भाषा संवाद : श्वास अन आवाजनिर्मिती, एक शारीरिक क्रियायोग

Marathi Article : आपली मातृभाषा प्रभावीपणे व्यक्त करण्यासाठी आवाज कसा वापरावा, याबाबत मात्र संस्था पातळीवर आणि व्यक्ती पातळीवर अधिक व्यापक प्रयत्न होणे गरजेचे आहे.
Language Communication
Language Communicationesakal
Updated on

लेखक : तृप्ती चावरे- तिजारे

शाळा आणि महाविद्यालयांमधून भाषा उच्चाराच्या संतुलनात स्वर आणि व्यंजनांच्या उच्चारस्थानांचा वरवरचा अभ्यास करवून घेतला जातो. पण त्या उच्चार स्थानांचा बोलण्यात काय प्रभाव पडतो, हे ज्ञान शेवटी अनुभवजन्य आहे.

हा अनुभव विद्यार्थ्यांना द्यायचा असेल तर सर्वप्रथम शिक्षकांनी उच्चारांकडे लक्ष दिले पाहिजे. मराठी भाषेतील उच्चार कसे घडवावेत, आपली मातृभाषा प्रभावीपणे व्यक्त करण्यासाठी आवाज कसा वापरावा, याबाबत मात्र संस्था पातळीवर आणि व्यक्ती पातळीवर अधिक व्यापक प्रयत्न होणे गरजेचे आहे. (nashik latest article by trupti tijare Language Communication marathi news)

आपले बोलणे ‘श्रवणीय’ असावे आणि दुसऱ्याने ते आनंदाने ऐकावे, असे ज्याला वाटते त्याने ‘स्वतःच्या आवाजावर आणि उच्चारांवर स्वेच्छेने, ध्यासाने आणि आनंदाने काम केले पाहिजे. आपल्या आजूबाजूच्या नीटनेटके आणि सुंदर राहणाऱ्या काही व्यक्ती, केवळ त्यांच्या चांगल्या राहणीमानामुळे लोकांचे लक्ष स्वतःकडे आपोआप वेधून घेत असतात.

त्यासाठी त्यांना वेगळे असे काही करावे लागत नाही. अगदी याचप्रमाणे नीटनेटके आणि सुंदर बोलणाऱ्या व्यक्तींच्या बोलण्याकडेही आपोआप लक्ष जाते. किंबहुना ते सुंदर, लयदार आणि बाकदार बोलणे ऐकण्यासाठी लोक आतुर असतात. आपल्यालाही असेच सुंदर बोलता यावे म्हणून आपण आवाज आणि उच्चारांचे संतुलन घडविणारा एक त्रिकोण आपल्या डोळ्यांसमोर ठेवला आहे. तो पुन्हा एकदा एका वेगळ्या पद्धतीने सोडवून बघू या.

या त्रिकोणाचा पाया म्हणजे उच्चारनिर्मितीसाठी वापरावे लागणारे शरीर. हे शरीर म्हणजे, बाहेरून दिसणारा जबडा, आणि जबड्याच्या आतमध्ये असणारी तोंडातील ‘न दिसणारी’ पण उच्चारांमध्ये सहभागी होणारी शरीरयंत्रणा. उच्चारांच्या विशिष्ट व्यायामाद्वारे या शरीरयंत्रणेवर काम करावे लागते. बोलत असताना, पुरेसा जबडा उघडणे या क्रियेला फार महत्त्व आहे.

