नाशिक: गेल्या वर्षाच्या एप्रिल महिन्यात शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर महापालिकेने त्यावेळी टप्प्याटप्प्याने आयुक्तांच्या अधिकारात खरेदी केलेल्या रॅपिड ॲन्टिजेन किटची किंमत व निविदा प्रक्रिया राबवून प्राप्त झालेल्या किटच्या किमतीमध्ये प्रति किट मागे ४५९ रुपयांचा फरक निर्माण झाल्याने त्यावेळी झालेल्या किट खरेदीबाबत संशय निर्माण झाला आहे.
मागील वर्षाच्या मार्च महिन्यात देशात कोरोनाची लाट सुरू झाल्यानंतर नाशिक महापालिकेने तातडीची बाब म्हणून रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट किट खरेदी करण्याचा निर्णय घेतला. तातडीची बाब म्हणून आयुक्तांच्या अधिकारात खरेदी करता येत असल्याने महासभा, स्थायी समितीची परवानगी न घेता खरेदी झाली. पहिल्या व दुसऱ्या लाटेत पाच लाख २,७५० रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट किट खरेदी करण्यात आल्या. रॅपिड ॲन्टिजेन टेस्टमुळे मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने त्यांच्यावर तातडीने उपचार करून कोरोना नियंत्रित आणण्यास मदत झाली. ही बाब खरी असली तरी आता नव्या किट खरेदीसाठी काढण्यात आलेल्या निविदेत दरामध्ये जवळपास दहापट तफावत आढळली आहे.
मागील वर्षी ५०४ रुपये किमतीला प्रत्येकी एक रॅपिड ॲन्टिजेन किट खरेदी करण्यात आले. महापालिकेने तिसऱ्या लाटेसाठी पुन्हा एकदा ॲन्टिजेन टेस्ट खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविल्यानंतर ४५ रुपये किमतीला एक किट उपलब्ध झाल्याने किटच्या किमतीमधील तफावतीवरून संशय निर्माण झाला आहे. शुक्रवारी (ता. १) होणाऱ्या स्थायी समिती सभेत ९० लाख रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट किट खरेदी करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. शहरात आतापर्यंत पाच लाख २,७५० ॲन्टिजेन किटचा वापर झाला आहे. आयुक्तांच्या अधिकारात ४ लाख ३८ हजार ७५० ॲन्टिजेन किटची खरेदी झाले. तसेच, तुटवडा निर्माण झाला त्यावेळी जिल्हा रुग्णालय व जिल्हा परिषदेकडून १४ हजार किट व हाफकिन बायोफार्माकडून ५० हजार किट खरेदी करण्यात आले.
मागणी व पुरवठा सूत्रानुसार फरक
वैद्यकीय विभागाने इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) सेंटरने निश्चित केलेल्या दरानुसार खरेदी झाल्याचा दावा केला आहे. दुसऱ्या लाटेनंतर ॲन्टिजेन किट पुरवठादार कंपन्यांच्या संख्येत वाढ झाल्याने दर कमी झाले. मार्च २०२१ मध्ये हाफकिन बायोफार्माचे दर प्रति किट ५७.१२ रुपयांपर्यंत घसरले. दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढल्याने अचानक किटची मागणी वाढली. मे २०२१ मध्ये महापलिकेमार्फत ८९.६० रुपये दराने किट खरेदी केले. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर पुन्हा किटची मागणी घटली. या व्यतिरिक्त किट तयार करणाऱ्या कंपन्यांची संख्या वाढल्याने दर घटले. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ॲन्टिजेन किट खरेदीसाठी ई- निविदा प्रक्रिया राबविली. त्यात ४५ रुपये दराने किट उपलब्ध झाल्याचा दावा करण्यात आला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.