Nashik Kala Katta: नव्या पिढीची सृजनशील ‘माती कलाकार’ : स्नेहा पाटील

Artist Sneha Patil
Artist Sneha Patilesakal
Updated on

"पृथ्वीतलावरील युगानुयुगाची एकमेव साक्षीदार म्हणजे माती. या मातीच्या तीन अवस्था, निराकार, आकार आणि साकार. या तिन्ही अवस्थांचा एक विवक्षित प्रवास आपल्या अवतीभवती सतत सुरूच असतो. या अक्षय प्रवासातील नव्या पिढीची सृजनशील साक्षीदार म्हणजेच नाशिकची स्नेहा पाटील ही ‘माती कलाकार’. ‘सकाळ’ वाचकांशी संवाद साधताना ती म्हणते, कुठलीही कला हे त्या त्या कलाकाराच्या शैलीचे प्रतिबिंब असते. हे प्रतिबिंब शोधता, शोधता त्या कलेबरोबरच त्याचे व्यक्तिमत्त्वही घडत जाते. माती कलेच्या बाबतीत मला हे फार प्रकर्षाने जाणवते, कारण या कलेत संयमाचा खऱ्या अर्थाने कस लागतो. तुमच्यात संयम नसला तरी मातीकला तुम्हाला तो शिकवते आणि तुमची शैली हीच तुमच्या आत्मविश्वासाची ओळख बनू लागते. हजारो वर्षांपासून चालत आलेली अतिशय प्राचीन अशी ही कला आहे, पण त्यातील सृजनशीलता ही अजूनही बहरतेच आहे."- तृप्ती चावरे- तिजारे.

(Nashik Kala Katta new generation of creative Clay Artists Sneha Patil)

बालवयातच स्नेहाचे चिमुकले हात मनसोक्त माती खेळायचे, खेळता, खेळता तीच माती तोंडातही जायची. आपले हात काहीतरी घडवू शकतात याची पहिली चव, स्नेहाला मातीच्या त्या खेळताच समजली होती.

तिचे बाबा संजय पाटील सर म्हणजे नाशिकचे विख्यात आर्किटेक्ट व आई विजया पाटील हे दोघेही कला रसिकाग्रणी. त्यांचे अनेक दिग्गज कलाकारांशी मैत्रीपूर्ण संबंध असल्यामुळे स्नेहाच्या मनात उच्च दर्जाचे अभिरुची संपन्न कलासंस्कार घरातच आणि लहानपणापासूनच रुजत गेले.

या संस्कारातूनच, शिक्षणाच्या मार्गावरून चालता चालताच, माती कारागिरीची एक अनवट वाट तिच्या मनात रुजली. काही वर्षांपूर्वी हिमाचल प्रदेशातील प्रतिष्ठित ‘आंद्रेटा पॉटरी’ येथे तिला या कलेतील विशेष प्रशिक्षण मिळाले.

कुंभाराच्या चाकाची आणि मातीच्या स्पर्शसंवादाची भाषा तिला तिथे समजू लागली. मातीच्या कारागिरीपलिकडचे, कलाकारीचे एक नवे जग तिला खुणावू लागले. प्रयोगात्मक मनाची जडणघडण सुरू झाली.

पुढे पॉंडिचेरी येथील ऑराव्हीलच्या मंतरलेल्या वातावरणातील विशेष प्रशिक्षणाने तिला अधिक समृद्ध केले आणि मातीच्या कणाकणातील निराकार शिल्पांचा तिचा एक ध्यास प्रवास सुरू झाला.

महिरावणी गावाच्या शांत निसर्गकुशीत वसलेल्या ‘हाऊस ऑफ इकी’ या स्नेहाच्या स्वतःच्या पॉटरी स्टुडिओमध्ये एक अखंड सर्जनशील संवाद सुरू असतो. या ठिकाणी असलेले निसर्गाचे, विचारांचे आणि कलेचे सुसंवादी संतुलन, माती कामाच्या पृष्ठभागावरील सूक्ष्म सजावट, स्वच्छ रेषा, सारे काही निरीक्षणीय आहे.

Artist Sneha Patil
Nashik Kala Katta: सुरांशी अनोखा संवाद साधणारे संवादिनी वादक : ज्ञानेश्वर सोनवणे

त्यातून स्नेहाची कला हेच सांगत असते, की या जगात प्रत्येकावर कुणाचा ना कुणाचा प्रभाव आहे पण शैली ही त्यापलीकडे जाऊन विकसित करावी लागते. या क्षेत्रातील नवोदितांना संदेश देताना ती म्हणते, दर्जा, सातत्य, संस्कार, संयम, कठोर मेहनत आणि नशिबाची साथ असेल तर एकवेळ फळ मिळते सुद्धा.

पण, यश हे त्याहीपलीकडे असते, ते मिळतेच असेही नाही आणि यश मिळणे म्हणजेच कलेचे अंतिम उत्तरही असू शकत नाही. कलेबरोबरच साहित्य क्षेत्रात स्नेहाने मिळविलेले नैपुण्य कौतुकास्पद आहे.

सायकलवरून जग पालथे घालणारा अवलिया योगेश गुप्ता याच्या साहसकथांवर आधारित स्नेहाचे राजहंसने प्रकाशित केलेले ‘बीकमिंग योगी’ हे इंग्रजी पुस्तक म्हणजे, पुस्तकातील चरित्रनायकाचा अनुभव, लेखिकेने जिवंत केल्याचा एक उत्तम नमुना आहे.

मी तिच्या स्टुडिओला भेट दिली तेव्हा, ती मातीच्या एका वेगळ्या स्पर्शभाषेशी हितगूज करण्यात गुंग होती. एकीकडे मुलाखत देता देता, दुसरीकडे तिच्या हातातील माती आकार घेण्याची पूर्वतयारी करीत होती.

तिचं ते मातीशी समरस होऊन जाणं पाहताना मला असं वाटलं की, माणसाचं मातीशी खेळणं हा जर का एक उपयुक्ततावाद मानला तर, मातीचे माणसाशी खेळणं याला कलासौंदर्यवाद का म्हणू नये ? कारण उपयुक्तता ही ट्रेंड किंवा फॅशनमुळे जन्माला येत असेल, पण कलासौंदर्य तर एका नव्या शैलीला जन्म देत असतं हेही तितकंच खरं नाही का ? माझ्या मते

प्रत्येक वेळी नव्याने दिसणारी ही शैली म्हणजेच, निराकार, आकार आणि साकार यांचे बीज असावे आणि या तिन्हीही अवस्थांमधून ही माती माणसाला एकच अजब खेळ खेळवत असते. तो खेळ म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचा, कधीही न संपणारा खेळ

Artist Sneha Patil
Nashik Kala Katta : आलेख चित्राच्या किमयागार शर्वरी लथ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.