Nashik Kala Katta: सारंगीचे किमयागार डॉ. रुद्राक्ष साक्रीकर

Dr Rudraksh Sakrikar
Dr Rudraksh Sakrikaresakal
Updated on

"मानवी मनाला सुख देणाऱ्या बऱ्याचशा कला या प्रयत्नसाध्य असतात. पण काही कला मात्र या प्रयत्नांचेही कुंपण ओलांडून कष्टाच्या आडमार्गावरून जातात. असा आडमार्ग जोखणारे विरळ कलाकार म्हणजे किमयागार. आजच्या तरुण पिढीचे सारंगीवादक रुद्राक्ष साक्रीकर हे असेच किमयागार कलाकार. ‘सकाळ’ वाचकांशी संवाद साधताना ते म्हणतात, नुसती रसिकांची वाहवा मिळविण्यासाठी केली जाते ती साधना नव्हे आणि ते संगीतही नव्हे. कोणतीही कला ही प्रदर्शनासाठी असूच शकत नाही. उपजीविका, पैसा, प्रसिद्धी, स्टेज या पलीकडे जाऊन ‘साधनेसाठी साधना’ या निरपेक्ष आणि शुद्ध भावाने साधनेकडे बघितले तरच निर्गुण संगीताचे सगुण रूप अनुभवास येऊ शकते."- तृप्ती चावरे- तिजारे

(Nashik Kala Katta Alchemist of Sarangi Dr Rudraksh Sakrikar nashik)

बनारस शहर, विद्येचे माहेरघर. तेथील हिंदू विश्वविद्यालयात संस्कृत एमए करण्यासाठी रुद्राक्षजींनी प्रवेश घेतला. त्या कलासंपन्न नगरीतच त्यांना सारंगी या अद्भुत वाद्यांचे वेड लागले. इतकेच नव्हे, ते वेड पुरविणारा सक्षम गुरूही लाभला.

संस्कृतसाठी सहा सुवर्णपदके तर मिळालीच, परंतु त्याचबरोबर सुरू झाला सारंगीच्या ज्ञानग्रहणाचा बिकट वाटेवरचा एक विलक्षण प्रवास. अवघड, जगावेगळा, स्वतःच्या जीवनावर अभिजात शुद्धतेचे पैलू करून घेणारा एक ध्यासवेडा प्रवास.

संस्कृतसाठी सादर केलेल्या त्यांच्या प्रबंधाला राष्ट्रीय सुवर्णपदक मिळाले. पण इतके मोठे यश मिळवूनही त्यांनी सारंगीचा ध्यास सोडला नाही, कारण यश अपयशाच्याही पलीकडे असणारा जीवनाचा खरा अर्थ त्यांना सारंगीच्या रूपाने खुणावत होता.

अनेक तपानंतर, काळारामाच्या प्रांगणात नाशिककर रसिकांनी त्यांच्या सारंगीचा श्रवणानंद ‘अष्टौप्रहर स्वरहोत्र’ या कार्यक्रमातून नुकताच भरभरून घेतला. यात त्यांनी वाजविलेल्या भारतीय रागसंगीतातील दहा थाटाचे दर्शन विलोभनीय होते.

संगीतातील त्यांना उमगलेले मर्म सांगताना ते म्हणतात, आपल्या भोवतालचे हे जग असंख्य पदार्थांनी बनलेले आहे, पण प्रत्येक पदार्थाच्या निर्मितीच्या मुळाशी शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध ही पाचच तत्त्वे असतात.

यापैकी इतर चार तत्त्वांचा अनुभव वेगवेगळ्या गोष्टीतून येऊ शकतो मात्र ‘शब्द’ या पंचतत्वाचा अनुभव घेण्यासाठी, निर्गुणातल्या रागसंगीताचा रसास्वाद घेता आला तरच ती अनुभूती उच्च दर्जाची ठरते. रुद्राक्षजी अनेक विषयातील प्रकांड पंडित आणि विद्वान विश्वास साक्रीकर यांचे सुपुत्र.

त्यांच्या मातोश्री विद्याताई साक्रीकर यांना उपजतच गोड गळ्याची देणगी लाभलेली आहे. घरात बालपणापासूनच संगीताचे संस्कार असल्यामुळे त्यांच्या मनात एका निर्गुण संगीताने आधीच आकार घेतला होता. पं. संतोष मिश्रा गुरुजींनी त्यांच्यातली ही निराकाराची कला ओळखली आणि त्यातूनच रुद्राक्षजींची मूर्ती घडू लागली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Dr Rudraksh Sakrikar
Nashik Kala Katta: रंगभूमीवर जिवापाड प्रेम करणाऱ्या चतुरस्र अभिनेत्री : विद्या करंजीकर

त्यांनी सारंगीची आपली तालीम चतुरस्र सारंगी वादक पं. संतोष मिश्रा यांच्या घरी चार वर्षे गुरुकुल पद्धतीने राहून घेतली. गुरुकुलातील या अखंड साधनेमुळे त्यांचे मन, बुद्धी आणि चित्त संगीतानंदात आकंठ बुडून गेले.

अर्थात सारंगी हे वाद्य सोपे नाही. ते वाजविण्यासाठी हाताच्या बोटांच्या नखांखाली अक्षरश जखमा होतात. त्या जखमांच्या अलंकारांसह सारंगीची कठोर साधना करावी लागते. रुद्राक्षजींनी अतिशय जिद्दीने व निष्ठेने, न डगमगता ही कठीण साधना केली, आणि सारंगी त्यांच्या हाताला खऱ्या अर्थाने ‘लागू’ लागली.

गुरुजींकडे घेतलेल्या तालमीच्या आठवणी सांगताना रुद्राक्षजी म्हणतात, गुरूंचे विचार समजतात, पण त्यासाठी शरीराची, मनाची आणि बुद्धीची कसोटी लागते. वरवरचा अभ्यास करून भागत नाही तर सूक्ष्मावलोकन तयार व्हावे लागते.

गुरुजींनी तंत्रशिक्षणाबरोबरच माझ्याकडून हे सूक्ष्मालोकन तयार करून घेतले. प्रत्यक्ष तालमीबरोबरच त्यांच्या वादनातील निरीक्षणातून हळूहळू नजर घडत गेली. गुरुजींचा रागविचार, कलाविचार आणि व्यक्तिमत्त्व जवळून पाहता आले.

रागसंगीतामध्ये असर, अर्थात परिणामकारकता हा घटक सगळ्यात महत्त्वाचा असतो. प्रत्येक रागाचा स्वभाव हा वेगवेगळा असतो आणि त्यानुसार असर बदलत जातो.

तो ओळखू येण्यासाठी त्यांनी मला अतिशय निरपेक्ष आणि उदार मनाने विद्या दिली. सारंगी या वाद्याची रचना, स्पर्श आणि हाताळणी अतिशय गुंतागुंतीची आहे. त्याविषयी रुद्राक्षजींकडून अधिक जाणून घेऊ या पुढच्या भागात...

Dr Rudraksh Sakrikar
Nashik Kala Katta Part 2: वास्तववादी चित्रकलेतील मर्म उलगडणारे : बबन जाधव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.