Nashik Kala Katta | कलाविश्व साकारणाऱ्या शिल्पतपस्विनी : अरुणा गर्गे

मराठमोळ्या स्मरणशिल्पांना मिळाली जागतिक कीर्ती
Aruna Garge
Aruna Gargeesakal
Updated on

"शिल्प आणि शिल्पकार हा भेदही जिथे उरत नाही अशी श्रेष्ठ कलानिर्मिती ही समाधीच्या आनंदापेक्षा वेगळी नसते. आपल्या जादुई बोटातून हजारो शिल्पांचे कलाविश्व साकारणाऱ्या शिल्पतपस्विनी अरुणा गर्गे अशाच आनंदाच्या निर्मात्या. ‘सकाळ’ च्या वाचकांची संवाद साधताना त्या म्हणतात, आचार्य विनोबा भावेंनी ‘गीताई’ मधून स्वधर्माचे फार सुंदर वर्णन केले आहे. त्यानुसार, शिल्पातून साकार होणारी कला हाच मला माझा स्वधर्म वाटतो. या स्वधर्माचे आचरण करीत अजूनही साधना सुरूच आहे. माझ्या हातून घडलेल्या शिल्पकृती या ‘कालकूपी’ प्रमाणे अनेक वर्षे, थोर व्यक्तींची, त्यांनी रचलेल्या इतिहासाची आणि घटनांची साक्ष देत राहतील, हे समाधान हीच माझी ऊर्जा आहे."- तृप्ती चावरे- तिजारे.

(Nashik Kala Katta Sculptor ascetic who created art world Aruna Garge nashik news)


एखाद्या व्यक्तीचे किंवा घटनेचे चरित्र, शब्दांशिवाय जिवंत करणारे दृश्य माध्यम म्हणजे शिल्प. शिल्पकलेतील तपश्चर्येने भक्ती आणि शक्ती हे शिल्प अजरामर करणारे थोर शिल्पकार (स्व.) मदन गर्गे आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून अनेक स्मरणशिल्पे साकारणाऱ्या त्यांच्या सहचारिणी अरुणाताई गर्गे यांनी शिल्पकलेला एक नवा सौंदर्यबिंदू बहाल केला आहे. अरुणाताई या सेवाग्राम शिक्षण संस्थेतून संस्कारित झालेल्या मूळच्या उत्तम चित्रकार.

विवाहाच्या सप्तपदीबरोबरच चित्रकलेचा त्यांचा कलाप्रवास मदनजींच्या शिल्पकलेच्या हातात हात देत, एका वेगळ्या कलाविश्वाच्या दिशेने सुरू झाला. मनातले चित्र हे कॅनव्हास, रंगछटा आणि पेन्सिल यांच्याशिवाय, मातीच्या गोळ्यातून साकारण्याचे नवे विश्व त्यांनी कल्पना विस्ताराची संधी ओळखून स्वीकारले.

शिल्पकलेतील सौंदर्य, अंश, कोन, प्रमाणबद्धता आणि समग्रतेशी त्यांचे नाते जुळू लागले. तीनशे साठ अशांचा परीघ आणि भावना जिवंत करण्याचे आव्हान असलेल्या या निर्मिती यज्ञात शिल्पकार गर्गे दांपत्याच्या साधनेच्या आहुत्या अहोरात्र पडू लागल्या. नाशिकची नवी शिल्पओळख जगभरात सर्वदूर पोचू लागली.

Aruna Garge
Kala Katta : मोबाईलच्या मायावी कैदेतून पडा बाहेर; पॉटरी कलेच्या प्रसारासाठी सोनाली पाटील यांचे समर्पण

शिल्पकलेतील निर्मितीच्या सगळ्या अवस्था अरुणाताईंनी अभ्यास आणि अथक परिश्रमाने आत्मसात केल्या. मूर्तीतील प्रत्येक बारकाव्याचा एक स्वतंत्र कॅरॅक्टर म्हणून सूक्ष्म अभ्यास केला. प्रत्येक चेहऱ्यावरचे भाव जिवंत करण्याचा ध्यास जागता ठेवला.

व्यक्तिरेखा, तिची स्वभाव वैशिष्ट्ये, तिच्या भोवतालच्या घटना आणि त्या संदर्भातील इतिहासाचा सखोल अभ्यास करूनच त्यांनी प्रत्येक शिल्पकल्पना रेखाटली. निर्मिती प्रक्रियेविषयी बोलताना त्या म्हणतात, काम सुरू करण्याआधी तुमची कल्पना सुस्पष्ट असली पाहिजे, आधी डोके चालले पाहिजे मग हात आपोआप चालतो.

चौकाचौकांतून दिसणाऱ्या थोर व्यक्तींच्या दयनीय पुतळ्यांच्या रांगेत आपले शिल्प बसवायचे नाही, हे पक्के होते म्हणूनच गर्गे स्टुडिओतून ‘स्मरणशिल्प’ ही अनोखी कल्पना जन्माला आली. शिल्पाकडे पाहून त्या घटनेचे स्मरण जिवंत व्हावे, आणि तेही शब्दांशिवाय, अर्थाशिवाय' ... अशा स्वप्नवत कलानिर्मितीचा ध्यास म्हणजे शिवधनुष्यच होते, परंतु अरुणाताईंची जाणीव आणि मदनजींचा आत्मविश्वास या दोन खांद्यांनी हे शिवधनुष्य पेलले.

तळपत्या तलवारीचे विजेशी नाते सांगणारा महायोद्धा शिवाजी, शौर्यबिंदू अश्वारूढ शिवाजी महाराज, शेतकऱ्यांचा राजा शिवछत्रपती, आकाशाएवढा तुका, विरक्तमूर्ती स्वामी विवेकानंद, घटना शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य महात्मा फुले, सहकार महर्षी अण्णा कोरे, अशा कितीतरी शिल्पातून चरित्रगायन ऐकायला मिळू लागले.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

Aruna Garge
Nashik Kala Katta | कलाकारांचा कलेशी व वाचकांशी विचारसंवाद; कलात्मक तबला रुजविणारे नादसाधक : नितीन वारे

ठराविक कल्पनेला छेद

शिल्पकलेची नेत्रदीपक भव्यता आणि त्यातील सौंदर्यदृष्टी सर्वसामान्यांच्या नजरेत भरावी यासाठी व्यवसायापलीकडचे समाजाचे देणे म्हणून त्यांनी या कलेकडे पाहिले. शिल्पकलेचा हा अनोखा वारसा नवीन पिढीच्या हातात देताना आपले पुत्र श्रेयस गर्गे यांच्या कल्पना विश्वाला त्यांनी सौंदर्य संस्कारांचा आकार दिला.

शिल्पकार श्रेयसजींच्या कलेचा आस्वाद घेणे हा स्वतंत्र लेखाचा विषय ठरेल. ‘स्थिरत्व’ या पुतळ्याच्या ठराविक कल्पनेला छेद देत, लय ही शिल्पाची गतिमान कल्पना नाशिकच्या गर्गे कुटुंबाने साकारली, सांभाळली आणि मोठी केली. अचल शिल्पाच्या त्यांच्या लयीतून निघणारी तालबद्ध आवर्तने इतिहासाच्या पानातून नवीन पिढीला दीर्घ काळापर्यंत ऐकू येतील.

Aruna Garge
Nashik Kala Katta | कलेची उपासना म्हणजे ध्यानमग्नेतील योगसाधनाच : वेणूनादाचे उपासक मोहन उपासनी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.