नाशिकच्या ‘अंतर्नाद’ या भाषाविकास उपक्रमाने यासाठी काही सराव विकसित केले आहेत, जे भाषा साधकांना शिकविले जातात. या सरावातून जबडा पुरेशा प्रमाणात उघडल्यामुळे उच्चारांत स्पष्टता येते. त्यानंतर जबड्याच्या आतील भागाची ओळख करून दिली जाते. दंतव्य, तालव्य, ओष्ट्य, मूर्धन्य इत्यादी गटातील वर्णोच्चाराचा विचार करून त्यांच्या उच्चारस्थानांना बळकट करणारे विशिष्ट शारीरिक सराव करवून घेतले जातात. (Latest Marathi News)

भाषा संतुलन त्रिकोण
भाषा संतुलन त्रिकोणesakal
Language Communication
ताडोबाची राणी ‘माया’

सुयोग्य आवाजनिर्मिती आणि उच्चारांचा सराव करीत असताना श्वासाचा वापर कसा करावा, हे शिकणे फार आवश्यक आहे. कारण आवाज आणि उच्चारांवर जशी भाषेची स्पष्टता अवलंबून असते, त्याचप्रमाणे श्वासावर वाक्याची लांबी, भाषेचा प्रभाव आणि प्रवाह अवलंबून असतो.

भाषेच्या संतुलनात ‘श्वास’ सांभाळणे ही बाजू फार महत्त्वाची आहे. एखाद्या वाक्याचा उच्चार करीत असताना उच्चारक्रियेला सुरवात करण्याआधी श्वास घेणे या क्रियेला फार महत्त्व आहे. कोणतीही आवाजनिर्मिती ही श्वास घेतल्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही.

वाक्य उच्चारण्यापूर्वी ते किती लांबीचे आहे आणि त्यासाठी किती श्वास घेतला पाहिजे आणि किती प्रमाणात तो आवाजातून सोडला पाहिजे, हे मनाशी ठरवून जर श्वास घेण्याची सवय लावून घेतली तर कोणत्याही वक्त्याला लांब पल्ल्याची वाक्ये बोलूनही थकवा तर येणारच नाही, उलट त्या वाक्याची परिणामकारकता मात्र नक्कीच वाढेल.

ज्याप्रमाणे गाडीत किती पेट्रोल आहे, यावर ती गाडी किती अंतर पार करणार आहे हे ठरत असते त्याचप्रमाणे श्वास घेण्याचा, वाक्याच्या लांबीशी व उच्चारांच्या प्रभावाशी थेट संबंध आहे. आवाजनिर्मिती म्हणजे घेतलेल्या श्वासाचे आवाजात रूपांतर. गात असताना किंवा बोलत असताना श्वास घेणे ही एक कला आहे. सरावातून ती समजते. उच्चार साधना वर्गांमधून शरीराला योग्य तितका श्वास घेण्याची सवय लावली जाते. किंबहुना यासाठीचे सराव हे श्वास घेण्यात सहजता यावी, या दृष्टीनेच विकसित केलेले असतात.

आवाजनिर्मितीसाठी मुखविविर, नासिकाविवर, जबडा, जीभ आदी शारीरिक अवयव, जबड्याच्या आतमधील विविध पोकळ्या, हे जसे महत्वाचे आहेत त्याचप्रमाणे या अवयवांना संजीवनी देणारा ‘पुरेसा श्वास’ हादेखील तितकाच महत्त्वाचा आहे. नको तिथे श्वास संपल्यामुळे वाक्य उच्चाराचा प्रभाव ओसरतो आणि अर्थाचा अनर्थ होण्याचाही धोका असतो.

त्यामुळे वाक्य उच्चारण्यापूर्वी पुरेसे तोंड उघडणे आणि उघडलेल्या तोंडाने पुरेशा प्रमाणात श्वास घेणे या दोन्ही क्रिया जाणीवपूर्वक केल्याखेरीज वाक्याची उच्चारक्रिया ही प्रभावी आणि प्रवाही होऊ शकत नाही. सामान्यपणे आपली ही जाणीव किंवा शरीरभान विकसित झालेले नसते.

