Nashik Kala Katta : कला उपचारातून आशेचा सूर्योदय दाखविणाऱ्या समुपदेशिका : सोनाली जोशी

Sonali Joshi
Sonali Joshiesakal
Updated on

"आरोग्य हा मानवी देहाचा, तर आत्मविश्वास हा मानवी मनाचा स्थायीभाव. पण आयुष्याच्या अंगणात आजार नावाचा पाहुणा जेव्हा अनाहूतपणे दाखल होतो तेव्हा तनामनाचे हे दोन्ही स्थायीभाव अक्षरश गळून पडतात. या पाहुण्यांचे वैशिष्ट्य असे की, हाकलून लावायचे म्हटले तरी त्याचे आधी स्वागतच करावे लागते.

कोणत्याही दुर्धर आजाराचे स्वागत हे हसऱ्या आत्मविश्वासाच्या पाहुणचाराने कसे करावे याचा वस्तुपाठ, स्वतःच्या अनुभवातून सिद्ध करून दाखविणाऱ्या नाशिकच्या आरोग्यदूत म्हणजेच, कला उपचार पद्धतीतून समुपदेशनाची किमया गवसलेल्या, लाइफ कोच, सोनाली जोशी.

त्यांनी विकसित केलेल्या ‘आर्ट थेरपी’ या पूरक उपचार पद्धतीबद्दल ‘सकाळ’ वाचकांशी संवाद साधताना त्या म्हणतात, एकवेळ माणूस माणसाची साथ सोडू शकतो पण कला ही माणसाची साथ कधीही सोडत नसते, कारण ती आपल्या स्वतःच्याच व्यक्तिमत्त्वाचा एक अविभाज्य भाग असते.

आयुष्यात पहाडाएवढ्या दुःखातही ज्या कलेने मला स्वतःला तारले, त्याच कलेचे बोट धरून आज मी अनेकांची आयुष्ये आत्मविश्वासाने फुलविण्यासाठी सज्ज झाले आहे. ज्या हातातून संवेदनशील मनाची कला साकारते तेच हात देवदूत बनवून आव्हानांचे शिवधनुष्य पेलण्यासाठी सिद्ध करण्यात मला जे समाधान मिळते, ती या कलेचीच कृपा."- तृप्ती चावरे- तिजारे

सुखदुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू. मानवाने आयुष्यात येणाऱ्या सुखदु:खांचा फक्त विचारच केला तर तर त्याचे मन त्याच विचारात खोल गुंतत आणि रुतत जाते, पण सुखदुखाचा विवेक करायचा असेल तर मात्र, या गुंत्यातून मन बाहेर काढावेच लागते.

त्यासाठी सगळ्यात आधी मनाचे खोल खोल गुंतत जाणे थांबवावे लागते. नको तिथे गुंतत जाणारे असे मन जर हव्या त्या कलेत रममाण केले तर त्याच मनात स्वसंवादाची कारंजी नाचू लागतात आणि आत्मविश्वासाची मशालही पेटते हा अनुभव सोनालीजींनी आधी स्वतःच्याच बाबतीत घेतला आणि त्यातूनच सुरू झाला एक नवा अध्याय.

कला उपचार पद्धतीचा, अर्थात ‘आर्ट थेरपी’ चा. २०१४ ला स्वतःमध्ये असलेल्या चित्रकलेच्या आधाराने, घशाच्या कॅन्सरशी लढा देण्याचा त्यांचा अद्वितीय, वेगवान, साहसी आणि अतुलनीय संघर्ष पाहून प्रसिद्ध कॅन्सरतज्ज्ञ डॉ. राज नगरकर प्रभावित झाले व त्यांनी ही उपचार पद्धती विकसित करण्यास सोनालीजींना प्रोत्साहित केले.

कलाकारांत दडलेली कला हाच त्याच्या मनोबलावरचा उपचार आहे हे रहस्य सोनालीजींनी सिद्ध करून दाखविले आणि त्यांच्या कला उपचार पद्धतीचे इवलेसे रोप बहरू लागले, वाढू लागले. बघता, बघता त्यांच्या आर्ट थेरपीतून रुग्णसेवेचा एक वृक्ष उभा राहिला.

ज्याच्या सावलीखाली हजारो रुग्णांनी आत्मविश्वासाची सावली अनुभवली. भावभावना व्यक्त करण्याचे सगळ्यात सोपे साधन म्हणजे कला. प्रत्येकाच्या आतमधे कोणती ना कोणती कला दडलेली असते.

कलेतून होणारी स्वसंवादी भावाभिव्यक्ती अर्थात ‘सेल्फ टॉक’ आणि मानसशास्त्रातील विवेकपूर्ण समुपदेशन या दोन्ही प्रवाहातील मर्मस्थळांच्या परस्पर समन्वयातून सोनालीजींनी ही अद्भुत आर्ट थेरपी विकसित केली आहे.

Sonali Joshi
Nashik Kala Katta: नव्या पिढीची सृजनशील ‘माती कलाकार’ : स्नेहा पाटील

यात चित्रकला, रंगकला आणि हस्तकौशल्यांवर आधारित दृश्य कलांवर मनाचे तादात्म्य घडवून आणले जाते. कलाप्रयोग करता करताच दुसरीकडे, अचेतन मनावर मानसशास्त्रीय सिद्धांतानुसार स्वीकारभाव बिंबविला जातो.

जाणतेपणे सुरू असलेले हे कलाप्रयोग नकळतपणे मनात सुरू असलेली विचारांची चक्रीवादळे तर शमवितातच पण जगण्याची एक नवी उमेद आणि प्रेरणाही जागी करतात.

सोनालीजींकडून ही थेरपी जाणून घेताना मला प्रकर्षाने असे जाणवले की एकाग्रता, भयगंड, क्रोधातिरेक, चिडचिडा स्वभाव आणि वर्तनविषयक समस्या असलेल्या कोणत्याही वयोगटाच्या व्यक्तीसाठी ही कला उपचार पद्धती अत्यंत उपयुक्त आहे. कला साधनेत जो नित्यनूतन आनंद पाझरतो त्या आनंदात कोमेजलेल्या मनाचे दुःख विरघळून टाकण्याचे अनोखे

सामर्थ्य असते. हा अनुभव सोनालीजी स्वतः जगल्या आहेत. दुर्धर आजाराची वार्ता समजताच मनाचा आत्मविश्वास घालवून बसणाऱ्या अनेक रुग्णांच्या मनात त्यांच्या कला उपचारानंतर संघर्षाची मशाल पेटते आणि त्या प्रकाशातच या रुग्णांना गवसत असतो.

आशा हा नवा शब्द आणि त्यात दडलेला जीवनाचा खरा अर्थ. या अर्थाकडे, एका कृतार्थ समाधानातून बघत सोनालीजी मनात सहजच म्हणत असतील, शेवटी आशेचा सूर्योदय हाच निराशेचा सूर्यास्त खोटा ठरवीत असतो हेच खरे

Sonali Joshi
Nashik Kala Katta: पारंपारिक प्रघाताला छेद देणारी संबळ वादक : मोहिनी भुसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.