जुने नाशिक : बागवानपुरा बेळे गल्लीतील महावितरणच्या उच्च दाबाच्या डीपीत शॉर्टसर्किटमुळे घरास आग लागल्याची घटना शुक्रवारी (ता.१) दुपारी घडली. यामुळे घर पूर्णपणे जळून राख झाल्याने मोठे नुकसान झाले. घर बंद असल्याने जीवितहानी टळली. महावितरण विभागाच्या गलथान कामामुळे सतत अशा घटना घडत असल्याचा आरोप करत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. (Nashik House caught fire at bagwanpura marathi news)
बेळे गल्ली दाट लोकवस्ती असलेला भाग असून महावितरणने घरांना लागून उच्च दाबाची डीपी बसवली आहे. त्याच ठिकाणी मोठा वृक्षही वाढला आहे. वाऱ्यामुळे वृक्षांच्या फांद्यांमुळे डीपीच्या तारांमध्ये शॉर्टसर्किटच्या घटना नेहमी घडतात. शुक्रवारी (ता.१) दुपारी अशाच प्रकारे शॉर्टसर्किट होऊन डीपीला लागून असलेल्या घरास मोठी आग लागली.
संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले. परिसरातील तरुणांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी वीज वितरण तसेच अग्निशमन विभागास माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क होऊ शकला नाही. शेवटी काही तरुणांनी इतर घरांतून पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला.
तर काही तरुणांनी स्वतः अग्निशामक विभागाचे कार्यालय गाठत त्यांना माहिती दिली. आग मोठी असल्याने तरुणांना आग विझविण्यात अडचण आली. काही वेळानंतर अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. दरम्यान महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी वीज पुरवठा खंडित केला. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाण्याचा मारा करत सुमारे तासाभराच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. घटना वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. (Latest Marathi News)
डीपी स्थलांतरित करण्याची मागणी
महावितरणाच्या डीपीमुळे वारंवार शॉर्टसर्किट होतात. यापूर्वीही आग लागण्याची घटना घडली आहे. स्थानिक रहिवाशांकडून डीपी अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. वीज वितरण विभाग अधिकारी, कर्मचारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत त्वरित डीपी स्थलांतरित करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.
"डीपीमध्ये शॉर्टसर्किट नेहमी होतात. येथील वृक्षाच्या वाढलेल्या फांद्यांमुळे हा प्रकार घडतो. महावितरणसह महापालिकेकडून वृक्षांची छाटणी होत नाही. त्यामुळे आग लागण्याची घटना घडली. अग्निशमन आणि महावितरण कार्यालयास संपर्क केला. त्यांचे फोन लागले नाही. स्वतः जाऊन अग्निशामक बंब घेऊन यावा लागला."- शेरखान पठाण स्थानिक नागरिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.