नाशिक : नाशिकचे धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रातील महत्त्व, गोदेचे सर्वदूर पसरलेले माहात्म्य यामुळे येथे वर्षभर भाविकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे सहज मिळणाऱ्या भिक्षेबरोबरच अन्नछत्रालयात दोनवेळच्या पोटाची खळगी सहज भरत असल्याने रामतीर्थावरील भिकाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे.
त्यामुळे प्रशासनाबरोबरच भाविकांपुढील डोकेदुखी वाढली आहे. कोरोनाकाळात महापालिका व काही सामाजिक संस्थांनी ‘बेगर हाऊस’ ची निर्मिती केली होती. यात एकाच ठिकाणी गोदाघाटावरील बहुसंख्य भिकारी वास्तव्यास होते.
तपोवनातही असे बेगर हाऊस उभारले होते, त्यामागे कोरोनाचा वाढता उद्रेक थांबावा, हा उद्देश होता. आता कोरोना हद्दपार झाला खरा पण त्यानंतर भिकाऱ्यांच्या संख्येत चौपट वाढ झाली आहे. (Nashik beggars on Ram Tirtha marathi news)
श्राद्धादी विधीसाठी रामतीर्थावर श्रद्धाळू भाविकांचा वर्षभर राबता असतो. यात राज्याबरोबरच परराज्यातील भाविकही मोठ्या संख्येने येतात. धार्मिकक्षेत्री दानधर्माला मोठे महत्त्व आहे. सहज उपलब्ध होणारे दोन वेळचे जेवण व सोबत चांगली भिक्षाही मिळत असल्याने सध्या रामतीर्थ ते टाळकुटेश्वरदरम्यान चारशे ते पाचशे भिकारी वास्तव्यास आहेत.
यातील अनेकजण रात्री गणेशवाडीतील भाजी मंडईसह नवीन शाही मार्गावर वास्तव्य करतात. हे भिकारी रामतीर्थावर येणाऱ्या भाविकांना भिक्षेसाठी हैराण करतात, एखाद्याने भिक्षा देण्यास नकार दिल्यास थेट शिवीगाळही केली जात असल्याचा अनुभव अनेकांनी कथन केला.
गाडगे महाराज धर्मशाळेसह रामतीर्थ परिसरात दानशूरांकडून सहज उपलब्ध भोजन व रोख स्वरूपात घसघशीत भिक्षाही मिळत असल्याने यातील अनेक भिकारी व्यसनाधीन बनले आहेत. विशेष म्हणजे एखाद्या दिवशी भिक्षा न मिळाल्यास चोरीही केली जाते.
वाढत्या व्यसनाधिनतेमुळे गोदाघाटाच्या शांततेसही गालबोट लागत आहे. यातील बहुसंख्य भिकारी विविध व्याधींनी त्रस्त आहेत. भिकाऱ्यांच्या वास्तव्याने नवीन शाही मार्ग, कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेली भाजी मंडईला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. (Latest Marathi News)
काम नकोच...
अंध, दिव्यांग व काही कारणास्तव विकलांग झालेल्यांनी भीक मागणे संत गाडगे महाराज यांना अपेक्षित होते. मात्र सहज मिळणारी भिक्षा व दोन वेळेस पोटभर जेवण यामुळे अंध, दिव्यांग नव्हे तर चांगली धडधाकट माणसेही भीक मागताना दिसतात. सर्वच मोफत मिळत असल्याने यातील अनेकांनी काम करणे सोडून भिक्षेवर जगणे सुरू केले आहे.
आणखी भिकारी वाढणार?
नाशिकला २०२६-२७ ला सिंहस्थ कुंभमेळा आहे. याकाळात केवळ राज्यातीलच नव्हे तर देशभरातील भिकारी शहरात येण्याची शक्यता आहे. याशिवाय राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरही गोदाघाटावरील व मंदिरासमोरील भिकाऱ्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. यातील काहीजण गुन्हेगारी वृत्तीचे असतात, त्यामुळे भाविकांसह प्रशासनापुढील डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
"रामतीर्थावरील भिकाऱ्यांच्या वाढती संख्येने येथील बकालपणात वाढ झाली आहे. भीक न दिल्यास काही व्यसनी भिकारी थेट शिवीगाळही करत असल्याचा भाविकांचा अनुभव आहे."
- सुरेश शंकर शुक्ल, पुरोहित, रामतीर्थ
"पूर्वी केवळ अंध, दिव्यांगच भीक मागून उदरनिर्वाह करत असे. परंतु हल्ली ज्यांची काम करण्याची क्षमता आहे, असे धडधाकटही भीक मागू लागले आहेत."
- डॉ. नरेंद्र धारणे, वास्तुशास्त्र अभ्यासक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.