Nashik Parking Problem : शहरातील रस्त्यावर अडथळा ठरणाऱ्या व नो-पार्किंगमध्ये वाहने पार्क करणाऱ्यांविरोधात शहर वाहतूक शाखेकडून अशा वाहनांची टोईंग करून दंडात्मक कारवाई केली जाते. परंतु यावर बेशिस्त वाहनचालकांनी शक्कल चालविली असून आता वाहतूक शाखेची कारवाई टाळण्यासाठी थेट रस्त्यालगतच्या फुटपाथवरच दुचाकी वाहने पार्क केली जात आहेत.
त्यामुळे पादचाऱ्यांना आपला जीव मुठीत धरून रस्त्यावरून मार्गक्रमण करावा लागतो आहे. परंतु यामुळे फुटपाथ नेमका कोणासाठी, पादचाऱ्यांसाठी की वाहनांच्या पार्किंगसाठी असा प्रश्न उपस्थित होतो आहे. तसेच, फुटपाथवरील वाहनांची टोईंग का होत नाही, असाही संतप्त सवाल त्रस्त पादचाऱ्यांनी उपस्थित केला आहे. (Nashik footpath for Pedestrians or Parking)
शहरातील वाहतूक कोंडी आणि बेशिस्त वाहन पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर होते आहे. कोंडी सुटावी व वाहतूक सुरळीत व्हावी, तसेच बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लागावी यासाठी शहर पोलीस आयुक्तालयाने गेल्या दोन महिन्यांपासून पुन्हा आयुक्तालय हद्दीमध्ये वाहतूक शाखेमार्फत टोईंगच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई सुरू केली आहे.
रस्त्यालगत पार्क केलेल्या दुचाक्यांची टोईंग करून दंड केला जातो तर चारचाकी वाहनांवर इ-चलनद्वारे दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र, रस्त्यालगत वा नो पार्किंगमध्ये दुचाक्या पार्क केल्या दंडात्मक कारवाई होत असल्याने त्यापासून बचाव करण्यासाठी आता बेशिस्त वाहनचालक त्यांच्या दुचाक्या थेट रस्त्यालगतच्या फुटपाथवरच पार्क करीत आहेत.
यामुळे वाहतूक शाखेच्या पथकाकडून अशा वाहनांची टोईंग केली जात नाही. परिणामी शहरातील बहुतांशी फुटपाथ हे दुचाक्यांसाठी पार्किंग स्थळच झाली आहेत. परंतु यामुळे पादचाऱ्यांना मार्गक्रमण करताना रस्त्यावरून अक्षरश: जीव मुठीत धरून चालावे लागते आहे. यातून अनेकदा गंभीर स्वरुपाचे अपघातही होत आहेत. (latest marathi news)
पादचाऱ्यांचा सवाल
स्मार्ट रोडवरील जिल्हाधिकारी कार्यालयापासून ते अशोकस्तंभापर्यंतच्या फुटपाथवर सर्रासपणे दुचाक्या पार्क केलेल्या असतात. जिल्हा न्यायालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातून नागरिक येतात. परंतु त्यांना फुटपाथऐवजी रस्त्यावरून जीव धोक्यात घालून चालावे लागते.
अनेकदा भरधाव वेगातील दुचाक्या, रिक्षा आणि चारचाकी वाहने पादचाऱ्यांना कट मारून जातात. फुटपाथवरून चालावे तर मोठी कसरतच करावी लागत असते. त्यामुळे या मार्गाने जाणार्या पादचारी नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करीत कारवाई करणार की नाही, असा सवालच प्रशासनाला केला आहे.
"फुटपाथवर वाहने पार्क करणे चुकीचे आहे. अशा वाहनांवर टोईंगची कारवाई केली जाईल. त्यामुळे कोणीही फुटपाथवर आपली वाहने पार्क करू नये."
- चंद्रकांत खांडवी, पोलीस उपायुक्त, शहर वाहतूक शाखा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.