MGNREGA Expenditure : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत २०२२-२३ या आर्थिक वर्षात २७.२२ लाख मनुष्य दिवस निर्मिती करून १०१ कोटी इतका निधी खर्च करण्यात आला. यंदाच्या आर्थिक वर्षात एकूण ४५ हजार ३७५ कामे हाती घेऊन १६ हजार २६८ कामे पूर्ण करण्यात आली असून, उर्वरित २९ हजार १०७ कामे प्रगतिपथावर आहेत.
त्यात मालेगाव, नांदगाव, बागलाण, येवला, पेठ व सुरगाणा तालुक्यांत सर्वाधिक कामकाज झाले आहे. नाशिक महसूल विभागात एकूण पाच जिल्हे असून, यात अहमदनगरमध्ये ८७ कोटी, धुळे- ३६ कोटी, नंदुरबार- ६९ कोटी, जळगाव- ९६ कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे.
यामध्ये नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक १०१ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे निधी खर्चात नाशिक जिल्हा विभागात अव्वल ठरला आहे. (Nashik district top in NREGA fund expenditure 101 crore reached under NREGA in department MGNREGA news)
२०२२-२३ या वर्षात अकुशल मजुरी दर २५६ इतका होता. अकुशल मजुरी ‘पीएफएमएस’द्वारे मजुरांचे आधार संलग्न बँक खात्यावर जमा करण्यात येते. अर्धकुशल कामांचा निधी आयुक्त, नरेगा, नागपूर यांच्याकडून प्राप्त झाल्यावर संबंधितांचे खाते जमा करण्यात येते.
सार्वजनिक कामांचा कुशल निधी राज्य शासनाने मंजूर केल्यानंतर आयुक्त (नरेगा), नागपूर यांच्यामार्फत संबंधित यंत्रणा/ग्रामंपचायतींना वितरित करण्यात येतो. पालकमंत्री दादा भुसे, केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी नरेगा योजनेबद्दल आढावा घेऊन योजना प्रत्येक ग्रामपंचायतीत राबविण्याबाबत व जास्तीत जास्त कामे हाती घेणेबाबत निर्देश दिले होते.
६ डिसेंबर २०२२ ला स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत ८०० कामे एकाच दिवशी सुरू करण्यात आली होती.
हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत
मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी जिल्ह्यातील टंचाईमुक्त व पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या १९९ गावांमध्ये ६२२ सिमेंट बंधारे बांधण्याचे नियोजन ‘मिशन भगीरथ प्रयास’ उपाक्रमांतर्गत नियोजन करण्यात आले असून, त्यानुसार कुशल/अकुशल कामांचे प्रमाण राखले जाणार आहे.
तसेच नरेगा अंतर्गत कोविड काळात व सद्य:स्थितीत सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर व इगतपुरी या आदिवासीबहुल तालुक्यांतील मजुरांचे स्थलांतर काहीअंशी रोखण्यात यश आले असून, नांदगाव, येवला, मालेगाव तालुक्यांतील ऊसतोडणीसाठी जाणाऱ्या कुटुंबीयांना लाभ दिल्यामुळे स्थलांतराचे प्रमाण काहीअंशी कमी झाले आहे, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी (नरेगा) रवींद्र परदेशी यांनी दिली.
नाशिक जिल्ह्याचा नरेगामध्ये तिसऱ्या टप्प्यात समावेश झाला असून, त्याची अंमलबजावणी २००८ पासून सुरू झाली आहे. पंधरा वर्षातील हा सर्वाधिक खर्च यंदाच्या वर्षी झाला आहे. या आधी सर्वाधिक खर्च सन २०१८-१९ या वर्षात झाला असून, तो ७५ कोटी होता.
२०२२-२३ या आर्थिक वर्षात १०१ कोटी खर्च करून आतापर्यंतच्या सर्वाधिक खर्चाचा उच्चांक करण्यात आला आहे. पाच वर्षांचा विचार करता २०१८-१९ मध्ये ७५.८३ कोटी, २०१९-२० मध्ये ५९.९३ कोटी, २०२०-२१ मध्ये ७२.२३ कोटी व २०२१-२२ मध्ये ६४.७२ कोटी व या वर्षी १०१.१९ कोटी इतका निधी खर्च झाला आहे. नरेगा अंतर्गत २०२३-२४ या वर्षाचा अकुशल मजुरीचा दर २७३ इतका झाला आहे.
"जिल्ह्यात आदिवासीबहुल तालुक्यातील व पूर्वेकडील काही तालुक्यांतून रोजगारासाठी नाइलाजाने होणारे स्थलांतर रोखण्यासाठी व ग्रामीण भागात अकुशल हातांना रोजगार देऊन कायमस्वरूपी मालमत्ता निर्माण करण्यासाठी नरेगा ही महत्त्वपूर्ण योजना असून, यात सर्व ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवून आपल्या गावाचा सर्वांगीण विकास करावा."
- आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प., नाशिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.