"‘रेषा’ म्हणजे केवळ लांबी-रुंदी मोजण्याचे परिमाण नव्हे, तसेच कोणत्याही भाषिक व्याख्येत बसणारा तो शब्दही नव्हे.. रेषा असते, अमर्यादाची मर्यादा, मानवी विचारांची व्यापक उंची आणि तत्वज्ञानाची गहन खोली. कला तत्त्वज्ञानाची ही खोली आपल्या रंगप्रतिभेतून सहजच आपलीशी करणाऱ्या, समृद्ध कला वाटेवरच्या नाशिकच्या एक प्रतिभावान कलाप्रवासी म्हणजे, प्रसिद्ध चित्रकार, शर्वरी रतन लथ. ‘सकाळ’ वाचकांशी संवाद साधताना त्या म्हणतात, चित्रकला साकारताना मी असा विचार करते की माझे हे चित्र सदैव कोणाच्या तरी डोळ्यासमोर राहणार आहे. ते केवळ माझे पेंटिंगच नसेल, तर ती प्रत्येकाच्या आतील धाग्याची आणि भावबंधांशी संवाद साधणारी एक अमर कलाकृती असेल. या कलेतील ध्येयापेक्षाही माझा त्यातील प्रवास हा मला महत्त्वाचा वाटतो. या प्रवासाची सुरवात, त्याचा प्रत्येक पल्ला, त्याचे आजचे वळण आणि उद्याचे अंतर, हे सतत माझ्या डोळ्यासमोर असते. या प्रत्येक पल्ल्यागणिक माझ्या मनातले अमूर्त चित्र अधिकाधिक प्रगल्भ होत असते."- तृप्ती चावरे-तिजारे
(Nashik Kala Katta Painter Who Enacts Energy Journey of Line Universe Sharvari Luth)
शर्वरीजींच्या चित्रकलेच्या या प्रगल्भ प्रवासाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची ‘आलेखचित्रे’. आर्किटेक्चरचे शिक्षण घेत असतानाच त्यांना एका वेगळ्या चित्रकलेचा धागा व ध्यास गवसला होता. या ध्यासातूनच हाताला गवसलेली ‘रेषा’ ही आता त्यांच्या या शैलीची चित्रसंहिता झाली आहे.
ही शैली म्हणजे तंत्र आणि कला यांचा सुंदर समन्वय, तसेच आर्किटेक्चर आणि चित्रकला यांचा एक आगळावेगळा संगम आहे. या दोन पूरक शैलीचे मिश्रण आपल्या प्रतिभेने साकारण्यात त्या सध्या गढून गेल्या आहेत.
जागतिक पातळीवर ठसा उमटविणाऱ्या फ्रावशी इंटरनॅशनल या शिक्षण संस्थेच्या किमयागार शर्वरी रतन लथ यांना रंग, रेषा आणि चित्रकलेची उपजतच देणगी होती. पण त्याही पलीकडे जाऊन एक समृद्ध चित्रकार अशी स्वतःची स्वतंत्र ओळख त्यांनी निर्माण केली.
आपल्या कला प्रवासाविषयी त्या म्हणतात, आर्किटेक्चर करीत असताना मी त्याकडे फक्त साचेबद्ध शिक्षण म्हणून कधीच बघितले नाही. त्यातील रेषा मला काहीतरी वेगळंच सांगू पाहत होत्या.
आमची पहिलीच बॅच असल्यामुळे आम्हाला सीनियर्स नव्हतेच. त्याऐवजी शिक्षणाचा भाग म्हणून मला आर्किटेक्ट संजय पाटील सर, नूर सर, काबरा सर, विजय पाटणकर सर, अशा दिग्गजांबरोबर व्यावसायिक वास्तुरचनेचे प्रात्यक्षिक शिकण्याची व ते थेट अनुभवण्याची संधी मिळाली.
या क्षेत्रातील माझे मार्गदर्शक आर्किटेक्ट भालचंद्र चावरे सर यांची विषय समजावून सांगण्याची हातोटी ही विचारमूलक होती. त्यामुळे रेषा आणि आलेख हा विचार, आर्किटेक्चरल सायन्सप्रमाणे कला आणि जीवनालाही लागू पडतो हे मला समजले.
याचदरम्यान नाशिकचे चित्रतपस्वी शिवाजीराव तुपे यांचे मार्गदर्शन आम्हा विद्यार्थ्यांना लाभले आणि माझी कलादृष्टीच आमूलाग्र बदलली. रेषा आणि आलेख यांची मैत्री अधिक घट्ट झाली आणि एक अनोखा कलासंवाद सुरू झाला.
आर्किटेक्चरच्या तंत्राकडून चित्रकलेत रमणारे माझं हे ट्रांझिशन शोधण्यासाठी मला खऱ्या अर्थाने मदत केली, ती माझे यजमान रतन लथ यांनी.
त्यांची प्रगल्भ, दर्जेदार आणि कलासक्त जाणीव मला आतून बळकट करीत होती. आव्हाने मोठी असली तरी त्यातूनही आत्मशोध कसा घ्यायचा हे मी त्यांच्याकडून शिकले.
ऍबट्रॅक्ट अर्थात, अमूर्त कलेत एक विशिष्ट प्रकारची संदिग्धता असते. रेषा आणि आलेखाच्या समन्वयाने या संदिग्धतेतही नेमकेपणा आणण्याचा शर्वरीजींचा प्रयत्न मला जगावेगळा वाटतो.
उद्योगपती रतन टाटा, अमिताभ बच्चन, राज ठाकरे, जावेद अख्तर, गुलजार, अमृता फडणवीस, अमिषा पटेल, अनु मलिक अशा अनेक दिग्गजांनी त्यांच्या कलेचे आजवर भरभरून कौतुक केले आहे.
शुभ्र कॅनव्हासवरील दोन बिंदू, त्यांना जोडणारी एक रेषा, मग दोन रेषा, त्यात दडलेले एक अर्थपूर्ण अंतराळ आणि त्या एका अंतराळापलीकडे नेणारी विविधतेने नटलेली भावपूर्ण रंगसंगती, अशा समृद्ध प्रतिभेचे अवतरण म्हणजे शर्वरीजींचा चित्रालेख. या
आलेखाच्या मुळाशी असते, लांबी, रुंदी, उंची आणि खोली असलेली एक आत्मविश्वासाची रेषा. या रेषेतून शर्वरीताईंना जे चित्र दिसते, ते जीवनाच्या आलेखाकडे संवेदनशीलपणे बघण्याचे रहस्य सांगत असते. त्यांच्या या रहस्याविषयी अधिक जाणून घेऊया पुढील भागात...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.