Nashik News : पिंपळगाव-निफाड रस्ता रखडल्यामुळे एका आमदाराला पराभवाचे धनी व्हावे लागल्याचा इतिहास फार जुना नाही. त्यामुळे निफाड रेल्वे उड्डाणपुलाच्या १२ वर्षांपासून रखडलेल्या कामामुळे खासदारकीच्या निवडणुकीतही तीच पुनरावृत्ती झाल्याने भविष्यात निवडणूक रिंगणात येण्याआधी उमेदवारांना जनतेचे प्रश्न डावलून चालणार नाही, हेच दिंडोरी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने स्पष्ट झाले. (Important issues are still pending in Niphad taluka)
महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया म्हणून अनेक वर्षांपासून बिरुदावली मिरविणाऱ्या निफाड तालुक्यात महत्त्वाचे प्रश्न आजही प्रलंबित आहेत. सुरत-शिर्डीला जोडणाऱ्या या राज्यमार्गावरील सुमारे एक किलोमीटर लांबीच्या निफाड (कुंदेवाडी) रेल्वे उड्डाणपुलाचे काम तब्बल १२ वर्षांपासून सुरू आहे. मुंबई ते नागपूर हा ७२० किलोमीटरचा समृद्धी महामार्ग पाच वर्षांत पूर्ण होऊ शकतो.
मग निफाड रेल्वे उड्डाणपुलाचे घोडे नेमके अडले कुठे, या प्रश्नाचे उत्तर कोणत्याही लोकप्रतिनिधींकडे नसणे, ही दुर्दैवी नव्हे, तर तितकीच लाजीरवाणी बाब म्हणावी लागेल. समृद्धी महामार्गात येणाऱ्या सर्वच अडथळ्यांवर शासनाने मात केली. न्यायप्रविष्ट बाबींसोबतच भूसंपादनाचा मोबदला अशा अनेक समस्यांवर तत्काळ मार्ग काढण्यात आला.
मग, निफाड रेल्वे उड्डाणपुलाच्या मार्गातील अडथळ्यांवर मात करण्याचे कामे स्थानिक लोकप्रतिनिधींना का जमले नाही, यावर स्थानिक नेत्यांचेही तोंडावर बोट आहे. याउलट खेरवाडी रेल्वे उड्डाणपूल दोन वर्षांत पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. शिर्डी-सुरत राज्यमार्ग हा निफाड रेल्वे क्रॉसिंग करून जातो. या मार्गावर दिवसभरात हजारो मालवाहू व प्रवासी वाहनांची ये-जा सुरू असते. (latest marathi news)
पिंपळगाव बसवंत, दिंडोरी, वणी येथील कांदा व्यापारी कांदा निर्यातीसाठी कुंदेवाडी आणि खेरवाडी (नारायणगाव) या दोन्ही रेल्वेस्थानकाचा वापर करतात. परंतु अपूर्ण कामामुळे दररोज वाहतूक ठप्प होते. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार या मुद्द्यावर बोलतील, अशी अपेक्षा सामान्यांना होती. मात्र, ड्रायपोर्टवरून त्यांची गाडी पुढे सरकलीच नाही.
मागील विधानसभा निवडणुकीवेळी पिंपळगाव-निफाड रस्त्याचा प्रश्न मतदारांनी मनावर घेतला होता. त्याचा फटका शिवसेनेचे तत्कालीन आमदार अनिल कदम यांना बसला होता. हा रस्ता मंजूर करून आणण्यात ज्या आमदाराची प्रमुख भूमिका होती, त्याच आमदाराला केवळ रस्त्याचे काम रखडल्याने पराभवाचे धनी व्हावे लागले होते. अनेक जाहीर कार्यक्रमांतही अनिल कदम यांनी ही बाब बोलून दाखविली होती. त्यामुळे ‘निफाड-पिंपळगाव’ रस्ता आमदाराला पाडू शकतो, तर रेल्वे उड्डाणपूल खासदाराला घरचा रस्ता का दाखविणार नाही’ अशी भावना निवडणूक निकालानंतर सामान्य जनतेत आहे.
विद्यमान आमदारांनाही अपयश
निफाडचे आमदार दिलीप बनकर काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटासोबत गेले. या काळात बनकर यांना निफाड रेल्वे उड्डाणपुलाच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करणे सहज शक्य होते. राज्यात आणि केंद्रातही त्यांचे सरकार असल्यामुळे या कामाला गती देण्याची आवश्यकता होती. मात्र, तसे झाले नाही. आता आगामी विधानसभा निवडणुका दूर नाहीत. जनतेला गृहित धरले तर जनता त्याचा हिशेब चुकता करतेच.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.