"चैतन्याचे वर्णन जेव्हा भाषेत व्यक्त करता येत नाही, तेव्हा ते चैतन्यही स्वतःला व्यक्त करण्यासाठी कोणते तरी माध्यम शोधतच असते. कला हे त्या निर्गुणाचे सगुण माध्यम असते आणि आनंद होणे ही सहज प्रतिक्रिया. अशोक ढिवरे सरांची चित्रकला बघताना आनंदाची हीच प्रतिक्रिया प्रत्ययास येतो. या आनंदावर बोलताना ते म्हणतात, मला जो आनंद झाला तोच दुसऱ्यालाही होणं यातच खरं माणसाचं माणूसपण आहे. कोणतीही कलानिर्मिती ही आतून येणाऱ्या आनंदासाठी हवी. आपण पलीकडून आनंदाची अपेक्षा करतो तेव्हा आपल्या स्वतःत तो आनंद आहे की नाही हे बघितले पाहिजे. निसर्गात जे जे चैतन्य आहे तेच तुमच्यातही आहे हे ओळखू आले तरच निसर्गाबरोबरचा खरा व्यवहार समजतो. मग सापदेखील तुम्हाला इजा करू शकत नाही. चैतन्य हे कधी विध्वंस करू शकत नाही, ते काही निर्माणही करत नाही, ते फक्त एक नैसर्गिक आणि शुद्ध प्रेरणा किंवा प्रेम म्हणून प्रत्येकासोबत सदैव असते इतकंच. पण तुम्ही त्यासोबत असता का, हा खरा प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर हे निरपेक्ष कला साधनेत आहे. माझी चित्रकला मला या उत्तरापर्यंत नेणारं साधन आहे."- तृप्ती चावरे-तिजारे.
(Nashik Kala Katta painter who indulges in solitary practice Ashok Dhivare nashik)
जलरंग हे ढिवरे सरांच्या चित्रकलेचे मुख्य आकर्षण. त्यांच्या जलरंग चित्रातून जीवनाचा प्रवाह प्रत्ययास येतो. ते आणि त्यांची चित्रभाषा इतके संवेदनशील आहेत, की विचार व्यक्त करण्यासाठी शब्द उच्चारणे हेदेखील काही वेळा नाकारले जाते.
जणू त्यांच्या रेषांची आणि रंगांची लिपी आपापसांत बोलत असते. कलेच्या प्रवाहातून जीवनाच्या प्रतिबिंबाचे दर्शन घेण्याच्या गहन पातळीपर्यंत अशोक सरांनी स्वतःचे विचार घडविले आहेत हे त्यांच्याशी बोलताना प्रकर्षाने जाणवते आणि म्हणून त्यांचे चित्र पाहताना मनात विचार येणे ही क्रियादेखील काही क्षण बंद पडते.
कोणत्याही कलेचे विसर्जन हे मौन या जीवनविषयक प्रगल्भ जाणीवेतच दडलेले असते हे तिथे अनुभवता येते. प्रापंचिक अंगाने कलाकाराचे व्यवहार उत्तम सुरू असावेत, मात्र त्यात मन गुंतून पडता कामा नये.
इतकेच नव्हे तर आपल्या कलेकडेही या साक्षीभावाने बघता आले पाहिजे. तुमचे मन, तुमची कल्पना हे प्रत्यक्ष काय करीत आहेत हे तुम्हाला तटस्थपणे बघता आले पाहिजे, असे सरांचे मत आहे. ते म्हणतात, आपण मनाच्या आहारी जातो पण ते बघू शकत नाही.
ते बघता आलं पाहिजे तरच आपण त्यात गुंतून पडत नाही. तुम्ही आहात आणि तुम्ही नाहीत या दोन्ही जाणीवा तुम्हाला कलेच्या साधनेतून प्रगल्भ करीत असतात, फक्त त्याचा संदर्भ समजला पाहिजे.
निसर्गाच्या सानिध्यात मी ज्या ज्या चित्रकृती साकारतो, त्या मला निसर्गालाच द्याव्याशा वाटतात. ज्याला त्या निसर्गातला आनंद वेचावासा वाटतो त्याला मी त्या कलाकृती तिथल्या तिथे देऊन टाकतो. घरीदेखील आणत नाही.
कारण मला हे समजते की या जगात माझे काही नाहीच. ‘खाली हाथ आया है खाली हाथ जायेगा’, इतकं सोपं आहे. कलेवर प्रेम असेल तर कलाकृतीवर अधिकार कसला आणि कोणाचा, पण त्यासाठी खरं प्रेम समजलं पाहिजे.
स्वतःलाही विसरून करावं लागतं, ते खरं प्रेम. माणूस म्हणून ते तुमचं वरदान आहे, जबाबदारीही आहे. कलासाधनेत स्वतःला झोकून देणारे ढिवरे सर हे एकांत साधनेत रमणारे कलाकार आहेत.
कारण मानवाला ईश्वराने विचारांची जी ताकद दिलेली आहे ती शाबूत ठेवायची असेल तर त्यासाठी एकांत हवा या भूमिकेतून ते कला आणि जीवनाकडेही बघतात. ढिवरे सरांची चित्रकला ही जीवनाचा अर्थ उलगडून सांगणारा एक संवेदनशील अनुभवप्रवाह आहे.
त्यांच्या चित्रातूनही एक अनाहत संवाद ऐकू येतो आणि तो एकच सांगत असतो की, मी कोणीच नाही, मी काहीच करत नाही, करणारा कोणीतरी वेगळाच आहे. म्हणून त्यांच्या चित्रकलेविषयी आणि जीवनाविषयी एकच म्हणावेसे वाटते, अवघा रंग एक झाला...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.