नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे फक्त उत्तर महाराष्ट्रातच नाही, तर राज्य पातळीवर मोठा धुरळा उडत असून काँग्रेसचे युवा नेते सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्याने खळबळ उडाली.
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे फक्त उत्तर महाराष्ट्रातच नाही, तर राज्य पातळीवर मोठा धुरळा उडत असून काँग्रेसचे युवा नेते सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्याने खळबळ उडाली. मात्र, हा अर्ज तांबे यांनी पक्षाविरोधात बंड म्हणून नाही, तर वडिलांच्या आग्रहाखातर दाखल केल्याची माहिती समोर येत आहे. गेली २२ वर्षं सक्रीय राजकारणात कार्यरत असलेल्या सत्यजीत यांना आतापर्यंत योग्य व्यासपीठ पक्षाने दिलं नाही. स्वत: सत्यजीत विधानसभेसाठी आग्रही होते. पण आत्ता पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने आलेली संधी सत्यजीत यांनी सोडू नये, असा त्यांचे वडील डॉ. सुधीर तांबे आणि इतर परिवाराचा आग्रह होता.
सत्यजीत तांबे यांनी २००७ ते २०१७ एवढा प्रदीर्घ काळ जिल्हा परिषद सदस्य म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावली. मात्र या काळात जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी त्यांना नेहमी डावलण्यात आली. २०१४ मध्ये त्यांनी विधानसभा निवडणूकही लढवली. त्यात त्यांचा पराभव झाल्यानंतर २०१७ च्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी कुटुंबातूनच त्यांचं नाव पुढे येत होतं. त्या वेळी सत्यजीत यांनीच नकार देत आपल्याला विधानसभेत काम करण्यात रस असल्याचं स्पष्ट केलं होतं, अशी माहिती निकटवर्तीयांनी दिली.
यंदाच्या निवडणुकीआधी झालेल्या सत्यजीत यांच्या मुलाखतीत त्यांना पदवीधर निवडणुकीबाबत विचारलं असता त्यांनी नम्रपणे नकार देत आपल्याला विधानसभेत काम करण्याची इच्छा असल्याचा पुनरुच्चार केला होता. डॉ. सुधीर तांबे, काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील आणि पक्षातील काही ज्येष्ठ सहकाऱ्यांनी सत्यजीत यांच्या नावाचा आग्रह धरला होता. मात्र, पदवीधर निवडणुकीबाबत आपण शेवटच्या क्षणी निर्णय घेऊ, तोपर्यंत उमेदवार अथवा एबी फॉर्म जाहीर करू नये, अशी विनंतीही सत्यजीत यांनी केल्याचं समजतं.
ही पूर्वकल्पना देऊनही अचानक दुपारी साडेबाराच्या सुमारास डॉ. सुधीर तांबे यांच्या नावाचा एबी फॉर्म आला आणि त्यांना उमेदवारी जाहीर झाली. साहजिकच तांबे परिवाराची इच्छा सत्यजीत यांनी ही निवडणूक लढवावी, अशीच होती. हा मतदारसंघ डॉ. सुधीर तांबे यांनी बळकट केला आहे. सुरुवातीला अपक्ष म्हणून आणि नंतर काँग्रेसच्या तिकिटावर निवडून येत डॉ. तांबे यांनी २००९ पासून या मतदारसंघात प्रचंड मताधिक्य राखलं आहे. विरोधी पक्ष असलेल्या भाजपलाही या मताधिक्याचा अचंबा वाटतो, असं उत्तर महाराष्ट्रातील राजकीय विश्लेषक सांगतात. डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे यांच्यासह सत्यजीत व इतर तांबे परिवाराचा जनसंपर्क प्रचंड दांडगा आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, जळगाव या पाचही जिल्ह्यांमध्ये त्यांनी राजकारणापलीकडे एक कौटुंबिक नातं लोकांसोबत तयार केलं आहे.
त्यातच गेली २०-२२ वर्षं पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे आणि चोख सांभाळणाऱ्या सत्यजीत यांच्या नेतृत्त्वाला आणखी व्यापक संधी मिळावी, अशी परिवाराची व निकटवर्तीयांची इच्छा होती. त्यामुळे डॉ. सुधीर तांबेदेखील सत्यजीत यांनी ही निवडणूक लढवावी, या मताचे होते. आपल्या वडिलांच्या, परिवाराच्या आणि हितचिंतकांच्या इच्छेखातर सत्यजीत यांनी ही उमेदवारी जाहीर केल्याची माहिती राजकीय गोटातून मिळते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.