Nashik Police Station : वाढत्या लोकसंख्येमुळे शहराचा भौगोलिक विस्तार दिवसेंदिवस वाढतो आहे. परिणामी गुन्हेगारी स्वरुपाच्या घटनाही वाढत आहेत. अशा घटनांना आळा घालण्यासाठी, वर्दळीच्या ठिकाणी पोलिसांचा वावर वाढविण्यासाठी पोलिस ठाणेनिहाय पोलिस चौक्या उभारण्यात आल्या. मात्र, वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या पोलिस चौक्या बंद राहत असल्याची गंभीर बाब ‘सकाळ’च्या निदर्शनास आल्याने या चौक्या नावापुरताच म्हणण्याची वेळ नाशिककरांवर आली आहे. ( Inconvenience of complainant due to closed police station in city )
यामुळे ज्या उद्देशाने पोलिस चौक्या सुरू करण्यात आल्या होत्या, त्या उद्देशालाच पोलिस अंमलदारांनी हरताळ फासला आहे. शहर पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये सुमारे ७२ पोलिस चौक्या आहेत. अपर पोलिस महासंचालक विश्वास नांगरे-पाटील हे नाशिकचे पोलिस आयुक्त असताना पोलिस चौक्याचे सुशोभिकरणासह चौक्याची संख्या वाढविण्यात आली होती. तसेच, वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या पोलिस चौक्यांना मिनी पोलिस ठाण्याचे स्वरुप देण्यात आला होते.
यामागे, वर्दळीच्या ठिकाणी गुन्हेगारी घटना घडल्यास तक्रारदारास तत्काळ पोलिस चौकीत संपर्क साधता यावा असा उद्देश होता. तसेच, चौकीत उपलब्ध पोलिस अंमलदारांकडून वर्दळीच्या ठिकाणांसह परिसरात गस्त व निगराणी ठेवणेही शक्य होत होते. यासाठी उपनिरीक्षकासह दोन ते चार अंमलदारांची नेमणूकही करण्यात आली होती. परंतु पोलिस चौक्यांच्या मूळ उद्ेदशाच हरताळ फासण्यात आला आहे.
पूर्वी, पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पोलिस चौक्या आता वर्दळीच्या, गर्दीच्या ठिकाणी आल्या आहेत. पूर्वीपासून बंद असलेल्या पोलिस चौक्या पुन्हा कार्यान्वित करण्यात आल्या. परिसरातील हाणामारी, वादविवाद, कौंठुंबिक तक्रारी घेऊन नागरिक या पोलीस चौक्यांमध्ये जात होते. परंतु गेल्या महिन्यांपासून यातील बहुतांशी पोलिस चौक्याच बंद स्थितीत आहेत.
अगदी, पंचवटीतील कपालेश्वर मंदिराच्या पायथ्याशी असलेली पोलिस चौकी नेहमीच बंद असते. याचप्रमाणे, सिडकोतील त्रिमूर्ती चौकातील पोलीस चौकी, पवननगर भाजी मार्केटलगतची पोलिस चौकी, कॉलेजरोडवरील पोलिस चौकी आदी पोलिस चौक्या बंद असल्याने तक्रारदारांना पायपीठ करावी लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
तक्रार चौकीलाच...
गेल्या वर्षी अंकुश शिंदे पोलीस आयुक्त असताना, त्यांनी पोलिस ठाण्यांमध्ये किरकोळ घटनांसाठी होणारी तक्रारदारांची गर्दी टाळण्यासाठी त्या-त्या पोलिस चौक्यांमध्येच तक्रारी घेण्याचे आदेश दिले होते. मात्र गुन्हा दाखल करावयाचा असेल तरच तक्रारदाराला चौकीच्या अंमलदाराकडून पोलिस ठाण्यात नेले जात होते. यामुळे पोलिस चौक्या नियमित सुरू राहत आणि किरकोळ वाद मिटविणे वा अदखलपात्र तक्रारींची नोंद पोलिस चौक्यांमध्ये घेतली जात होती, तसे आदेशच शिंदे यांनी दिले होते.
पोलिस चौकीच बंद
गेल्या आठवड्यामध्ये त्रिमूर्ती चौकात सायंकाळच्या वेळी दिव्यांग भाजीविक्रेत्याला एका टवाळखोराने बेदम मारहाण केली होती. तसेच, त्याच्याकडील हत्याराचा धाकही दाखविला होता. काही जागरुक नागरिकांनी त्रिमूर्ती चौकातील पोलिस चौकीकडे धाव घेतली असता, चौकीच बंद आढळून आली होती. त्याचप्रमाणे, गंगाघाटावर दररोज हजारो भाविक येत असतात. परंतु याठिकाणी महिलांच्या पर्स, दागिने, पर्यटकांचे सामान चोरीला जाण्याचे प्रकार घडतात.
