कसबे सुकेणे : निफाड तालुक्यात आठ दिवसापासून पावसाची संततधार सुरू असून या पावसामुळे बागांमध्ये पाणी साचल्याने चिखलामुळे सप्टेंबरमध्ये होणाऱ्या द्राक्षबागांच्या छाटण्या लांबणीवर पडल्या आहेत. पाऊस उघडल्यानंतर द्राक्षबागा छाटण्याचा पोळा ऑक्टोबरमध्ये एकदम फुटेल अशी शक्यता द्राक्ष बागायतदार शेतकरी तसेच तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहेत. (Incessant rains wreak havoc on pruning schedule)
एकाच वेळी छाटलेल्या द्राक्षबागांमुळे भविष्यात द्राक्षाचे दर गडगडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वास्तविक कसबे सुकेणे व परिसरात काळ्या जातीच्या पर्पल, नानासाहेब पर्पल, जम्बो, मामा जम्बो, शरद सिडलेस, काळी सोनका, फ्लेम आदी द्राक्षबागा मोठ्या प्रमाणात आहेत.
त्या द्राक्षबागांची छाटणी १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर पर्यंत टप्प्याटप्प्याने होणे अपेक्षित असताना दहा दिवसापासून परिसरात सतत पाऊस पडत असल्याने द्राक्षबागा छाटण्यास विलंब होत आहे. यामुळे द्राक्षबागा एकदम छाटल्यास त्याचा विपरीत परिणाम होणार आहे. भविष्यात बाजारभावावरही त्याचा परिणाम दिसून येणार आहे.
गेल्या आठ दिवसापासून सतत जोरदार पाऊस पडत असल्याने द्राक्षबागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. मोठ्या प्रमाणात गाळ तयार झाला असून पाऊस उघडल्यानंतरही किमान आठ दिवस तरी द्राक्ष बागांमध्ये कोणते काम होणे शक्य नसल्याने द्राक्ष छाटणीचा हंगाम लांबण्याची शक्यता व्यक्त होत आहे. (latest marathi news)
टोमॅटो पिकांचे मोठे नुकसान
सततच्या पावसाने एका बाजूला द्राक्ष छाटणीला विलंब होत असताना टोमॅटो पिकाचेही मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना मोठ्या कसरतीने सततच्या पावसामध्ये टोमॅटोची काढणे, प्रतवारी करणे, ओलामाल सुकवणे, कॅरेटमध्ये भरणे व बाजारपेठेपर्यंत पोहोचवणे आदी कामे करावी लागत आहे,त्यातही मजुरांची टंचाई आहे. औषधी फवारणी करणे देखील जिकरीचे बनत चालले असून बाजारभाव असतानाही पावसामुळे शेतकऱ्यांवर हतबल होण्याची वेळ आली आहे.
"काळ्या जातीच्या द्राक्ष बागांची छाटणी आत्तापर्यंत होणे गरजेचे होते, परंतु संततधार पावसाने छाटण्या लांबणीवर पडल्या असून भविष्यात द्राक्ष दरासंदर्भात मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे."- रामेश्वर काठे, द्राक्ष निर्यातदार, तज्ज्ञ शेतकरी कसबे सुकेणे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.