उच्चार साधना उपक्रमामध्ये यावरच काम केले जाते. श्वास नाकाने घ्यावा की तोंडाने, हा फार मोठा प्रश्न आहे. किंबहुना तो वेगळ्या लेखाचा विषय आहे. तूर्तास तरी असे समजून घेऊ, की उच्चारासाठी जर आपण तोंड उघडणार असू, तर श्वास हा तेवढ्यापुरता का होईना त्या उघडलेल्या तोंडानेच घेतला पाहिजे. एरवी मात्र तो नाकाने घेणे हे आरोग्यदृष्ट्या हिताचे. याबाबत योग्य प्रशिक्षणासाठी, उच्चारक्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांचा अथवा वैद्यांचा सल्ला घेणे सयुक्तिक ठरेल. (Latest Marathi News)

Language Communication
भारतीय आदिवासींची इंग्लंडमधील स्मृतिस्थळं

भाषेतील आवाज आणि उच्चार ही मानसिक पातळीवरची गोष्ट नसून ती एक शारीरिक कृती आहे. तिचे संतुलन हा भाषा संतुलनाचा पाया आहे. बोलतांना पुरेसे तोंड उघडणे आणि जबड्याचा वापर करणे, या शारीरिक क्रियांचा संबंध आवाजातील भारदस्तपणाशी, गोलाईशी, नादाशी आणि भाषेच्या उच्चार सौष्ठवाशी असतो.

तोंडातल्या तोंडात बोलणारी अनेक मंडळी आपण आपल्या आजूबाजूला पाहतो. त्यांचे काही अडूनही राहात नाही. परंतु स्पष्ट आणि स्वच्छ उच्चार करणाऱ्या मंडळींचे बोलणे ऐकणे, यात एक वेगळीच मजा असते. भाषा उच्चारांविषयी जागरूकता वाढविण्यासाठी अंतर्नाद हा उपक्रम मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या भाषिकांसाठी राबविला जातो.

वक्ते, अभिनेते, शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी व कवी यांच्यासाठी भाषा उच्चारांचे विशेष प्रशिक्षण या भाषा उपक्रमातून दिले जाते. कागदोपत्री भाषेत बोलायचे झाले तर आज संपूर्ण महाराष्ट्रातून मराठी पंधरवडा हा अगदी शासकीय इतमामात साजरा केला जातो. परंतु मराठी भाषेतील उच्चार कसे घडवावेत, आपली मातृभाषा प्रभावीपणे व्यक्त करण्यासाठी आवाज कसा वापरावा याबाबत मात्र संस्था पातळीवर आणि व्यक्ती पातळीवर अधिक व्यापक प्रयत्न होणे गरजेचे आहे.

शाळा आणि महाविद्यालयांमधून भाषा उच्चाराच्या संतुलनात स्वर आणि व्यंजनांच्या उच्चारस्थानांचा वरवरचा अभ्यास करवून घेतला जातो. पण त्या उच्चार स्थानांचा बोलण्यात काय प्रभाव पडतो, हे ज्ञान शेवटी अनुभवजन्य आहे. हा अनुभव विद्यार्थ्यांना द्यायचा असेल तर सर्वप्रथम शिक्षकांनी उच्चारांकडे लक्ष दिले पाहिजे.

‘खाण तशी माती’ अशी एक म्हण आहे. शिक्षकच जर शुद्ध आणि स्पष्ट उच्चारांच्या बाबतीत उदासीन असेल तर विद्यार्थी त्याकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत. दंतव्य, तालव्य, ओष्ट्य, मूर्धन्य इत्यादी वर्णोच्चारही पाठयपुस्तकातून शिकवले जात. मात्र त्याचे प्रात्यक्षिक कसे करवून घ्यावे, तसेच त्याचा सराव कसा करावा हा महत्त्वाचा भाग शालेय शिक्षणातून वगळला जातो, ही आश्चर्याची गोष्ट आहे. भाषा उच्चार अभ्यासकांनी मात्र हे उच्चार-सराव स्वतंत्ररीत्या व जाणीवपूर्वक केले पाहिजेत. यासाठी व्यक्तिगत पातळीवर काय करता येईल, बघू या भाषासंवादाच्या पुढील भागात. (क्रमशः)

Language Communication
हॅपी बर्थ डे बार्बी!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.