Nashik News : समाजसेवेचा आदर्श वस्तुपाठ : कर्मवीर ॲड. बाबूराव ठाकरे

Nashik News : दुष्काळी गणल्या गेलेल्या चांदवड तालुक्यातील गणूर या गावी १२ मार्च १९२६ रोजी सामान्य शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला.
Karmaveer Adv. Baburao Thackeray.
Karmaveer Adv. Baburao Thackeray.esakal
Updated on

"शिक्षण आणि विधी क्षेत्रांत स्वकर्तृत्व, सेवाभाव, शुद्ध हेतू आणि ध्येयवादाच्‍या बळावर मोठेपण सिद्ध केले, असे समाजसेवी व्यक्तिमत्त्व स्व. ॲड. बाबूराव ठाकरे होय. त्‍यांनी मनाची कवाडे सतत खुली ठेवली. विचार, आचार स्वातंत्र्याला कधीही बाधा येऊ दिली नाही. त्यांनी कुणापुढेही लांगूलचालन केले नाही. ते करारी बाण्याचे, तत्त्वनिष्ठ होते."

- बाळासाहेब क्षीरसागर, सभापती, मविप्र संस्‍था.

(Nashik social service Karmaveer Adv Baburao Thackeray marathi news)

दुष्काळी गणल्या गेलेल्या चांदवड तालुक्यातील गणूर या गावी १२ मार्च १९२६ रोजी सामान्य शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. प्रखर बुद्धिमत्ता, हजरजबाबीपणा, जिद्द आणि प्रगाढ व्यासंगाच्या बळावर त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत देवळालीतील झोरोस्ट्रियन बोर्डिंग हायस्कूलमधून १९४४ मध्ये मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

एचपीटी महाविद्यालयातून बीए, पुण्यातील विधी महाविद्यालयातून एलएलबी आणि मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्रात एमए पदवी मिळवली. ज्ञान आणि कर्माची सांगड घालून आपला, भोवतालच्या समाजाचा विकास करण्याचे त्यांनी मनात पक्के केले.

१९५१ मध्ये वकिलीला प्रारंभ केला. ज्येष्ठ विधिज्ञ कर्मवीर अण्णासाहेब मुरकुटे यांचे सहाय्यक म्हणून त्यांनी काम पाहिले. पुढे ‘निष्णात कायदेपंडित’ अशी ख्याती झालेल्या ठाकरे साहेबांना कृषिसंस्कृती, शेतकरी कुटुंबविश्व, सामाजिक वास्तव आणि जीवन संघर्ष यांची पुरेपूर जाणीव होती.

वकिलीचा कधीही व्यवसाय होऊ दिला नाही. १९५४ मध्ये पब्लिक प्रॉसिक्युटर, १९६७ ते १९७७ यादरम्यान ते जिल्ह्याचे असिस्टंट गव्हर्नमेंट प्लीडर अँड पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून कार्यरत होते. पंचवीस वर्षे नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्षपद लीलया सांभाळताना जिल्हा न्यायालयाच्या आवारात वकिलांसाठी चेंबर्स उभारली.

जिल्हा ॲडव्होकेट मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना केली. महापालिकेमध्ये कायदेशीर सल्लागार म्हणून काम केले. ग्रामीण भागात ज्ञानगंगा पोहोचविण्यासाठी त्यांनी ‘मविप्र’चे सरचिटणीस (१९६१ ते १९८४), अध्यक्ष (१९९२ ते १९९७) या पदांचा कालावधी सत्कारणी लावला. (Latest Marathi News)

Karmaveer Adv. Baburao Thackeray.
Nashik News : दुय्यम निबंधकांचे लेखणीबंद आंदोलन; मुद्रांक विभागाच्या कामकाजावर परिणाम

त्यांनी मविप्र संस्थेचा गुणात्मक विकास आणि विस्तार साधण्यासाठी शिक्षणाचे जाळे खेड्यापाड्यापर्यंत विणले. त्यांच्या कार्यकाळात ७३ माध्यमिक शाळा, एक प्रशिक्षण, आठ वरिष्ठ महाविद्यालये सुरू झाली. संस्थेसाठी सरकारी अनुदानावर पूर्णपणे विसंबून न राहता दानशूरांकडून निधी जमवला. सत्कारातील पाच लाखांच्या थैलीमध्ये स्वतःचे दीड लाख भरीस घालून साडेसहा लाख रुपये संस्थेसाठी निधी जमा करत दातृत्वाचा वस्तुपाठ घातला.

जिल्हा छत्रपती शिवाजी स्मारक समितीचे अध्यक्ष असताना त्यांनी जिल्हा न्यायालयासमोर राजांचा अश्वारूढ भव्य पुतळा उभारला. छत्रपती शिवराय त्रिशताब्दी समिती स्थापनेत त्यांचा वाटा होता. त्यांनी पुणे विद्यापीठ विधिसभा, एक्झिक्युटिव्ह कौन्सिलचे सदस्य, महाराष्ट्र शिक्षण संस्था संचालक संघ महामंडळाचे सरचिटणीस, कार्याध्यक्ष म्हणून काम पाहिले. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ नाशिकला होण्यासाठी भोळे आयोगासमोर सादर करावयाचा अहवाल जबाबदारीने पूर्ण करून युक्तिवाद केला.

साहेबांच्या अमीट कार्याची नोंद घेऊन मविप्र संस्थेतर्फे अमृत महोत्सवी सोहळ्यात ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्या हस्ते, ७८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात स्व. विलासराव देशमुखांच्‍या हस्ते त्यांना सन्मानित केले. चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके स्मारक उद्घाटनाप्रसंगी त्यांना नाशिक गौरव पुरस्कार प्रदान केला. अशा कणखर, करारी, सत्य, तत्त्वनिष्ठ, निर्भीड, निष्काम, न्यायनिपुण आदी गुणांनी परिपूर्ण असलेले असामान्य व्यक्तिमत्त्व २३ फेब्रुवारी २००५ रोजी आपल्या कार्याचा कीर्तीसुगंध मागे ठेवून अनंतात विलीन झाले.

Karmaveer Adv. Baburao Thackeray.
Nashik ZP News : पुनर्विनियोजनातून आदिवासी घटक योजनेत ठेंगा; वेळेत माहिती न देण्याचा जिल्हा परिषदेला फटका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.