चांदोरी : रेशन दुकानदारांना जुन्या टूजी ई-पॉस मशिनमधील तांत्रिक त्रुटींमुळे धान्य वितरण करण्यात अडचणी येत आहेत. याबाबत रेशन दुकानदार संघटनांनी फोरजी ई-पॉस मशिन देण्याची मागणी केली होती. त्यावर निफाड तालुक्यात पुरवठा विभागाकडून १५३ रेशन दुकानदारांना फोर जी ई-पॉस मशीन देण्यात येणार आहेत. (Nashik E POS machine for ration shopkeeper news)
राज्यात १ मे २०१८ पासून संगणकीय वितरण प्रणालीद्वारे ई-पॉस मशिनद्वारे धान्य वितरण सुरू झाले. त्यासाठी राज्य सरकारने तीन कंपन्यांची निवड केली होती. रेशनवरील धान्य वितरणात ई-पॉस मशिन महत्त्वाची यंत्रणा आहे. ई-पॉस मशिनवर धान्य वितरण करताना योजनानिहाय शिधापत्रिकाधारकांचे थंब घ्यावे लागतात.
तांत्रिक अडचणीमुळे लवकर थंब इम्प्रेशन होत नाही. एका शिधापत्रिकाधारकाला १५ ते २० मिनिटे वेळ द्यावा लागतो. परिणामी, जुन्या टू जी ई पॉस मशिनमधील त्रुटीमुळे धान्य वितरण प्रणाली विस्कळित झाली होती.
अनेक ई-पॉस मशिनमधील सीमकार्ड निरुपयोगी झाले असताना, रेशन दुकानदार आपल्या मोबाईलद्वारे हॉटस्पॉट वापरून धान्य वितरण करीत होते. गर्दीच्या वेळी मशिनमधील तांत्रिक बिघाडामुळे रेशन दुकानदारांना शिधावाटप करताना बऱ्याच अडचणी आल्या. या कारणावरून ग्राहक आणि रेशन दुकानदार यांच्यात वादही होत आहेत. त्यामुळे रेशन दुकानदार फोर जी ई-पॉस मशिन उपलब्ध करून देण्याबाबत आग्रही होते.
अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातर्फे रेशन दुकानांमध्ये आता ४-जी ई-पॉस मशिन व आयआरएएस स्कॅनची सोय करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांना धान्य घेण्यासाठी अधिक वेळ प्रतीक्षा करावी लागणार नाही.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम योजनेतील अपात्र लाभार्थ्यांचा शोध घेऊन धान्याचा होणारा अपहार, गैरव्यवहार थांबविण्यासाठी, लाभार्थ्यांना पारदर्शी पद्धतीने धान्यवाटप करण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संपूर्ण संगणकीकरण झाले आहे. लाभार्थ्यांची ई-पॉस मशिनद्वारे बायोमेट्रिक ओळख पटवून शिधावाटप करण्याचा धोरणात्मक निर्णय घेऊन अंमलात ही आणला गेला.
रेशन दुकानांमध्ये नवीन ई-पॉस मशीन ४ जी व आयरीस स्कॅनर या तंत्रज्ञानासह दिले आहेत. आधार कार्डवरील फिंगरप्रिंट्स उपलब्ध नसल्यास आधार पडताळणी करताना अनेक अडचणी येतात. अशा व्यक्तींची आधार पडताळणी कशी करावी, हा मोठा प्रश्न यानिमित्त मार्गी लागला आहे.
"अत्याधुनिक व्हर्जनच्या पॉस मशिनमध्ये मोठा डिस्प्ले, उत्तम बॅटरी क्षमता, दोन सीमकार्ड वापरता येण्याची सुविधा, पावतीची प्रिंट काढण्याची सोय, ठसे जुळत नसलेल्यांसाठी आयरिस स्कॅनची सुविधा, दैनंदिन वाटप आकडेवारी साठवण्याची सुविधामुळे वितरण प्रणाली अधिकाधिक पारदर्शक व सुलभ होणार आहे."-विशाल नाईकवाडे, तहसीलदार, निफाड
दृष्टिक्षेपात...
रेशन दुकाने : १५४
अंत्योदय कार्डधारक : १०८०८
प्राधान्य कार्डधारक : २९३१७५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.