Dhule Lok Sabha Constituency : धुळे मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी दिल्यावर नाराज झालेले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी राजीनामा दिल्यावर रिक्त झालेल्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा आक्रमक चेहरा असलेले माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्यावर सोपविण्यात आली आहे. प्रदेश काँग्रेसने कोतवाल यांची प्रभारी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली असून, त्याबाबतचे पत्र प्राप्त झाले आहे. (nashik Kotwal who has an aggressive face has been entrusted with post of District President)
या नियुक्तीनंतर जिल्हा काँग्रेसमध्ये जल्लोष करण्यात आला. माजी मंत्री डॉ. बच्छाव यांना काँग्रेस श्रेष्ठींच्या निर्णयानुसार उमेदवारीचे आदेश असल्याचे पक्षाने जाहीर केले. असे असतानाही या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले धुळ्याचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर आणि नाशिकचे जिल्हाध्यक्ष डॉ. शेवाळे यांनी राजीनामा देत नाराजी व्यक्त केली. डॉ. शेवाळे यांनी पत्रकार परिषद घेत राजीनामा पक्षाकडे पाठविला असल्याचे सांगितले.
यानंतर, पक्षाच्या वरिष्ठांनी याबाबत चर्चा करून त्यांची नाराजी दूर केली जाईल, असे विधिमंडळाचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. दुसरीकडे मात्र जिल्ह्यातील ग्रामीण पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष डॉ. शेवाळे यांचा राजीनामा मंजूर करण्याची मागणी केल्याने जिल्हा काँग्रेस अंतर्गत गजबाजी उफाळून आली होती. डॉ. शेवाळे यांना स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध होता.
त्यांच्या कारकीर्दीत पक्षाला जिल्ह्यात घरघर लागल्याने त्यांना हटविण्याची मागणी अनेकदा झाली होती. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत सप्टेंबर २०२३ मध्ये झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी जिल्हा नेतृत्वाच्या कामावर खुली नाराजी व्यक्त केली होती. यामुळे स्थानिक काँग्रेसमधील नाराजी लक्षात घेऊन डॉ. शेवाळे यांचा राजीनामा मंजूर करीत, त्यांच्या रिक्त जागी चांदवडचे माजी आमदार कोतवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (latest marathi news)
आक्रमक चेहरा
श्री. कोतवाल यांची पक्षातील आक्रमक चेहरा म्हणून ओळख आहे. त्यांनी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची तब्बल आठ वर्षे जबाबदारी सांभाळली होती. चांदवड तालुकाध्यक्षपद म्हणूनही त्यांनी काम केले आहे. जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष म्हणूनही त्यांची कारकीर्द चांगलीच गाजली होती.
प्रदेश सरचिटणीसपदाची धुराही त्यांनी सांभाळली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेत चांदवड येथे शेतकऱ्यांची सभा घेऊन यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यामुळे युवकपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास जिल्हा काँग्रेसपर्यंत आला आहे.
२०१८ मध्ये मिळाले, २०२४ मध्ये गमावले
गत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १८ वर्षे जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळणारे राजाराम पानगव्हाणे यांना हटवून २०१८ मध्ये तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी डॉ. शेवाळे यांची ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली होती. मात्र, डॉ. शेवाळे यांच्या कारकीर्दीत ग्रामीण भागात पक्षाची वाताहत झाली.
यातच, मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातून पक्षाची उमेदवारी करीत असताना त्यांनी थांबून घेतल्याने पक्षश्रेष्ठींमध्ये त्यांच्या विरोधात नाराजी होती. त्यामुळे त्यांना पदावरून हटविण्याचे काम सुरू होते. यात, त्यांनी राजीनामा दिल्याने पक्षाने त्यांना २०२४ मध्ये हटविले.
निष्क्रिय अन नाराजांना धडा
डॉ. शेवाळे यांचा राजीनामा मंजूर करीत पक्षाने पक्षांतर्गत असलेल्या निष्क्रिय अन नाराजांनाही इशारा दिला आहे. पक्षांतर्गत अनेकांनी पदे घेतली. मात्र, पक्षाचे काम करताना दिसत नाही. त्यामुळे अशा निष्क्रियांना हा धडा असल्याची चर्चा पक्षांतर्गत आहे.
''पक्षाने मोठी जबाबदारी सोपविली आहे. सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी काम करणार आहे. संघटनात्मक बांधणीसाठी जिल्हा दौरा करून पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधेन.''- शिरीषकुमार कोतवाल, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.