Nashik Kala Katta: हृदयस्पर्शी, भावपूर्ण अभिजात व्हायोलिन वादक : अनिल दैठणकर

Anil Daithankar
Anil Daithankaresakal
Updated on

"भारतीय संगीतात तंतुवाद्यांना खूप प्राचीन परंपरा आहे. तंतुवाद्याचे मुख्यतः दोन प्रकार अस्तित्वात आहेत, तारा छेडून वाजवायची वाद्ये आणि गजाने किंवा बो ने वाजवायची वाद्ये. व्हायोलिन यापैकी दुसऱ्या प्रकारातले वाद्य. मुळात पाश्चात्त्य बनावटीचे हे वाद्य, परंतु यात दडलेल्या गायकीच्या कुतूहलामुळे आज ते भारतीय संगीताच्या मैफलीच्या मध्यभागी विराजमान झालेले स्वतंत्र वाद्य आहे. आगळ्यावेगळ्या वाद्यांचे हृदयस्पर्शी आणि भावपूर्ण अभिजात वादन करणारे नाशिकचे ज्येष्ठ कलाकार म्हणजे अनिल दैठणकर. ‘सकाळ’ वाचकांशी संवाद साधताना ते म्हणतात, भारतीय राग संगीताची पहिली ओळख म्हणजे स्वर. तंतुवाद्य वाजविणाऱ्याला सर्वप्रथम स्वरांची जाण आणि ओढ असणे आवश्यक आहे. मग हीच ओढ कलाकारास पारंपारिक किंवा आधुनिकतेच्या पलीकडे घेऊन जाते. संगीताची भाषा ज्या स्वरांपासून निर्माण होते त्या स्वरांचे चढउतार, स्वरांमधली गोलाई आणि जोडकाम हे सगळे व्हायोलिन वाजवित असताना प्रकर्षाने समजते." -तृप्ती चावरे-तिजारे

(Nashik Kala Katta Heartfelt Soulful Classical Violinist Anil Daithankar)

अनिल सरांना त्यांचे गुरू पं. मधुकरबुवा जोशी यांच्याकडून अभिजात शास्त्रीय संगीताची, तसेच ग्वाल्हेर घराण्यात गायल्या जाणाऱ्या खास व अनवट रागांची तालीम मिळाली. वैशिष्ट्यपूर्ण व घरंदाज बंदिशीच्या विद्येमुळे त्यांची वादनशैली गायकी अंगाने घडू लागली.

आपले प्रेरणास्तोत्र असलेल्या गुरूंविषयी ते म्हणतात, माझे गुरुजी पं. मधुबुवा स्वतः गाऊन शिकवीत असतं. त्यांनी गायलेला एखादा आलाप माझ्या व्हायोलिन वादनातून तसाच्या तसाच काढता येणं हे फार मोठं आव्हान असायचं.

कारण त्या आलापात संपूर्ण रागाचं सार चलन, शुद्धत्व आणि सौंदर्य दडलेलं असायचं. त्या, त्या रागाचं टायमिंग व्हायोलिनमधून जसंच्या तसं काढता आलं, की गुरुजींच्या चेहऱ्यावरील स्मित हास्याने पोचपावती मिळायची.

आपल्या वाद्याच्या वैशिष्ट्यांबद्दल ते म्हणतात, ‘मींड हे भारतीय राग संगीताचे खरे सौंदर्य’. या मींडेचा वापर करून कुठलाही आलाप किंवा तान न तुटता सलग निघण्याला व्हायोलिन वादनात फार महत्त्व आहे.

एकाच तारेवर गळ्यातून निघतो तसाच नाद वाजवता येणे हे सरावाने साधते. या नादातून रागाचे दर्शन घेण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. अनिल सरांना भारतातील विख्यात कलाकार पद्मभूषण डॉ. एन. राजम यांचेही मार्गदर्शन लाभले आहे.

त्यांच्याकडून व्हायोलिन वादनासाठी आवश्यक असलेली विविध तंत्रे आणि या वाद्याची वैशिष्ट्यपूर्ण हाताळणी त्यांना शिकावयास मिळाली. त्यातून त्यांची नजर अधिक प्रगल्भ होत गेली. परंपरेची जाण आणि भान असलेल्या दोन महान गुरुजनांच्या वादन शैलीचा संमिश्र वापर अनिलजी अत्यंत कलात्मक पद्धतीने करतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Anil Daithankar
Nashik Kala Katta: नव्या पिढीचे प्रबोधनकार : दीपक करंजीकर

त्यामुळे त्यांचे शैलीदार वादन हे अभिजात रागसंगीताच्या आविष्कारात राहूनही थेट हृदयाला भिडते. सुमधुर भावगीते, चित्रपट गीते या माध्यमातूनही ते भारतीय संगीताचे दर्शन घडवीत असतात. रागातील विविध बंदिशी तसेच वाद्य वादनातील गती व धून सादर करताना त्यातील सौंदर्य उलगडून दाखविण्याकडे त्यांचा कल असतो.

आजच्या तरुण पिढीला संदेश देताना ते म्हणतात, व्हायोलिन हे वाद्य ऐकायला जितके सुरेल तितकेच शिकायला तसे अवघड. कारण यात इतर वाद्यांप्रमाणे रेडीमेड स्वर नाहीत. त्यामुळे मूलभूत स्वरज्ञान असणे बेसिक गरज आहे.

आजकालच्या पिढीमध्ये पेशन्स नसल्यामुळे उत्साहाच्या भरात शिकायला सुरवात करणाऱ्यांची संख्या बरीच असते, परंतु त्याहीपेक्षा सुरवात करून सोडून देणाऱ्यांची संख्या जास्त आहे. जिद्द, सातत्य आणि चिकाटी हे गुण अंगी बाणवले तरच हे वाद्य हाती लागते.

डोळसपणे प्रयत्न केले असतील तर यश नक्कीच मिळते. या वाद्याच्या साधनेने मनाची एकाग्रता होऊन आयुष्यही सुरेल आणि सुंदर बनू शकते. व्हायोलिन वाद्याच्या प्रचार आणि प्रसारासाठी त्यांच्या ‘स्वरालीन व्हायोलिन अकादमी’ तर्फे अविरत प्रयत्न सुरू असतात.

नाशिकमध्ये व्हायोलिन सारखे अवघड वाद्य टिकवून ठेवणाऱ्या अनिल दैठणकरांच्या स्तुत्य प्रयत्नांना व पुढील वाटचालीला मनःपूर्वक शुभेच्छा.

Anil Daithankar
Nashik Kala Katta Part 2: समाज प्रबोधनाची कला गवसलेले विचारवंत : दीपक करंजीकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.