Nashik News : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांच्यावर सोपविली आहे. योजनेतील प्रत्यक्ष लाभार्थी महिलांना पहिला हप्ता १५ ऑगस्टपासून मिळणार आहे. त्यासाठी विभागाकडून नारीशक्ती दूत अॅप विकसित केले आहे. (Ladki Bahin Yojana)
या अॅपवर अर्ज भरून घेण्याची जबाबदारी अंगणवाडीसेविका, ग्रामसेवकांची असणार आहे. विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शासनाने ही योजना जाहीर केली आहे. या योजनेनुसार पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये त्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत. या योजनेची प्रक्रिया, शासन नियम, अटी प्रसिद्ध केल्या आहेत.
या योजनेची सोमवार (ता. १)पासून कार्यवाही सुरू झाली. त्याअनुषगांने माहिला बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांची बैठक घेतली. बैठकीत योजनेच्या अंमलबजावणीबाबत तटकरे यांनी सूचना केल्या. काढण्यात आलेल्या शासन आदेशात काहीसा बदल केला जाणार असल्याने सुधारित आदेश काढला जाईल.
नारीशक्ती दूत अॅप गुगलवर २ जुलैपासून डाउनलोड होईल, असे या वेळी सांगण्यात आले. या योजनेचे अर्ज पोर्टल, मोबाईल अॅप, सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाइन भरता येतील. ज्या महिलांना ऑनलाइन अर्ज भरता येणार नाही त्यांच्यासाठी अंगणवाडी, बालविकास प्रकल्प अधिकारी व ग्रामपंचायत येथे सुविधा उपलब्ध असणार आहेत. (latest marathi news)
परिपूर्ण अर्ज अंगणवाडी केंद्र अथवा बालविकास प्रकल्प अधिकारी अथवा सेतू सुविधा केंद्रामध्ये जमा करायचे आहेत. तसेच हे अर्ज विनामूल्य उपलब्ध आहेत. प्रत्येक क्षेत्रातील अंगणवाडी, ग्रामपंचायत, पालिका महापालिकेच्या फलकावर अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
...अशी आहे प्रक्रिया
१ ते १५ जुलै : अर्ज स्वीकारणे, १६ जुलैला अर्ज प्राप्त झालेल्या नावांची यादी प्रसिद्ध होईल. १६ जुलै ते २० जुलैदरम्यान या यादीवर हरकती स्वीकारल्या जातील. २१ ते ३० जुलैदरम्यान या हरकतींचे निराकरण केले जाईल. त्यानंतर १ ऑगस्टला पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध होईल.
पात्र लाभार्थ्यांनी १० ऑगस्टपर्यंत आपल्या बँक खात्याबाबत केवायसी पूर्तता करून घ्यावी लागेल. १४ ऑगस्टला लाभार्थ्यांच्या खात्यावर रकमा जमा करण्यात येणार आहेत. त्यानंतर प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली जाणार आहे.
...या महिला असतील लाभार्थी
लाभार्थी महिलेचे वय २१ ते ६० असावे. यामध्ये विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता या आणि निराधार महिलांचा समावेश आहे. या लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावे. सध्या केंद्र अथवा राज्य शासनाच्या योजनेचा एखादी महिला दरमहा १५०० रुपयांपेक्षा कमी रकमेचा लाभ घेत असेल, तर खर्चाची रक्कम त्या महिलेला मिळू शकते.
...अशी होईल लाभार्थ्यांची निवड
या योजनेसाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करता येईल. अर्जासोबत आधार कार्ड, डोमिसाईल, जन्माचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक, रेशन कार्ड व हमीपत्र जोडणे आवश्यक आहे.
अर्ज स्वीकारणे व तपासणीसाठी अंगणवाडीसेविका, पर्यवेक्षिका, त्या भागातील सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, तसेच वॉर्ड अधिकारी यांनी मदत करावयाची आहे. जिल्हाधिकारी या अर्जांना अंतिम मंजुरी देतील. या योजनेसाठी महिला व बालविकास विभागाचे आयुक्त नियंत्रण अधिकारी आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.