"नवनिर्मितीला सतत प्रेरक ठरणारी दृश्यकला म्हणजे चित्रकला. या कलेकडे नव्या सौंदर्यदृष्टीने बघण्याचा विचार चित्रकार केशव कासार यांनी उलगडून सांगितला तेव्हा त्यांच्या चित्रांमधल्या रंगसंगतीचा आणि आशयाचा खरा अर्थ मला उलगडत गेला. कोणताही कलाकार हा सामान्य माणसापेक्षा जरा वेगळा असतो, कारण कलेची उपासना करता करता तो नकळतपणे स्वतःच्या मनाच्या आणि अस्तित्वाच्या अगदी जवळ जाऊन पोचलेला असतो. त्या मनस्वीपणातून त्याला विशिष्ट ‘कलासंकेत’ मिळत असतात.
त्या संकेतातून उलगडणाऱ्या अर्थाचे बोट धरून, तो स्वतःच्या कलेशी साधना संवाद साधत असतो. केशव सर असेच ‘मनस्वी’ कलासाधक आहेत हे मला जाणवले. ते आपल्या साधना संवादातून कलेशी समरस होणारे आहेत म्हणूनच साक्षात त्यांची कलाच त्यांना न मागता, सारे काही देत असते असे ते सांगतात. श्रृंखला चित्रे (सिरीज पेंटिंग) या त्यांचे प्रभुत्व असलेल्या प्रकारात पन्नास चित्रांच्या प्रमाणबद्ध चित्रकृती साकारताना, त्यांच्या प्रत्येक चित्रामागील विचार हा विषयाला आणि आशयाला धरूनच प्रकट होत असतो हे विशेष." -तृप्ती चावरे- तिजारे.
(nashik kala katta interview of painter keshav kasar by trupti chaware tijare)
चित्रकृतीमागचा त्यांचा विचार उलगडून सांगताना ते म्हणतात, दृश्यातले वास्तव आणि मनातली प्रमाणबद्धता याची सांगड मला चित्रकलेत यासाठी महत्त्वाची वाटते, कारण चित्रकाराने वास्तवाच्या पलीकडे जात असताना वास्तवाइतकेच उत्कटपणे अभिव्यक्त होणे हे मला एक कृतिशील आव्हान वाटते.
हे आव्हान पेलताना स्वतःची प्रमाणे इतकी सवयीची व्हावी लागतात की जणू एखादा टायपिस्ट कोणतेही मॅटर अगदी सहजच एकसारखे टाइप करतोय असे वाटले पाहिजे. बोटांचा, डोळ्यांचा, कल्पनेचा आणि एकसारख्या प्रमाणाचा संवाद अखंड सुरू पाहिजे.
त्यासाठी वास्तव आणि प्रमाण यांची सांगड घालण्याचा तितका विचारांचा सरावही व्हायला हवा. तोच चित्रकारांचा रियाज असतो. हा रियाज निरीक्षणातून आणि वाचनातूनही घडत जातो.
शब्दसंग्रह कमी असेल तर ज्याप्रमाणे लेखक शब्दातून व्यक्त होऊ शकत नाही, त्याचप्रमाणे प्रमाणबद्धतेचा हाताला सराव नसेल तर चित्रकार देखील चित्रातून व्यक्त होऊ शकत नाही. एखादा फोटो किंवा दृश्य बघून त्याचे टूडी किंवा थ्रीडी काम करणे एक वेळ सोपे परंतु प्रत्यक्ष माणूस समोर बसवून, वास्तवातले प्रमाण कागदावर रेखाटने यासाठी मन, बुद्धी, डोळे आणि हात यांच्यात सुसंवादच लागतो.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
केशव सरांची कलाकृती ही वरवरच्या दृश्यमानतेतून आलेली नसून मानवी मनावर उमटणाऱ्या वृत्तीतरंगातून प्रकट झालेली ती एक श्रेष्ठ अभिव्यक्ती आहे, आपल्याच अंतरंगाचा शोध घेण्यास प्रेरक ठरणारी.
म्हणूनच ते आपल्या कलाकृती बद्दल म्हणतात, प्रत्यक्ष साकारलेल्या कलाकृतींपेक्षाही, बाजूला ठेवून दिलेल्या अपूर्ण कलाकृती माझ्यासाठी जास्त आनंददायी असतात. कारण, माझ्या अंतचक्षुंच्या पडद्यावर त्या कलाकृती पूर्ण झालेल्या असतात, परंतु तंत्र कमी पडल्यामुळे त्या कलाकृतीला त्या त्या वेळी साकार रूप मिळालेले नसते. पण निराकाराची कल्पना करण्यातही एक वेगळा आनंद लपलेला असतोच ना, तो मला अशा ‘राहून गेलेल्या’ कलाकृतीकडे बघून नेहमीच मिळतो.
विकार, विचार, आणि तर्क यापैकी कशातही न रमता साधक वृत्तीने केवळ निखळ कलानंदात रमलेले केशवजी नवीन पिढीला संदेश देताना म्हणतात, चित्र पाहायला शिकणे ही या रियाजाची सुरवात आहे असे मानले तर संगीत, वाचन अशा इतर अनेक पूरक कलांचा आस्वाद घेता येणे हा त्या आरंभाच्या पुढचा धागा आहे.
शेवटी या साधनेला आणि आनंदाला शेवट हा नसतो, तर धाग्याधाग्याने कला विचारांची शृंखला घडतच जाते, सतत आणि अशाच सातत्यपूर्ण अभिव्यक्तीला एकाच वेळी उंची आणि खोली प्राप्त होऊ शकते. आपल्या कलाकृतीतून एकाच वेळी उंची आणि खोली यांचे दर्शन घडविणारे केशव कासार नाशिकच्या कलाक्षेत्रातील एक नवा आदर्श ठरले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.