Nashik News : केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाकडून अतिसार नियंत्रण कार्यक्रमाचे नाव बदलून अतिसार नियंत्रण (STOP Diarrhoea Campaign) असे करण्यात आले आहे. अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्य करणे हे उद्दिष्ट समोर ठेवून जिल्ह्यात विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा कार्यक्रम राबविले जात आहे. (Diarrhea control campaign for 2 months in district)
सोमवारी (ता. १) या अभियानास प्रारंभ झाला असून, ३१ ऑगस्टपर्यंत हे अभियान सुरू असणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. हर्षल नेहेते यांनी दिली. या कार्यक्रमाच्या व्यवस्थापन, अंमलबजावणीबाबत सोमवारी (ता.१) जिल्हास्तरीय सुकाणू समितीची बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी अमिशा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
कार्यक्रमामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाबरोबरच महिला बाल विकास विभाग, शिक्षण व पाणीपुरवठा विभागानेही समन्वयाने कार्य करण्याबाबत सूचित केले. माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. नेहेते यांनी मोहिमेबाबत सविस्तर माहिती दिली. सदर मोहिमेदरम्यान अतिसार नियंत्रण पंधरवड्यात पाच वर्षांखालील बालके असलेल्या प्रत्येक घरी आशासेविका भेटी देऊन ओ.आर.एस. पाकीट वापरण्याबाबतचे महत्त्व सांगतील.
अतिसाराच्या उपचारासाठी प्रत्येक आरोग्य संस्थेत, जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्र, आरोग्यवर्धिनी केंद्रात ओ.आर.एस. कॉर्नर तयार करण्याबाबत सर्व आरोग्य संस्थांना सूचित केले. त्यानुसार कॉर्नर तयार करण्यात आल्याचेही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मोरे यांनी सांगितले. १ जुलै ते ३१ ऑगस्ट २०२४ दरम्यान हे अभियान राबविले जाणार आहे. त्यासाठी २०२४ घोषवाक्य हे ‘अतिसारावर करा मात, स्वच्छता आणि ओआरएसची घेऊनी साथ’ असे आहे. (latest marathi news)
हे आहेत अभियानाचे धोरण
अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्य करण्यासाठी अतिसार नियंत्रण अभियान आरोग्य विभागाने हाती घेतले आहे. या कार्यक्रमांतर्गत पाच वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या बालकांच्या घरांमध्ये ‘ओआरएस’ व ‘झिंक’चा वापर व उपलब्धता वाढवणे, तसेच अतिसारासह जल शुष्कता असलेल्या बाल रुग्णांचे व्यवस्थापन करण्यासाठी आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करणे.
शहरी झोपडपट्ट्या, पूरग्रस्त भाग, आरोग्यसेविका कार्यरत नसलेले उपकेंद्रे, भटक्या जमाती, वीटभट्टी, कामगार, स्थलांतरित मजूर व बेघर मुले इत्यादींसारख्या जोखीमग्रस्त घटकांवर विशेष लक्ष देणे. मागील दोन वर्षांत अतिसारातील साथ असलेले क्षेत्र, पाणीपुरवठा व स्वच्छतेचा अभाव असल्याचे क्षेत्र यावर विशेष लक्ष देणे, हे अभियानाचे धोरण आहे.
हे आहेत अभियानातील कार्यक्रम
अतिजोखमीच्या क्षेत्राची नियोजनाद्वारे सूक्ष्म कृतिआराखडा तयार करण्यात आला आहे. अतिसारामध्ये ओआरएस आणि झिंकचे महत्त्व, स्तनपानाचे महत्त्व, अतिसाराच्या प्रतिबंधासाठी हातांच्या स्वच्छतेचे महत्त्व आणि शौचाची विल्हेवाट लावण्यासाठी शौचालयाचा वापर यांचे संदेश, सर्व शाळांमध्ये हात धुण्याचे प्रात्यक्षिक.
हात धुण्याच्या टप्प्यांविषयी पोस्टरद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत ओआरएस आणि झिंकचा वापर, शुद्ध पिण्याच्या पाण्याचा वापर, माहिती, शिक्षण आणि संपर्क, तसेच सामाजिक वर्तन बदल संवाद यावर लक्ष केंद्रित करून दोन महिन्यांच्या कालावधीत सर्व भागीदारांच्या सहकार्याने विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.