Nashik News : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारांकडून होणाऱ्या खर्चाची निवडणूक निरीक्षकांकडून झालेल्या पडताळणीत नाशिकमध्ये महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी, तर दिंडोरीत डॉ. भारती पवारांनी आघाडी घेतली आहे. सहा दिवसांत गोडसेंचा ३९ लाख ५९ हजारांवर खर्च झाला आहे. डॉ. पवारांचा नऊ लाख ७४ हजारांवर खर्च झाला. (Nashik Lok Sabha Constituency)
नाशिक व दिंडोरीतील महायुतीसह महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चात तफावत आढळल्याने त्यांना खर्च फेरसादर करण्याची नोटीस खर्च निरीक्षकांनी बजावली आहे. तसेच नाशिकमध्ये भाग्यश्री अडसूळ, तर दिंडोरीत दीपक जगताप गैरहजर राहिल्याने त्यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला ९५ लाखांच्या आत खर्चाची मर्यादा निवडणूक आयोगाने घालून दिली आहे. खर्च निरीक्षक प्रवीण चंद्रा व सागर श्रीवास्तव यांनी गुरुवारी जिल्हा परिषदेच्या (स्व.) कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात नाशिक लोकसभा मतदारसंघातील ३१ पैकी ३० उमेदवारांच्या खर्चाची व कागदपत्रांची तपासणी केली.
या वेळी खर्च नियंत्रण पथकाचे जिल्हा नोडल अधिकारी डॉ. भालचंद्र चव्हाण, संपर्क अधिकारी विजयकुमार कोळी, सुरेश महंत, सहायक जिल्हा नोडल अधिकारी दत्तात्रेय पाथरूट, फिल्ड नोडल अधिकारी एन. व्ही. कळसकर, खर्च नियंत्रण पथकाचे प्रकाश बानकर, लेखांकन चमूचे नियंत्रक चैतन्य परदेशी, सहाय्यक खर्च निरीक्षक (मुख्यालय) अनिल कोमेजवार तसेच लेखांकन चमूचे प्रमुख सुभाष घुगे.
विनोद खैरनार, किशोर पवार, सुनील कोतवाल, प्रशांत घोलप आदी उपस्थित होते. महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी ३९ लाख ५९ हजारांवर खर्च झालेला असताना त्यांनी ३७ लाख ४८ हजार रुपयेच खर्च झाल्याचे दाखवले आहे. त्यामुळे त्यांच्या खर्चात दोन लाख दहा हजारांची तूट दिसून येते. तर महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे यांनी नऊ लाख ६० हजारांवर खर्च झाल्याचे प्रशासनाने नोंदवले आहे. (latest marathi news)
पण प्रत्यक्षात उमेदवाराने आठ लाख ७७ हजार रुपये खर्च झाल्याचे सांगितले आहे. त्यांच्या खर्चातही ८२ हजारांची तूट दिसून येते. याप्रमाणे नाशिक लोकसभेतील एकूण ३० उमेदवारांनी खर्च सादर केला. इंडियन पीपल्स अधिकार पक्षाच्या भाग्यश्री नितीन अडसूळ गैरहजर राहिल्याने त्यांना नोटीस बजावली आहे. पुढील खर्च तपासणी १४ मेस शासकीय विश्रामगृह ‘शिवनेरी’ येथे होणार आहे.
डॉ. पवारांच्या खर्चात पावणेचार लाखांचा फरक
दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील दहापैकी नऊ उमेदवारांनी खर्च निरीक्षक मुकांबीकेयन एस. आणि निधी नायर यांच्यासमोर खर्च सादर केला. शासकीय विश्रामगृह शिवनेरी येथे खर्च ताळमेळ बैठक पार पडली. महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवारांनी नऊ लाख ७४ हजारांवर खर्च केल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
उमेदवाराने सहा लाख दोन हजार रुपये इतकाच खर्च दाखवल्याने त्यांच्या खर्चात तीन लाख ७१ हजार ६२४ रुपयांची तफावत आढळली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरेंनी पाच लाख दहा हजार २९६ खर्च केल्याचे निरीक्षण प्रशासनाने नोंदवले आहे. त्यापैकी पाच लाख ३४ हजार ७७१ रुपयांचा खर्च त्यांनी सादर केला.
उर्वरित साडेसहा हजारांची तफावत दिसून येते. या दोन्ही उमेदवारांना खर्च फेरसादर करण्याची नोटीस खर्च निरीक्षकांनी नोंदवली आहे. या वेळी नोडल अधिकारी (खर्च) भालचंद्र चव्हाण, सहायक नोडल अधिकारी बाबासाहेब शिंदे, क्षेत्रीय नोडल अधिकारी गोविंद कतलाकुटे, लेखांकन चमू नियंत्रक जलपत वसावे, सहायक खर्च निरीक्षक (मुख्यालय) प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते. पुढील तपासणी १३ मेस होणार आहे.
उमेदवारनिहाय खर्च
३९ लाख ५९ हजार ६९३ (प्रशासनाने नोंदवलेला)
३७ लाख ४८ हजार ७७० (उमेदवाराने दाखवलेला)
दोन लाख १० हजार ९२३ (तफावत)
राजाभाऊ वाजे :
नऊ लाख ६० हजार २८५ रुपये (प्रशासनाने नोंदवलेला)
आठ लाख ७७ हजार ६५९ रुपये (उमेदवाराने दाखवलेला)
८२ हजार ६२६ (तफावत)
शांतिगिरी महाराज :
आठ लाख २९ हजार ६०९ रुपये (प्रशासनाने नोंदवलेला)
पाच लाख नऊ हजार १३८ रुपये (उमेदवाराने दाखवलेला)
तीन लाख २० हजार ४७१ (तफावत)
करण गायकर :
एक लाख ९७ हजार ३३० रुपये (प्रशासनाने नोंदवलेला)
एक लाख ९६ हजार ९०० रुपये (उमेदवाराने दाखवलेला)
चारशे रुपये (तफावत)
नऊ लाख ७४ हजार २५० रुपये (प्रशासनाने नोंदवलेला)
सहा लाख दोन हजार ६२६ रुपये (उमेदवाराने दाखवलेला)
तीन लाख ७१ हजार ६२४ रुपये (तफावत)
भास्कर भगरे :
पाच लाख दहा हजार २९६ रुपये (प्रशासनाने नोंदवलेला)
पाच लाख ३४ हजार ७७७ रुपये (उमेदवाराने दाखवलेला)
सहा हजार ४८० रुपये (तफावत)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.