Nashik News : नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)तर्फे येत्या डिसेंबरमध्ये चार दिवसांचे ‘निमा इंडेक्स-२०२४’ हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे औद्योगिक प्रदर्शन ६ ते ९ डिसेंबरदरम्यान ठक्कर मैदान, त्र्यंबक रोड येथे भरविण्यात येणार आहे. ‘निमा’चे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी येथील त्र्यंबक रस्त्यावरील हॉटेल बीएलव्हीडीमध्ये झालेल्या प्रदर्शनाच्या माहितीपुस्तिकेच्या प्रकाशनप्रसंगी ही माहिती दिली. (NIMA Index Exhibition)
संस्थेच्या सर्व माजी अध्यक्षांच्या उपस्थितीत ही घोषणा होताच टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. सुमारे सहा वर्षांच्या खंडानंतर ‘निमा’चे हे औद्योगिक प्रदर्शन होत असल्याने सर्वांच्या नजरा या उपक्रमाकडे लागल्या आहेत. यंदाच्या प्रदर्शनाची ‘कनेक्ट, कोलॅब्रेट ॲण्ड क्रिएट’ ही थीम असेल. या प्रदर्शनात अभियांत्रिकी, मशिन टूल्स, मेकॅट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, औद्योगिक उपभोग्य वस्तू.
आयटी, आयटीएस, ऑफिस ऑटोमेशन, अपारंपरिक ऊर्जा, बँकिंग, विमा आणि वित्त, शिक्षण आणि पर्यटन, खास आकर्षण म्हणजे ‘ईव्ही’ व ‘एआय’ची विविध प्रकारची उत्पादने तसेच ईव्ही वाहने आणि एआय उत्पादने या विषयी ३५० हून अधिक स्टॉल्स या प्रदर्शनात असतील. महिला स्टार्टअप उद्योजकांसाठी खास सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रदर्शनात ‘इंडस्ट्री- ४.०’वर आधारित अत्याधुनिक यंत्रसामग्रीबरोबरच नावीन्यपूर्ण उत्पादित केलेल्या उदयोन्मुख उद्योजकांचे नवनवीन कलाविष्कार पाहण्याची संधी लोकांना उपलब्ध होणार आहे.
विविध तज्ज्ञांची व्याख्याने
‘बी टू बी’मध्ये विविध विषयांवरील चर्चा, गरजू उद्योजकांना वित्तसहाय्य आणि त्यांना प्रोत्साहन देणे, मोठ्या गुंतवणुकीच्या प्रकल्पांसाठी रेड कार्पेट टाकणे, निर्यातीला प्रोत्साहन देणे, विविध विषयांवरील तज्ज्ञांची व्याख्याने आदी सारे काही या प्रदर्शनात असल्याने उद्योजक तसेच सर्वसामान्य व नवतरुण उद्योजकांसाठी ती एक प्रकारे मेजवानीच ठरणार आहे.
‘निमा’ने पुन्हा घेतली भरारी
निमा संघटनेचे काम गेल्या ५४ वर्षांपासून सुरू असून, साडेचार हजारांहून अधिक सभासद आहेत. जिल्ह्यात असलेल्या १६ हजारांहून अधिक उद्योगांचे यशस्वी प्रतिनिधित्व संघटना करीत आहे. अडचणीच्या कालावधीनंतर वर्षभरापासून ‘निमा’च्या कार्यात बेळे यांनी लक्ष घातल्यावर संघटनेने भरारी घेतली. (latest marathi news)
त्यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत सामाजिक बांधिलकी जोपासत असतानाच उद्योजकांना सहाय्यभूत ठरणारे व नाशिकमध्ये गुंतवणुकीला पूरक वातावरण निर्माण होण्यासाठी निमा पॉवर, निमा बँक समीट, स्टार्ट अप समीट, उत्कृष्ट कामगार कर्मचारी पुरस्कार, निमा ऍप, निमा डिरेक्टरी आदी विविध उपक्रम राबविले आहेत, असे गौरवोद्गार ‘निमा’चे माजी अध्यक्ष विवेक गोगटे यांनी काढले.
गुंतवणूकदारांना रेड कार्पेट
२०१२ आणि २०१८ मध्ये भरविण्यात आलेल्या प्रदर्शनांची उद्योग जगतात खूप चर्चा झाली होती. २०१८ चे प्रदर्शन तर मुंबईत भरवून ‘निमा’ने औद्योगिक क्षेत्राचे आम्ही राज्यातही नेतृत्व करू शकतो, हे सिद्ध करून दाखविले आहे. आता सहा वर्षांच्या कालखंडानंतर हे प्रदर्शन होत असल्याने ते अधिकाधिक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याबरोबरच येथील उद्योजकांना आपली उत्पादने जास्तीत जास्त प्रमाणात बाहेर पाठविण्याच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे व उद्योग जगतात त्याची चर्चा व्हावी, हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवूनच नियोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
‘निमा’चे माजी अध्यक्ष डी. जी. जोशी, रमेश वैश्य यांनी प्रदर्शनाबद्दल अपेक्षा व्यक्त करून बेळे यांचा प्रदर्शनाचा अनुभव पाहता हे प्रदर्शन १०० टक्के यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त केला. ‘निमा’चे सचिव निखिल पांचाळ यांनी आभार मानले. ‘निमा’चे उपाध्यक्ष आशिष नहार, राजेंद्र अहिरे, कोशाध्यक्ष राजेंद्र वडनेरे, सहसचिव मनीष रावल, ‘आयमा’चे अध्यक्ष ललित बूब, उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, कोशाध्यक्ष गोविंद झा.
सहसचिव योगिता आहेर, हर्षद बेळे, वाहतूकदार संघटनेचे अंजू सिंगल, राजेंद्र फड, ‘नरेडको’चे सुनील गवांदे, शंतनू देशपांडे, श्रीरंग हारदे, प्रकाश गुंजाळ, मनोज मुळे, राजेंद्र कोठावदे, दिलीप वाघ, कैलास पाटील, नितीन आव्हाड, शशांक मणेरीकर, तसेच ज्येष्ठ व नामांकित उद्योजक आणि २०० हून अधिक उद्योजक उपस्थित होते. दरम्यान, कार्यक्रमाच्या सुरवातीलाच अनेकांनी या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी नोंदणी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.