संदिप पाटील : सकाळ वृत्तसेवा
Nashik Kharif Season : मालेगाव तालुक्यासह कसमादेत कांद्याने यावर्षी बळीराजाला चांगलीच साथ दिली आहे. सध्या बहुतांशी कांदा अडीच ते तीन हजार रुपये दरम्यान विकला जात आहे. कांद्याला मिळत असलेल्या समाधानकारक भावामुळे खरीप हंगामातील पारंपरिक पिकांबरोबरच पावसाळी लाल कांद्यासाठी शेतकऱ्यांनी शेत राखून ठेवली जात आहे. पावसाळी लाल कांदा लेट खरीप हंगामातील पीक म्हणून ओळखला जातो. कांदा लागवडीसाठी रोपे तयार करण्याचे काम सुरु आहे. साधारणतः: जुलै अखेर खरीप कांदा लागवड सुरु होवू शकेल. ( Due to kharif fields are empty for green monsoon onions )
मालेगाव तालुक्यात माळमाथा, काटवन परिसरात पेरण्यांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. बहुतांशी भागात कोळपणी, निंदणीची कामे सुरु आहेत. मका, कपाशी, बाजरी, भुईमूग, कडधान्ये, भाजीपाला आदि पिके सध्यातरी जोमात आहेत. असे असले तरी कसमादेच्या अर्थचक्राचा केंद्रस्थानी असलेल्या कांदा लागवडीसाठी अनेक शेतकऱ्यांनी शेत राखून ठेवले आहे. कांदा लागवडीला अजून पंधरा ते वीस दिवसाचा अवकाश आहे. तालुक्यात खरीप कांदा लागवडीची सुरवात काटवनपासून होते.
काही शेतकरी घरचेच कांदा बियाणे वापरतात. उन्हाळ्यात जमीन खूप तापत असल्याने पावसाने शेतजमिनीची उष्णता निघाल्याशिवाय कांदा बियाणे टाकता येत नाही. सुरवातीला जास्त पाऊस झालेल्या ठिकाणी प्रामुख्याने कांद्याचे बियाणे टाकले जाते. रोपे तयार होताच लागवड सुरु होते. सध्या कांद्याला चांगला भाव मिळत आहे. खरीप पिकांबरोबरच थोडाफार का होईना लाल कांदा घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. त्यादृष्टीने शेतकऱ्यांनी नियोजन केले आहे.
जून, जुलैत पावसाळी (लाल), सप्टेंबर, ऑक्टोबर मध्ये रांगडा तर डिसेंबर, जानेवारीनंतर उन्हाळी कांदा अशा तीन टप्प्यांत कांद्याची लागवड केली जाते. अलीकडे कसमादेत बागायती क्षेत्र वाढत आहे. डाळिंब, कांदा, याचबरोबर खरीप व रब्बी हंगामातील पारंपारिक पिके घेतली जातात. पाण्याच्या उपलब्धतेसाठी अनेक शेतकऱ्यांनी कूपनलिका, विहीरी खोदल्या आहेत. तर काहींनी दूरवरून पाइपलाइन करत बागायती क्षेत्र वाढविले आहे.(latest marathi news)
पावसाळी कांद्याला चांगली भावाची आशा
कसमादेत उन्हाळी कांदा सध्या भाव खात आहे. उन्हाळी प्रमाणेच पावसाळी कांद्याला देखील चांगला भाव मिळेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. कांद्याचे भाव नेहमीच स्थिर राहत नाहीत. कांदा कधी रडवितो तर कधी हसवितो. पावसाळी कांदा साधारणतः: दसरा ते दिवाळी या टप्प्यात बाजारात येतो. यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्यास व भविष्यात देखील भाव टिकून राहिल्यास बळीराजाची दिवाळी गोड होईल असे मानले जात आहे.
''कांदा आमचे प्रमुख नगदी पिक आहे. कांद्याला चांगला भाव मिळावा अशी अपेक्षा आहे. दुष्काळाच्या चटक्यांनंतर कांदा यंदा भरपाई करून देईल अशी अपेक्षा आहे. शासनाने शेतकऱ्यांचा विचार करून चांगला भाव द्यावा.''- रत्नप्रभा पगार, कृऊबा संचालिका मालेगाव.
''महागडे कांदा बियाणे, खते, फवारणी, लागवड ते काढणीपर्यंतची मजुरी याचा विचार करता उत्पादन खर्च वाढला आहे. कांद्याला किमान तीन हजार रूपये प्रतिक्विंटल भाव मिळायला हवा. भविष्यात भाव टिकून राहतील यासाठी शासनाने धोरण आखावे.''- पंढरीनाथ देवरे, शेतकरी चिंचवे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.