Nashik Crime : नाशिकरोड पोलिसांनी सिन्नर फाटा येथे टपरीवर पानसुपारी घेण्यासाठी थांबलेल्या ज्येष्ठ शिक्षकाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. पीडित शिक्षकाने मद्यपान केलेले नसताना त्यांना नाशिकरोड पोलीस ठाण्यात नेऊन त्यांच्यावर ड्रंक ॲण्ड ड्राईव्हची कारवाई केली आहे. यावरून केवळ कारवाईच्या नावाखाली सर्वसामान्यांना मारहाण करून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारल्याचा आरोप पीडित शिक्षकाने केला आहे. (Nashik Crime teacher brutally beaten by police)
ज्येष्ठ शिक्षक रमेश कवडे यांनी नाशिकरोड पोलिसांच्या काळ्या कारनाम्याची माहिती देताना सांगितले की, ३० जून रोजी रात्री नऊच्या सुमारास ते व त्यांचे शालक जालिंदर उगले हे सिन्नर फाटा येथील टपरीवर पानसुपारी घेण्यासाठी गेले असता, त्यावेळी नाशिकरोड पोलीस ठाण्याचे दोन अंमलदार हे त्याठिकाणी आले आणि काहीही कारण नसताना त्यांनी त्यांच्याकडील लाठीने कवडे याच्या पायावर मारले.
याबाबत कवडे यांनी जाब विचारला असता, संबंधित पोलीस अंमलदाराने पुन्हा मारहाण केली. त्यानंतर दोघांना नाशिकरोड पोलिस ठाण्यात नेऊन सराईत गुन्हेगारासारखी वागणूक देत दोन ते तीन तास बसवून ठेवले. त्यानंतर त्यांच्यावर ड्रंक अॅण्ड ड्राईव्हची कारवाई करीत एका कागदावर बळजबरीने कवडे यांची स्वाक्षरी घेतली.
मात्र या मारहाणीत कवडे याच्या दोन्ही पायांना जबर मुका मार बसला असून व्रण तयार झाले आहेत. याप्रकरणी कवडे यांनी परिमंडळ दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत यांची भेट घेऊन संबंधित पोलीस अंमलदारांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. (latest marathi news)
मद्यपान न करता कारवाई कशी?
रमेश कवडे यांना दुचाकी वा चारचाकी यापैकी कोणतेही वाहन चालविता येत नाही. त्यामुळे ते उगले यांच्यासमवेत दुचाकीवर पाठीमागे बसून टपरीवर गेले होते. उगले हे धार्मिक असून त्यांना कसलेही व्यसन नाही. तसेच, कवडे यांनीही कोणतेही मद्यपान केलेले नव्हते. तरीही संबंधित पोलीस अंमलदारांनी कोणतीही शहानिशा न करता थेट गुन्हेगारांसारखी मारहाण करून कारवाई केल्याचे आश्चर्य व्यक्त होते आहे.
चोर सोडून संन्याशाला शिक्षा
शहरात दररोज शेकडो वाहनचालक मद्यपान करून वाहने चालवितात. गेल्या काही दिवसांमध्ये तर अनेक अपघात घडले असून, त्यात पोलिसांनी मद्यपी वाहनचालक असतानाही त्याच्याविरोधात ड्रंक ॲण्ड ड्राईव्हची कारवाई केलेली नाही. मात्र ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह कारवाईच्या नावाखाली थेट सर्वसामान्यांनाच मद्यपी ठरवून पोलिसांकडून कारवाई केली जात असल्याची गंभीर बाब यानिमित्ताने समोर आली आहे.
"याप्रकरणाची चौकशी केली जाईल. जर अंमलदारांनी चुकीची कारवाई केली असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल."- मोनिका राऊत, पोलीस उपायुक्त, परिमंडळ दोन.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.