Nashik News : जलसंपदा विभागाकडून सूचना येऊनही गंगापूर धरण समूहातील काश्यपी धरणातील पाणी दुष्काळाच्या भीतीने व स्थानिक शेतकऱ्यांनी अडवून ठेवल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाची जलपातळी (वॉटर लेव्हल) झपाट्याने खालावली आहे. त्यामुळे कुठल्याही क्षणी शहरात पाण्यासंदर्भात रेड ॲलर्ट घोषित होण्याची शक्यता आहे.
स्थानिक शेतकऱ्यांच्या या कृत्यामुळे जलसंपदा विभागाकडून पोलिस बंदोबस्तात पाणी सोडण्याची तयारी सुरु झाली आहे. परंतु विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण देत पोलिसांकडूनदेखील चालढकल केली जात आहे. मेंढीगिरी समितीच्या अहवालानुसार गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने मराठवाड्यासाठी ८.६ टीएमसी पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या.
परंतु स्थानिक लोकप्रतिनिधींनी न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर जवळपास दीड टीएमसी पाण्याची बचत झाली. असली तरी त्यापूर्वी जायकवाडीसाठी पाणी सोडले गेले. त्यामुळे नाशिक महापालिकेच्या आरक्षणात कपात झाली. पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन महापालिकेने ६१०० दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी नोंदविली. परंतु धरणांतील उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता आरक्षणात कपात केली.
नाशिकसाठी ५३१४ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आले. शहराला दररोज २० दशलक्ष घनफूट पाणीपुरवठा होतो. सद्यःस्थितीत उपलब्ध पाण्याचा विचार करता ३१ जुलैपर्यंत पाणी पुरवावे लागणार आहे. परंतु रोजचा पाणी वापर लक्षात घेता अठरा दिवसांच्या पाण्याचा शॉर्टफॉल आहे. जून महिन्यात चांगल्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्याने पाणीपुरवठा विभागाचे डोळे आकाशाकडे लागले. (latest marathi news)
परंतु जून महिना कोरडा जात असल्याचे दिसून येत असल्याने पाण्याच्या थेंब अन् थेंबाचा हिशोबाला सुरवात झाली. संभावित नैसर्गिक संकटाचा सामना करण्याची तयारी सुरू असतानाच काश्यपी धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या काहींनी धरणातून पाणी सोडण्यास मज्जाव केला आहे. परिणामी गंगापूर धरणाची जलपातळीत वाढ न होता रोजच्या वापरामुळे अधिक खालावत असल्याने शहरात ऐन पावसाळ्यात भीषण पाणी टंचाईची भीती निर्माण झाली आहे.
काश्यपीतून पाणी सोडण्यास विरोध
नाशिक महापालिकेसाठी गंगापूर धरणातून पाणी उपसले जात असले तरी पाण्याचे आरक्षण समूह म्हणून ठेवले जाते. समूहात गंगापूरसह काश्यपी व गौतमी धरणांचा समावेश होतो. यातील काश्यपी धरणातून गंगापूर धरणात पाणी सोडण्यास विरोध केला जात आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तत्काळ पोलिस बंदोबस्त मागविला आहे.
जलपातळीत घट
गंगापूर धरणाच्या वरच्या बाजूला काश्यपी व गौतमी धरणे आहेत. टप्प्याटप्प्याने गंगापूर धरणात वरच्या धरणांतून पाणी सोडले जाते. वरच्या धरणातून पाणी सोडल्यानंतर गंगापूर धरणात येते. त्यामुळे पाण्याची पातळी उच्चतम असते. सध्या गंगापूर धरणात जलपातळी सध्या ६०० मीटरपर्यंत आहे. धरणात ६१२.३ मीटरपर्यंत पाणी ठेवावे लागते.
६०० ते ५९९ पर्यंत जलपातळी घटल्यास पाणी कपात अटळ मानली जाते. त्यामुळे गंगापूरची जलपातळी वाढण्यासाठी काश्यपी मधून पाणी सोडणे आवश्यक आहे. काश्यपीतून पाणी सोडल्यास जलपातळी वाढेल व पाणी लिफ्ट करण्याची आवश्यकता भासणार नाही. पावसाने ओढ दिल्याने काही लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यातून काश्यपीतून पाणी सोडण्यास नकार देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
गंगापूर धरण समूहातील पाणी परिस्थिती (दशलक्ष घनफुटात)
धरण उपलब्ध पाणीसाठा टक्केवारी
गंगापूर ९६१ १७
काश्यपी ४१९ २२
गौतमी १९० १०
---------------------------------------------------------
एकूण १५७० १६ (सरासरी)
"काश्यपी धरणातून आता कुठलेच आवर्तने नाही. पुढील महिन्यात दमदार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे काश्यपीचे पाणी अडविण्यात अर्थ नाही. शहराची लोकसंख्या अधिक असल्याने प्राप्त परिस्थितीत पाण्याची नितांत आवश्यकता आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे. अन्यथा विधी मंडळात प्रश्न उपस्थित करू." - ॲड. राहुल ढिकले, आमदार.
"स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध आहे. परंतु असे असले तरी धरणातून पाणी सोडावे लागणार आहे. पोलिस बंदोबस्तात सोमवार पासून ५०० क्यूसेस वेगाने पाणी सोडले जाणार आहे." - सोनाली शहाणे, अधिक्षक अभियंता, जलसंपदा विभाग.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.