ठार तर तिघे अंमलदार जखमी झाले होते. (Nashik Crime News)
या प्रकरणात संशयित क्रेटा कारचालक चांदवड न्यायालयात हजर झाला असून, ग्रामीण पोलिसांनी आणखी एकाला गुजरातमधून अटक केली. यात दोन क्रेटा कारही जप्त करण्यात आल्या असून, सात ते आठ मद्यतस्करी करणाऱ्या कारसह संशयितांचा शोध ग्रामीण पोलिस घेत आहेत. दरम्यान, संशयित दोघांना १८ जुलैपर्यंत न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली.
क्रेटा कारचालक देवीश कांतिलाल पटेल (३७, रा. चिंचवाडा, ता.जि. वलसाड, गुजरात), अश्पाक अली मोहम्मद शेख (२२, रा. युनिक अपार्टमेंट, दर्गा रोड, नवसारी, गुजरात) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत. नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी गुरुवारी (ता. ११) पत्रकार परिषद घेत गुन्ह्यातील तपासाची माहिती दिली.
एक्साइजच्या पथकाला रविवारी (ता. ७) रात्री आठ ते दहा कारमधून अवैधरीत्या मद्याची तस्करी सिल्वासा येथून मुंबई-आग्रा महामार्गाने सुरतकडे केली जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यासाठी गरवारे पॉइंट, द्वारका, आडगाव नाका या ठिकाणी नाकाबंदी करून सापळाही रचला होता; परंतु संशयित क्रेटा कार (जीजे १९, डीई ८८८६) चालकाने आडगाव नाक्यावरून छत्रपती संभाजीनगर रस्त्याने निफाडकडून लासलगावमार्गे नेले. (latest marathi news)
त्या वेळी एक्साइजच्या वाहनाने पाठलाग सुरू केला होता. लासलगावमध्ये त्या वाहनाला रोखण्याचा प्रयत्न केला गेला; परंतु ते रेल्वे फाटक येथून निसटले होते. या कारवाईत एक्साइजने लासलगाव पोलिसांच्या दोघा अंमलदारांना सामावून घेतले होते; परंतु पुढे हरनूल शिवारात बंद टोलनाक्याजवळ संशयित चालकाने एक्साइजच्या वाहनाला जाणीवपूर्वक धडक देत पसार झाला.
या अपघातात एक्साइजचे वाहनचालक कैलास कसबे जखमी होऊन ठार, तर एक एक्साइज व दोन पोलिस अंमलदार जखमी झाले होते. या प्रकरणी चांदवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी कसून तपास सुरू केला. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांची पथके गुजरातमध्ये संशयिताच्या मागावर पोचली. दुसरीकडे क्रेटा कारचा संशयित चालक देवीश पटेल हा चांदवड न्यायालयात स्वत:हून हजर झाला.
दुसरा संशयित अश्पाक शेख यास पोलिसांनी गुजरातमध्ये अटक केली. शेख हा दुसऱ्या क्रेटा कारमधून त्याच्या सासऱ्यासमवेत होता. दोन क्रेटा कार जप्त करण्यात आल्या आहेत. ही कामगिरी अधीक्षक विक्रम देशमाने, अपर अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजू सुर्वे, उपनिरीक्षक कांभिरे, शिरोळे, ठोंबरे, सानप, खराटे, जगताप, वराडे, बहिरम, गिलबिले यांच्या पथकाने बजावली.
तस्करीसाठी कार अन् महामार्ग सुरक्षित
अवैध मद्यतस्करांनी गेल्या जूनच्या अखेरच्या आठवड्यापासून गुजरातच्या दिशेने अवैध मद्याची तस्करी सुरू केली होती. त्यासाठी त्यांनी मुंबई-आग्रा महामार्गाची निवड करीत कारचा वापर केला. महामार्गावर कारचे प्रमाण अधिक असल्याने पोलिस वा एक्साइजकडून नाकाबंदी होत नाही. त्यामुळे तस्करांनी सेफ ऑप्शन म्हणून महामार्गावरून क्रेटा, नेस्कॉन, हायर अशा आठ ते दहा कारमधून मद्याच्या तस्करीचा कट रचलेला होता. यापैकी काही कारमधूनच मद्याची तस्करी केली जात होती, तर दुसऱ्या कार मदतीला असल्याचेही तपासात समोर आले आहे.
"या गुन्ह्यातून मद्यतस्करांची पाळेमुळे पोलिस खोदून काढतील. अवैध मद्य कोठून आणि कोणाकडून घेतले; तसेच गुजरातमध्ये कोणाला देणार होते, याचा मुख्य सूत्रधार कोण याचा पोलिस शोध घेत आहेत. त्या संदर्भातील तांत्रिक विश्लेषणानुसार तपास सुरू आहे." - विक्रम देशमाने, पोलिस अधीक्षक, नाशिक ग्रामीण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.