Nashik News : सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी भावना दुखावलेल्या संतप्त गटाने नाशिक-पुणे महामार्गावर रास्तारोको करीत दगडफेक करीत वाहनांचे नुकसान केले. यामुळे परिसरातील वातावरण तणावग्रस्त झाले असता, पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी उपनगर पोलिसांनी एकाला अटक केली असून, उपनगर, नाशिकरोड परिसरामध्ये शांतता आहे. (Nashik highway blocked by angry mob at Suburban Chowk marathi news)
एका समाजकंटकाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केली. त्यामुळे एका समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या. आक्षेपार्ह पोस्टच्या निषेधार्थ जमाव उपनगर पोलिस ठाण्यासमोर येत संशयिताच्या अटकेची मागणी करीत ठिय्या मांडला.
घटनेची माहिती मिळताच आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहायक आयुक्त डॉ. सचिन बारी, उपनगर वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, सहायक निरीक्षक सचिन चौधरी, गुन्हेशाखांच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवीत जमावाला कारवाईचे आश्वासनही दिले.
मात्र त्यानंतर संतप्त जमावाने उपनगर सिग्नलवर आला असता, पुणे महामार्गावर रास्तारोको केला. यावेळी काही समाजकंटकांनी रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांवर दगडफेक केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला पांगविले. (latest marathi news)
उपनगर पोलिसात आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला तर, जमावाने केलेल्या वाहनांच्या तोडफोडीसंदर्भात अज्ञात हल्लेखोरांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपायुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर, नाशिकरोड हद्दीतील परिस्थितीवर करडी नजर असून, परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.
वाहतूक वळविली
पुणे महामार्गावरील परिस्थिती तणावग्रस्त असल्याने पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला. वाहतूक पोलिसांनी दत्तमंदिर चौकात गाड्या अडवून त्या जेलरोड मार्गे रवाना केल्या. तर नाशिककडून नाशिकरोड येणारी वाहने टाकळी मार्गे, उपनगर, कॅनॉल झोपडपट्टी, जेलरोडमार्गे नाशिकरोडकडे रवाना करण्यात आली.
वाहनांचे नुकसान
दगडफेकीमध्ये महापालिकेच्या सिटीलिंक बससेवेत असलेल्या एका बसवर दगडफेक करीत नुकसान करण्यात आले आहे. यासह काही चारचाकी वाहनांचेही नुकसान झाले.
पोलिसांकडून आवाहन
सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह संदेश टाकू नये, फॉरवर्ड करू नये. असे संदेश निदर्शनास आल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. आक्षेपार्ह संदेश सोशल मीडियावर केला तर, त्याविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी पोलिसांना दिले आहेत. चुकीचे वा आक्षेपार्ट संदेश व्हायरल करू नये, असेही शहर पोलिसांनी आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.