अशावेळी परगावाहून आलेले पोलिस चौकीकडे जातात परंतु ती बंद असल्याने बर्याच अंतरावर असलेल्या पंचवटी पोलिस ठाण्यात जाण्याकडे पाठ फिरवितात. यातून गुन्हेगारांचाच लाभ होतो आहे. असे प्रकार अनेक ठिकाणी घडत असतात. वादावादीचे प्रकार घडल्यास पोलिस चौकीत धाव घेतली जाते परंतु चौकीच बंद असल्याने वाद वाढत जाऊन त्यातून गंभीरस्वरुपाची घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळे पोलिस चौक्या नियमित सुरू ठेवण्याची नागरिकांचीच मागणी आहे. (latest marathi news)
बंद आढळून आलेल्या पोलिस चौक्या
- तिडको कॉलनी पोलिस चौकी (मुंबई नाका पोलिस ठाणे)
- दूध बाजार पोलिस चौकी (भद्रकाली पोलिस ठाणे)
- त्र्यंबक नाका पोलिस चौकी (भद्रकाली पोलिस ठाणे)
- शालिमार पोलिस चौकी (भद्रकाली पोलिस ठाणे)
- रामकुंड पोलिस चौकी (पंचवटी पोलिस ठाणे)
- सरदार चौक पोलिस चौकी (पंचवटी पोलिस ठाणे)
- पवननगर पोलिस चौकी (अंबड पोलिस ठाणे)
- त्रिमूर्ती चौक पोलिस चौकी (अंबड पोलिस ठाणे)
- कॉलेज रोड पोलिस चौकी (गंगापूर पोलिस ठाणे)
- अशोका मार्ग पोलिस चौकी (मुंबई नाका पोलिस ठाणे)
- नाशिकरोड बसस्थानक पोलिस चौकी (नाशिकरोड पोलिस ठाणे)
मनुष्यबळाचा अभावाचा परिणाम
नाशिक शहर पोलिस आयुक्तालय हद्दीतील लोकसंख्या पाहता आयुक्तालयातील पोलिस ठाण्यांचा विस्तार गरजेचा आहे. तसेच मनुष्यबळही वाढविण्याची गरज आहे. आजमितीस आयुक्तालयाकडे १४ पोलीस ठाण्यांसह मुख्यालय असून, सुमारे दोन हजार ८०० असे मनुष्यबळ आहे.
पोलिस ठाण्याच्या हद्द वाढली परंतु मनुष्यबळ तेवढेच आहे. याशिवाय, सततचा पोलीस बंदोबस्त आणि गुन्ह्याचा तपास यामुळे पोलिस चौक्या कार्यान्वित ठेवण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता भासते. ही बाब वास्तव असली तरी, पोलिस चौक्यांना आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नियमित कार्यान्वित करण्याचे आव्हान पोलीस आयुक्तालयासमोर राहणार आहे.
''वर्दळीच्या वा गर्दीच्या ठिकाणी असलेल्या पोलीस चौक्या नियमित सुरू ठेवण्याचा प्रयत्न असतो. परंतु पोलिस ठाण्याकडे असलेले मनुष्यबळ आणि अतिरिक्त कामाचा व्याप याचा समतोल वा नियोजन करणे तितकेसे शक्य होत नसल्याने काही पोलीस चौक्या या बंद असतात. परंतु आगामी कुंभमेळा पाहाता यातून लवकरच मार्ग काढला जाईल.''- मोनिका राऊत, पोलिस उपायुक्त, परिमंडळ दोन.
''पोलीस ठाण्यांतर्गत चौक्या नियमित सुरू ठेवण्याचा प्रयत्न असतो. परंतु ऐनवेळीचे बंदोबस्ता, घडामोडींमुळे चौक्या नियमित सुरू ठेवण्यास अडचणी येतात. तसेच, उपलब्ध मनुष्यबळाची कमतरतेचाही त्यावर परिणाम होता. परंतु चौक्या नियमित सुरू रहाव्यात यासाठी प्रयत्न केले जातील.''- किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त, परिमंडळ एक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.