Nashik Kala Katta: सुरांशी अनोखा संवाद साधणारे संवादिनी वादक : ज्ञानेश्वर सोनवणे

Saransh Sonavane
Saransh Sonavaneesakal
Updated on

"संगीत क्षेत्रातील मैफलीचे सौंदर्य हे कलाकार आणि साथीदार यांच्या एकरूपतेने खुलत असते. सादरीकरणातील साथसंगत म्हणजेच संपूर्ण मैफलीशी एकरूप संवाद, हे मर्म फार कमी साथीदारांना उमगते. हे मर्म जाणणारे, अनुभवणारे आणि हजारो मैफलीतून सादर करणारे नाशिकचे प्रथितयश संवादिनी वादक म्हणजेच ज्ञानेश्वर सोनवणे. स्वतंत्र एकल संवादिनीवादनाबरोबरच व्यावसायिक रेकॉर्डिंगस्, ख्याल, ठुमरी- दादरा, गझल, नगमा, भक्तिसंगीत आणि लोकसंगीत अशा संगीतातील विविध शैलींमधून प्रसिद्ध संगीतकारांबरोबर सादरीकरण करणारे ज्ञानेश्वरजी ‘सकाळ’ वाचकांशी संवाद साधताना म्हणतात, की संवादिनीची साथसंगत म्हणजे आपले अस्तित्व विसरून, ज्याची आपण संगत करीत आहात, त्याच्या परिघात जाऊन एक होणे. ‘संगत’ ही ‘विसंगत’ होता कामा नये. शरण भावाने समोर फुलत असलेल्या कलेच्या शैलीशी एकरूप होणे, हा साथसंगतकाराचा धर्म आहे. आजच्या काळात संवादिनी आणि तिच्या साथसंगतीचा वाव, अर्थात स्कोप विस्तारला आहे. मुख्य कलाकाराशी संगतीतून संवाद साधण्याची स्पेसही वाढली आहे; परंतु ही स्पेस वेगळं काहीतरी दाखविण्यासाठी नसून, परिघात राहून त्या-त्या कलाकाराच्या शैलीचे विचारसौंदर्य खुलविण्यासाठी असते. अर्थात, हे सगळे मला माझ्या गुरुजनांनी शिकविले."- तृप्ती चावरे-तिजारे

(Nashik Kala Katta Samvadini player who interacts uniquely with the tunes Dnyaneshwar Sonawane)

बालपणापासूनच स्वर-तालाच्या जगाचे प्रचंड आकर्षण असलेल्या ज्ञानेश्वरजींमधील सुरेल कान नाशिकचे प्रसिद्ध हार्मोनिअम वादक बापू कुलकर्णी यांनी हेरला. कुलकर्णी यांच्याकडून सुमारे आठ वर्षे हार्मोनियमचे प्रशिक्षण घेत, ज्ञानेश्‍वर यांनी मूलभूत वादनाचे तंत्र आणि रचनांचे ज्ञान मिळविले.

ज्ञानेश्वरजींची संगीत शिकण्यातली प्रामाणिकता, निष्ठा आणि वाद्याबद्दलची आस्था कुलकर्णी यांनी ओळखली आणि अतिशय उदार मनाने त्यांना मुंबईचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हार्मोनिअम वादक सुधीर नायक यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत शिक्षणात पुढे जाण्यास सुचविले.

इथेच सुरू झाला, एका यशस्वी संवादिनी वादकाचा प्रवास. प्रसिद्ध संवादिनी गुरू सुधीर नायक यांच्या मार्गदर्शनाखाली, हिंदुस्थानी रागसंगीताच्या बारीकसारीक गोष्टींमध्ये ज्ञानेश्वरजी पारंगत तर झालेच; पण त्याचबरोबर विविधांगी साथसंगत आणि एकल वादन हे दोन्हीही पैलू त्यांना गवसू लागले.

विविध स्पर्धांमध्ये प्रशंसा आणि पुरस्कार मिळविल्यावर, ज्ञानेश्वरजींनी भारतात आणि भारताबाहेर विविध मैफली, कार्यशाळा आणि महोत्सव गाजवायला सुरवात केली. नुकताच त्यांनी अमेरिका दौराही केला आहे.

आजवर त्यांनी संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गजांना साथसंगत केलेली आहे. त्यापैकी काही मानाची नावे पुढीलप्रमाणे ः पं. गिरिजा देवी, पं. मुकुल शिवपुत्र, पं. उल्हास कशाळकर, अश्विनी भिडे-देशपांडे, शुभा मुदगल, ओंकार गुलवडी, अनीश प्रधान, मंजिरी असणारे-केळकर, जयतीर्थ मेवुंडी, देवकी पंडित, परवीन सुलताना, रघुनंदन पणशीकर, पं. शौनक अभिषेकी, कृष्णा हेगडे. सध्या वांद्रे येथील शारदा संगीत विद्यालयात विद्यार्थ्यांना ते संवादिनी वादनाचे धडे देतात.

Saransh Sonavane
Nashik Kala Katta: ध्वनि तंत्रज्ञानाचा कानमंत्र गवसलेले तरल तंत्रज्ञ : शुभम जोशी

आपल्या वादनशैलीबद्दल बोलताना ते म्हणतात, की इतक्या विविध कलाकारांना साथसंगत करताना मला अनुभवातून हे समजले, की प्रत्येकाची शैली हा एक मनोवेधक नाट्याविष्कार असतो. त्यातील नाट्य समजले तर ती शैलीही आत्मसात होते.

या शैलीतच हार्मोनियमचे भारतीयत्व सिद्ध होते, अन्यथा ते मुळात युरोपियन वाद्य आहे. भारतीय मैफलीत ते स्वीकारले गेले याचे एक मुख्य कारण म्हणजे संवादिनीतील आमच्या पी. मधुकर घराण्याने निर्माण केलेली गायकी अंगाची शैली.

ही शैली मला माझे गुरुजी पं. सुधीर नायक यांच्याकडून, तर त्यांना पद्मश्री तुळशीदास बोरकर यांच्याकडून मिळाली. बसण्याची पद्धत, भात्यातील हवेचे प्रेशर, संवादिनीच्या पट्टीवर बोटांचा दाब याचा बारीकसारीक विचार मला गुरुजींकडून शिकायला मिळाला.

जवळपास प्रत्येक घराण्यातील कलाकारांना साथसंगत करणारे ज्ञानेश्वरजी त्यांच्या अत्यंत नम्र स्वभावामुळे सध्या मुंबईतील गायकांचे आवडते साथीदार म्हणून प्रसिद्ध आहेत. तसेच, आजवर त्यांनी अनेक मोठ्या तबलजींबरोबर एकल तबलावादनासाठी नगमा साथसंगत करून वातावरण निर्मितीचे कसब आणि लयीवरचे प्रभुत्वही सिद्ध केले आहे.

वाद्य आणि वादकांना प्रतिष्ठा मिळायची असेल तर आपले त्या वाद्यावर तितकेच प्रेम हवे, हा संदेश देत नाशिकची सांगीतिक ओळख महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचविणारे ज्ञानेश्‍वरजी संगीत शिकू पाहणाऱ्या तरुण पिढीसाठी एक आदर्श आणि प्रेरणादायी कलाकार आहेत.

Saransh Sonavane
Nashik Kala Katta: तालासुरांशी समरस होणारे छायाचित्रकार : महारुद्र आष्टुरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.