Nashik News : बदलती जीवनशैली, निकस आहार, मोबाईलचा अतिरेक आदी बाबींमुळे डोळ्यांच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना नवी दृष्टी देण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला. राष्ट्रीय अंधत्व व दृष्टिक्षिणता नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राज्यभरात मोफत ‘विशेष मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम’ ४ मार्चपर्यंत राबविण्यात येणार आहे. (Nashik Free cataract surgery in state marathi news)
या कालावधीत एक लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने निश्चित केले. सदर मोहिमेंतर्गत एक लाख शस्त्रक्रिया करण्यासाठी आरोग्य विभागाने जिल्हानिहाय नियोजन केले असून, संबंधित आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली. केंद्र सरकारमार्फत ‘राष्ट्रीय नेत्रज्योती अभियान’ ही विशेष मोहीम जून २०२२ पासून राबविण्यात येत आहे.
या मोहिमेत ५० किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांमध्ये अंधत्व आणि एसव्हीआय कारणीभूत असलेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रियांचा अनुशेष पूर्णपणे भरून काढण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत २०२२ ते २०२५ या तीन वर्षांत २३ लाख मोतीबिंदू शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट आहे. आरोग्य विभागाच्या या मोहिमेमुळे नागरिकांना मोफत शस्त्रक्रियेचा लाभ घेता येईल.
सन २०२२-२३ मध्ये राज्यात मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे ११२.५१ टक्के उद्दिष्ट साध्य करण्यात आले आहे व २०२३-२४ या आर्थिक वर्षात डिसेंबर २०२३ पर्यंत एकूण उद्दिष्टाच्या ६७.३० टक्के मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षातील मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शिवजयंतीपासून ४ मार्चपर्यंत जिल्हास्तरावर विशेष मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम राबविण्यात येणार आहे.
हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शासकीय आरोग्य संस्थांसह अशासकीय स्वयंसेवी संस्था तसेच खासगी संस्थांचे सहकार्य घेण्यात येईल. सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याणमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. शासकीय रुग्णालय, मान्यताप्राप्त स्वयंसेवी संस्था रुग्णालय येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या जाणार असून, नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले.
याविषयी किंवा इतर आरोग्यविषयक सल्ला घेण्यासाठी नागरिकांनी १०४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन नामपूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेंद्र पाटील यांनी केले आहे. ( latest marathi news )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.