नाशिक : तीन दिवसांपासून जिल्ह्यात परतीच्या पाऊस दमदार हजेरी लावत आहे. यामुळे येवला, निफाड, इगतपुरी, सिन्नर, मालेगाव आदी तालुक्यात मका, कांदा, सोयाबीन, भाजीपाला, द्राक्ष पिकांचे नुकसान होत आहे. (Heavy rains in district damage of crops in district )
येवल्यात मका, कांदा पालेभाज्या जमीनदोस्त
येवला : मागील दोन दिवसात तालुक्यात परतीच्या पावसाने उत्तर भागाला चांगले जोडले असून शेकडो इतर क्षेत्रातील मका,कांदा,पालेभाज्या पिकांचे नुकसान झाले आहे. दोन दिवसांत पाटोदा मंडळात १०८ मिमी तर तालुक्यात सरासरी ६४ मिमी पाऊस पडला आहे. याचवेळी पूर्व भागात मात्र अत्यल्प पाऊस पडला असल्याने या भागात अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. सोमवारी रात्री व मंगळवारी रात्री मिळून पाटोदा मंडळात सर्वाधिक १०८, सावरगावमध्ये ८२ मिमी तर नगरसूल मंडळात अवघा १६ मिलिमीटर पाऊस पडला आहे. राजापूर मंडळात देखील अत्यल्प पाऊस पडल्याने या भागात अजूनही मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे.
पश्चिम व उत्तर भागात दोन दिवसांच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कातरणी, आडगाव रेपाळ, विसापूर, मुरमी, विखरणी, अनकाई, पाटोदा, गुजरखेडे परिसरात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचा काढणीला आलेला मका आडवा पडला. कांदा पिकात पाणी साचल्याने कांदा पीक सडण्याची भीती व्यक्त होत आहे. जोरदार पावसाने मकाचे पीक भुईसपाट होत असून मक्याच्या कणसाला मोड फुटनार आहेत. दरम्यान, पूर्व भागात मात्र गेले दोन दिवस पावसाने फक्त हजेरी लावली असून अजूनही या भागात विहिरींना पाणी आलेले नाही. (latest marathi news)
असा पडला पाऊस (मिलीमीटरमध्ये)
(सकाळी ८ वाजेपर्यंतची नोंद )
मंडळ – मंगळवार – बुधवार – एकूण
येवला – २६ – ४८ – ७४
अंदरसुल – २३ – २६ – ४९
नगरसुल – ६ – १० – १६
पाटोदा – ५९- ४९ – १०८
सावरगाव – ७१ – ११- ८२
जळगाव नेऊर – ४१ – १६ – ५७
द्राक्ष छाटण्यांना ब्रेक
निफाड : तालुक्याच्या द्राक्ष पंढरीत हंगामातील द्राक्ष पीक घेण्यासाठी गोड्याबार छाटणीचा आरंभालाच परतीच्या पावसाने ब्रेक बसला आहे. ऐन छाटणीच्यावेळी पाऊस आल्याने उत्पादन शेतकऱ्यांचा खर्च वाढणार आहे. सप्टेंबर अखेरीस व ऑक्टोबर महिन्यात गोडयाबार छाटण्या घेतल्या जातात. पंधरा दिवसांपासून ऑक्टोबर छाटणीच्या पूर्वतयारीसाठी द्राक्ष उत्पादक खते देणे, पानगळ करणे,तण नियंत्रण करणे, कीटक, बुरशी नियंत्रण करणे यासाठी शेतकरी अहोरात्र मेहनत घेत आहे. यंदा काड्या परीपक्व झालेल्या असतानाच परतीच्या पावसाने दणका दिला. यामुळे निफाडच्या २५ हजार एकरावरील द्राक्ष मळ्यात छाटण्या मंदावल्या आहे.
''वातावरण बदलाचा फटका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे जिल्हाभरातील द्राक्ष बागांच्या छाटण्या थांबल्या आहे. परिणामी आता त्या छाटण्या एकाच वेळी येऊन बाजारपेठेमध्ये द्राक्ष देखील एकाच वेळी येतील आणि त्याचा फटका द्राक्ष उत्पादकांना बसू शकतो.''- रामहारी पडोळ, सोनेवाडी
वीज पडल्याने मंदिराच्या कळसाचे नुकसान
सिन्नर : मंगळवारी (ता. २४) रात्री सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात परतीच्या पावसाने चांगलेच झोडपले. यामुळे वावी-शहा रस्त्यावर असलेल्या भोलेबाबा (महादेव) मंदिराच्या १११ फूट उंचीच्या कळसावर मध्यरात्री वीज पडल्यामुळे कळसाला तडे जाऊन नुकसान झाले. तसेच मंदिराच्या आश्रयाला असलेले शेकडो पारव पक्षी देखील या घटनेत मृत्युमुखी पडले. मंगळवारी रात्री सुरु झालेला पाऊस बुधवारी (ता. २५) पहाटे थांबला. सकाळी दर्शनाला भाविक आल्यानंतर कळसाचे नुकसान झाल्याचे दिसले. मृत पक्षांचा पडलेला खच बघायला मिळाला. खंबाळे येथील रामदास पांडुरंग सोनवणे यांची गाय तर सोनांबे (ता. सिन्नर) येथील किरण रामू घोडे यांची म्हैस वीज पडल्याने मृत झाली.
शेतात पाणी
सोयाबीनचे पीक अंतिम टप्प्यात होते. अनेक ठिकाणी काढणी करून पीक शेतामध्येच होते. मंगळवारी रात्री परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने सोयाबीन भिजून शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला. कांदा, मका या पिकांमध्ये देखील पाणी साचले होते.
इगतपुरीत २४ तासांत ६५ मिलिमीटर पाऊस
इगतपुरी : पावसाचे माहेरघर असणाऱ्या इगतपुरी शहरासह तालुक्यात परतीच्या पावसाने हजेरी लावली. यामुळे भात पिकाला संजीवनी मिळाली आहे. मंगळवारी (ता.२४) दिवसभरात शहर व तालुक्यात ६५ मिलिमीटर पाऊस झाला. मागील वर्षाप्रमाणेच यंदाही आजमितीला धरणात ९५ टक्के पाणीसाठा झाला आहे. यंदाचा मॉन्सूनचा मुख्य हंगाम संपत आला असून, आता जिल्ह्याला परतीच्या पावसामुळे धरणे भरली आहेत.
इगतपुरीतील आजचा पाऊस (मिलीमीटरमध्ये )
इगतपुरी : ६५, घोटी : ८२, धारगाव : ३८, नांदगाव बु : ९३, वाडीवऱ्हे : ४६, टाकेद बु : १०६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.