Kalwan-Surgana Assembly : कांदाप्रश्न प्रभावी, होमपीचकडे दुर्लक्ष भोवले!

Nashik News : कमी झालेला जनसंपर्क, मतदारांना गृहीत धरण्याची वृत्ती आदी कामांमुळे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवारांना कळवण या त्यांच्या होमपीचवरच पिछाडीवर जावे लागले.
Bharti pawar , Bhaskar Bhagare
Bharti pawar , Bhaskar Bhagareesakal
Updated on

Nashik News : शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या असलेल्या कांदा प्रश्नावर केंद्र सरकारने वेळोवेळी घेतलेली बोटचेपी भूमिका, शेतीच्या प्रश्नांना दिलेले दुय्यम स्थान यामुळे असलेली शेतकऱ्यांची तीव्र नाराजी, केंद्रात राज्यमंत्री पद भेटूनही मतदारसंघात मोठी कामे, प्रकल्प आणण्यात आलेले अपयश, कमी झालेला जनसंपर्क, मतदारांना गृहीत धरण्याची वृत्ती आदी कामांमुळे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवारांना कळवण या त्यांच्या होमपीचवरच पिछाडीवर जावे लागले.

त्या तुलनेने नवख्या असलेल्या भास्कर भगरेंच्या पारड्यात कळवण - सुरगाणा मतदारसंघाने भरभरून मतांचे दान टाकल्याने भगरेंना ५७ हजार मतांची मोठी आघाडी घेता आली. माहेर आणि सासरही कळवण तालुक्यातीलच असल्याने डॉ. भारती पवारांना त्याचा फायदा होऊन या मतदारसंघात मोठे मताधिक्य भेटेल ही त्यांच्यासह कार्यकर्त्यांनी बांधलेली अटकळ साफ फेल ठरली.

यंदाच्या निवडणुकीत सुरुवातीपासूनच डॉ. भारती पवारांना दिंडोरी मतदारसंघात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. कांदा निर्यातीच्या प्रश्नांमुळे केंद्र सरकारविरोधात शेतकऱ्यांची भावना तीव्र असल्याने आणि वेळोवेळी आंदोलने होऊनही सरकारने शेतकऱ्यांची दखल न घेतल्याने मतपेटीतून रोष व्यक्त करण्याचा निर्धारच शेतकऱ्यांनी केला होता असे निकालावरून दिसते.

कळवण- सुरगाणा मतदारसंघात गेल्या पाच वर्षात नजरेत भरेल असे केंद्राचे मोठे काम अथवा एखादा नवीन प्रकल्प उभा झालेला दिसला नाही. दुसरीकडे ग्रामीण भागात पक्षसंघटन पाहिजे तितके प्रबळ नसल्याने केवळ मोदींच्या नावावर मते मागण्याचा झालेला प्रयत्न मतदारांना फारसा रुचला नाही. कांदा प्रश्नासोबतच अतिआत्मविश्वास, मतदारांना गृहीत धरण्याची केलेली चूक अशा अनेक गोष्टी भारती पवारांच्या पराभवाला कारणीभूत ठरल्या. (latest marathi news)

Bharti pawar , Bhaskar Bhagare
Nashik Tribal Development : आदिवासी आश्रमशाळांतील वह्या खरेदीचा मार्ग खुला

मनोमिलनाचा परिणाम नाही

निवडणुकीच्या काळात पवार कुटुंबातील गृहकलह थांबवून डॉ. भारती पवार व त्यांचे दीर आमदार नितीन पवार हे एकत्र आले. मात्र त्याचा कुठलाही परिणाम मतदानावर झाला नसल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले. ऐनवेळी डॉ. पवारांनी घेतलेली ही भूमिकाच मतदारांना भावली नाही, त्याचाही काही प्रमाणात प्रतिकूल परिणाम झाल्याचे दिसते.

गावितांची माघार भगरेंच्या पथ्थ्यावर

माकपचे माजी आमदार जिवा पांडू गावित यांनी इंडिया आघाडीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी कंबर कसली होती. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने भगरेंना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या गावितांनी माकपकडून उमेदवारी दाखल केली. मात्र अनेक नाट्यमय घडामोडीनंतर गावितांनी माघार घेत भगरेंना पाठिंबा दिल्याने ही माघार भगरेंचा विजयाचा मार्ग सुकर करणारी आणि डॉ. भारती पवारांच्या पराभवाला बळ देणारी ठरली. विधानसभेसाठी हा धोक्याचा इशारा मानला जात आहे.

'त्या' भगरेंनाही भरभरून मते -

भगरे नामसाधर्म्य असल्याने मतमोजणी सुरू असताना चर्चेत आलेल्या बाबू भगरे या उमेदवारासही कळवण- सुरगाणा मतदारसंघात भरभरून मते मिळाली. मतदारसंघाने कधीही न पाहिलेल्या व निवडणुकीत कुठेही न फिरकलेल्या या उमेदवारास तालुक्यातून तब्बल २० हजार मते मिळाल्याने तो चर्चेचा विषय ठरला. मतदारांची दिशाभूल करण्यासाठी भाजपने खेळलेला हा डाव होता अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

Bharti pawar , Bhaskar Bhagare
Nashik News : नामपूर बाजार समितीत हमालांचे आमरण उपोषण

आदिवासी आरक्षणाबाबत गैरसमज

कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात आदिवासी संघटनेतील कार्यकर्त्यांनी भाजप सत्तेवर आल्यास आपले आरक्षण काढले जाईल असा मुद्दा चर्चिला जात असतानाही त्या भागातील मतदारांपर्यंत त्या विषयांसंदर्भात स्पष्टीकरणासाठी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कुठल्याही प्रकारची यंत्रणा उभी केली नाही. केवळ मोदी नावाच्या भरवशावर ते राहिल्याने जनतेने नेमका संदेश भाजपला दिला. यातून भाजपचे संघटन खोलवर रूजलेले नाही हेच दाखवून देते.

कळवण - सुरगाणा विधानसभा

डॉ. भारती पवार - ५६ हजार ४६१

भास्कर भगरे -१ लाख १४ हजार १३

Bharti pawar , Bhaskar Bhagare
Nashik Traffic Rules Break : चालकांनो थांबा, मगच बोला...! वाहन चालविताना मोबाईल असतो कानाला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.